
Chhatrapati Sambhajinagar : हाॅटेल व्हिट्स खरेदी प्रकरणावरून राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट अडचणीत सापडले आहेत. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी लावत शिरसाट यांचा गेम करत भाजपने स्थानिक राजकारणात शिवसेनेच्या खच्चीकरणाचा डाव टाकला आहे. व्हिट्स खरेदीसह जमीन, एमआयडीसीतील भूखंड असे अनेक आरोप संजय शिरसाट यांच्यावर करण्यात आले आहेत.
विरोधक तुटून पडले आहेत, मित्रपक्ष अंतर राखून आहेत, तर स्वपक्षातील सहकाऱ्यांनीही साथ सोडल्याने सध्या संजय शिरसाट (Sanjay Shirsat) हे पक्षात आणि सरकारमध्येही एकाकी पडल्याचे चित्र आहे. शिरसाट यांच्याविरोधात एमआयएम-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजप अशा तिघांची छुपी युती झाली आहे की काय? अशी चर्चा काल व्हिट्स प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी लावल्यानंतर होऊ लागली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत संजय शिरसाट यांचे खच्चीकरण करत शिवसेनेला घेरण्याचा भाजपचा डाव एमआयएम आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मदतीने साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
हा डाव यशस्वी झाला तर महापालिकेत भाजपाची सरशी होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. आगामी महापालिकेची निवडणूक ही (BJP) भाजपसाठी महत्वाची असणार आहे. आतापर्यंत पंचवीस वर्षात महापालिकेच्या सत्तेत भाजपला अगदी कमी वेळा महापौर पदाची संधी मिळाली होती. महापालिकेच्या राजकारणात भाजपला कायम छोट्या भावाची भूमिका बजवावी लागायची. शिवसेनेत फूट पडल्यानंतर होणाऱ्या पहिल्या महापालिका निवडणुकीत शतप्रतिशत भाजपा आणि महापौर पदावर पक्षाच्या नेत्यांचा डोळा आहे.
या मार्गात अडथळा ठरू पाहणाऱ्या आणि ज्यांच्या खांद्यावर शिवसेना महापालिका निवडणुकीची जबाबदारी टाकू शकते, त्या मंत्री संजय शिरसाट यांचा गेम करण्याच्या दृष्टाने पहिले पाऊल काल टाकले गेले, असे म्हटले तर वावगे ठरू नये. चार टर्म आमदार आणि आता मंत्री झालेल्या संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांच्यावर जातीवादाचा ठपका ठेवत काढायला लावलेला आंबेडकरी जनतेचा मोर्चा भाजपलाही खटकला.
एवढ्या मोठ्या प्रमाणात आंबेडकरी समाज शिरसाट यांच्या पाठीशी उभा राहिला तर महापालिकेत भाजपचा महापौर बसवण्याचे स्वप्न भंग पावू शकते. हे लक्षात आल्यानंतर संजय शिरसाट यांच्या नाड्या आवळण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. स्थानिक राजकारणात शिरसाट यांची झालेली कोंडी भाजपच्या पथ्यावर पडणारी आहे. भाजपला येथे शिवसेनेला मागे टाकून छत्रपती संभाजीनगर महापालिका ताब्यात घेण्याची महत्त्वाकांक्षा आहे.
यासाठी शिरसाट यांचा अडथळा दूर करावा लागणार आहे. शिरसाट यांना अशाच आणखी काही प्रकरणांत घेरून अतुल सावे यांना निवडणुकीपूर्वी पालकमंत्री करण्याची रणनीती असल्याचे भाजपच्या सूत्रांनी म्हटले आहे. तिकडे ठाकरे यांच्या शिवसेनेलाही शिरसाट यांची ताकद आणि वर्चस्व कमी करायचे असून त्यांनाही हे प्रकरण लावून धरणे फायद्याचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.