मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याप्रकरणी एसटीच्या आंदोलक कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratan Sadavarte) यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायालयाने सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीत १३ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. आता सदावर्तेच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला भाजप (BJP) तालुकाध्यक्षांनी पन्नास हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केल्याने खळबळ उडाली आहे.
बीडचे भाजप तालुकाध्यक्ष स्वप्निल गलधर यांनी ही वादग्रस्त घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, गुणरत्न सदावर्ते हा समाजविघातक माणूस आहे. तो दोन समाजांत आणि जातींमध्ये तेढ निर्माण करणारा आहे. त्याच्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका होऊ शकते. त्यामुळे गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा दाखल करावा. याबाबतची तक्रार बीडच्या पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली आहे. या तक्रारीवर कारवाई न केल्यास जो कोणी सदावर्ते यांच्या तोंडाला काळं फासेल त्याला 50 हजार रुपये बक्षीस देऊन गौरविण्यात येईल.
या प्रकरणी आणखी चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यातील एकाचे नाव सच्चिदानंद पुरी असे आहे. सच्चिदानंद पुरी हा सदावर्ते यांच्या जवळचा व्यक्ती आहे. तोच एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांना सदावर्ते यांचा निरोप पोचवायचा. पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या कटात पुरी या सहभाग असल्याचे पोलीस तपासात पुढे आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
एसटीच्या आंदोलक कर्मचाऱ्यांनी ८ एप्रिलला पवार यांच्या मुंबईतील घरावर हल्ला केला होता. त्याच रात्री गावदेवी पोलिसांकडून सदावर्ते यांना अटक करण्यात आली. त्यानंतर ९ एप्रिलला न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. ती संपल्यानंतर काल पुन्हा न्यायालयात उभे केल्यानंतर १३ तारखेपर्यंत पोलीस कोठडी वाढविण्यात आली. दरम्यान, सिल्व्हर ओक परिसरातून ताब्यात घेण्यात आलेल्या ११० आंदोलक कर्मचाऱ्यांचाही जामीन अर्ज फेटाळून लावत न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.