
Nanded News : विधानसभा निवडणुकीचा प्रचार मतदानाला अवघे आठ दिवस उरले असतानाच दिवसेंदिवस टोकदार झाल्याचं दिसून येत आहे. त्यातच वादग्रस्त विधानांनी महायुती आणि महाविकास आघाडीची झोपच उडवली आहे. महायुतीतील सुजय विखे,धनंजय महाडिक,बबन लोणीकर, नितेश राणे, संजय गायकवाड यांसह अनेक मंडळींनी प्रचारात आपल्या वादग्रस्त विधानांनी पक्षाला अडचणीत आणलं आहे.
यातच आघाडीतही संजय राऊत, नाना पटोले,अरविंद सावंत यांच्यासह अनेकांनी आपल्या बेताल वक्तव्यांनी राजकारण तापवलं आहे. वादग्रस्त विधानं करणार्यांच्या यादीत आता भाजपच्या (BJP) आणखी एका नेत्याची भर पडली आहे.
मराठवाड्यात 'जरांगे फॅक्टर'मुळे आधीच टेन्शनमध्ये आलेल्या महायुती विशेषत: भाजपची मतदानाच्या तोंडावर पुन्हा एकदा डोकेदुखी वाढली आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार भीमराव केराम यांनी विधान परिषद आमदार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यासमोरच वादग्रस्त विधान केल्यामुळे विरोधकांना टीकेची आयती संधीच मिळाली आहे.
भाजपचे आमदार भीमराव केराम यांनी सोमवारी (ता.11) बोधडी येथे प्रचारसभेत बोलताना रोज रोज गावात येऊन तुमचे काय मुके घ्यायचे? असे बेताल वक्तव्य केलं आहे.त्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. भाजपचे हे आमदार गावात फिरकले नाहीत अशी टीका सुरू होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना आमदार भीमराव केराम यांची जीभ घसरली.
नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात अटीतटीची लढत होत आहे. किनवट विधानसभा मतदारसंघातही भाजपचे भीमराव केराम विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रदीप नाईक अशी टफफाइट पाहायला मिळण्याची शक्यता आहे. यातच रोज रोज गावात येऊन काय तुमचे मुके घ्यायचे का? मंत्रालयात वेळ देऊन गावासाठी निधी आणण्याचं काम आपण करतो असंही केराम यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे.
माजी मंत्री आणि परतुरचे भाजप उमेदवार बबनराव लोणीकर यांची मराठा समाजाबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे चांगलीच कोंडी झाली आहे. 'मराठा समाजाची मतं बोटाच्या कांड्यावर मोजण्या इतकी आहेत.' असं वक्तव्य त्यांनी प्रचारसभेत केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या या वक्तव्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
'या गावात अठरापगड जातीचे लोक आहेत. मराठा समाजाची गावात कांड्यावर मोजण्याइतकी मतं आहेत. मात्र, हे गाव सर्व समाजाचे आहे. गावातील सर्व जातीधर्माचे लोक माझ्याबरोबर आहेत. मराठा, धनगर, माळी, फुलारी, आगलावे, शेट्ट्ये, कांदारे, कांबळे असा सगळा समाज माझ्याबरोबर आहे. मी 40 वर्षे राजकारणात असून सगळेजण माझ्यावर प्रेम करतात, असं बबनराव लोणीकरांनी व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.