Chhatrapati Sambhajinagar : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शहरातील तीनही मतदारसंघात महायुतीने बाजी मारली. मध्य, पश्चिम मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेने तर पुर्व मतदारसंघात भाजपने विजय मिळवला. पैकी भाजपच्या अतुल सावे यांना विजयासाठी चांगलेच झगडावे लागले होते. तर विधानसभेच्या मध्य मतदारसंघात प्रदीप जैस्वाल साडेआठ हजारांच्या फरकाने निवडून आले. महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला असला तरी शहरामध्ये एमआयएमची ताकदही दिसून आली.
आगामी महापालिका निवडणुकीत भाजपने (BJP) स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेने मात्र युतीतच लढलं पाहिजे, अन्यथा एमआयएमचा फायदा होईल, असे म्हणत युतीसाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवला आहे. 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत एमआयएमचे इम्तियाज जलील हे दुसऱ्या क्रमांकावर होते. शहरी आणि ग्रामीण भागात त्यांना सर्व जाती-धर्माच्या लोकांची मते मिळाली, पण त्यांचा पराभव झाला.
विधानसभा निवडणुकीत एमआयएमने (AIMIM) आपले संपूर्ण लक्ष शहरातील पूर्व आणि मध्य या दोन मतदारसंघावर केंद्रीत करत उमेदवार दिले होते. इम्तियाज जलील हे स्वतः मंत्री अतुल सावे यांच्याविरोधात मैदानात उतरले.कडवी झुंज देत त्यांनी सावे यांना घाम फोडला, पण सतराशे मतांनी ते कसेबसे जिंकले. दुसरीकडे मध्य मतदारसंघात एमआयएमच्या उमेदवाराने 78 हजार मते घेत आपली वोट बॅंक शाबूत असल्याचे दाखवून दिले होते.
महायुतीला विधानसभा निवडणुकीत रेकाॅर्डब्रेक यश मिळाले असले तरी महापालिका निवडणुकीत भाजपला स्वबळावर लढायचे आहे. स्थानिक पदाधिकारी, नेत्यांना न्याय मिळावा, ही आमची भूमिका असल्याचे स्थानिक नेते सांगत असले तरी राज्यात सर्वाधिक आमदार निवडून आल्यानंतर भाजपला स्थानिक पातळीवर सत्तेत आता वाटेकरी नको आहेत. (Shivsena) शिवसेनेला स्वबळावर सत्ता येणे शक्य नाही, याची जाणीव आहे.
शिवाय वेगळे लढलो तर एमआयएमचा फायदा होईल, ही भिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. भाजपने एमआयएमला रोखण्यासाठी युती करावी, अशी अपेक्षा शिवसेनेने व्यक्त केली आहे. मात्र भाजप ऐकण्याच्या मनस्थित सध्या तरी नाही. भाजपची ताठर भूमिका पाहता शिवसेनेने आमचीही स्वतंत्र लढण्याची तयारी असल्याचे सांगयाला सुरवात केली असली तरी त्यांना एमआयएमची धास्ती सतावते आहे.
भाजपने पूर्व मतदारसंघात विजय मिळवला असला तरी तो काठावरचा होता, हे त्यांचे नेते मानायला तयार नाहीत. उलट आम्ही एमआयएमचा बंदोबस्त केला, असा खोटा आव ते आणत आहेत. एमआयएमने मात्र विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांची गोळाबेरीज करत गेल्या महापालिका निवडणुकीत असलेला नगरसेवकांचा 25 हा आकडी चाळीसवर नेण्यासाठी कंबर कसली आहे. इम्तियाज जलील हे खासदार, आमदार नसल्याने प्रदेशाध्यक्ष म्हणून ते आता पुर्णवेळ संघटनेच्या कामात सक्रीय असणार आहे.
जनतेच्या प्रश्नांना हात घालत रस्त्यावर उतरण्यास त्यांनी सुरवात केली आहे. आदर्श पतसंस्थेतील 202 कोटींच्या घोटाळ्यात ज्या ठेवीदारांच्या ठेवी अडकल्या आहेत, त्यांच्यासाठीचा लढा त्यांनी पुन्हा हाती घेतला आहे. एमआयएमने संपूर्ण संघटनेची नव्याने बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी यापुर्वीची पक्ष कार्यकारणी बरखास्त करून महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
एकीकडे महायुतीत स्वबळावरून तानातानी सुरू आहे, तर दुसरीकडे एमआयएमची मात्र महापालिकेत नगरसेवकांची संख्या वाढवत किंगमेकर होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. शिवसेना-भाजप युती एकत्रित लढली तर एमआयएमला रोखणे सोपे जाईल, असे शिवसेनेला वाटते. भाजपला मात्र स्वबळ खुणावत आहे. महाविकास आघाडीत हीच परिस्थिती असल्याने महायुती आणि महाविकास आघाडीच्या भांडणात एमआयएम येणाऱ्या महापालिका निवडणुकीत जोरदार मुंसडी मारू शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.