

Chhatrapati Sambhjinagar News : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने 'औरंगाबाद' शहराचे नाव 'संभाजीनगर' केले. त्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर दुरुस्ती करत ते 'छत्रपती संभाजीनगर' असे केले. सत्ताधारी आणि विरोधक अशा दोघांसाठी कळीचा ठरलेला हा मुद्दा निकाली निघाला. पण महापालिकेत एमआयएमच्या नगरसेवकांकडून शहराचे अधिकृत नाव बदलण्यात आले असले तरी 'औरंगाबाद' असा उल्लेख केला जात आहे.
यावरून स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये यांनी विकास निधी पाहिजे असेल तर छत्रपती संभाजीनगर नावाचा उल्लेख असलेले पत्रच पाहिजे, अशी ताकीद एमआयएमच्या नगरसेवकांना दिली होती. महापालिकेचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यावरील चर्चेसाठी आज बैठक बोलावण्यात आली होती.
या बैठकीत एमआयएमकडून शहराच्या नावाचा उल्लेख 'औरंगाबाद' असा झाल्यानंतर सभापती मकरिये यांनी पुन्हा संबंधित सदस्याला छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख करा, नाहीतर एकही काम होणार नाही, एक रुपयाही मिळणार नाही, असे बजावले. चुकीचे नाव घेऊ नका, असे सांगीतल्यावर संबंधित एमआयएमच्या सदस्याने मकरिये यांना उद्देशून तु्म्ही चिडू नका, मी छत्रपती संभाजीनगर म्हणतो, असे म्हणत नमते घेतले.
यावर दुसऱ्या नगरसेवकाने औरंगाबाद या नावात चुकीचे काय आहे? ते ऐतिहासिक नाव आहे, असे म्हणत वादात उडी घेतली. यावर पुन्हा अनिल मकरिये काही बोलणार, तेवढ्यात इतर सदस्यांनी विषयावर या, आपण अर्थसंकल्पावर चर्चा करायला बसलोय, असे म्हणत हा वाद अधिक वाढणार नाही, यासाठी मध्यस्थी केली. त्यानंतर सभागृहात कामकाज सुरळीत सुरू झाले.
महापालिकेचे राजकारण गेली 20-25 वर्ष औरंगाबाद-संभाजीनगर या नावाभोवती फिरत होते. आता हा विषय निकाली निघाला असला तरी त्यावरून एमआयएम-भाजपामध्ये अधून मधून खटके उडत असतात. पहिल्याच सर्व साधारण सभेत महापौरांनी शहराचे नामांतर केल्याबद्दल सरकारच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. तेव्हा एमआयएमच्या नगरसेवकांनी वाॅकआऊट करत या ठरावाचा निषेध केला होता.
एमआयएमच्या विरोधी पक्ष नेत्यांनी तुम्ही आमच्या भावनाचा आदर करा, आम्ही करू, असे म्हणत या वादावर सामंजस्याची भूमिका घेतली होती. औरंगाबाद असे शहराचे नाव असतांना शिवसेना-भाजपाचे नगरसेवक संभाजीनगर असा उल्लेख पत्रात करत होते. पण त्यांचा निधी किंवा काम आमदार, खासदार म्हणून एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी कधी रोखले नव्हते.
माझे वडील साजेद बिल्डर हे स्थायी समितीचे सभापती असताना त्यांनीही कधी नावाचे राजकारण केले नाही. सगळ्यांना निधी आणि कामे केली, याची आठवण समीर साजेद यांनी सभापती अनिल मकरिये यांना करून दिली होती. त्यानंतरही आजच्या बैठकीत नावावरून राजकारण झाल्याचे पहायला मिळाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.