Marathwada Political News : लोकसभा निवडणुका अवघ्या सहा महिन्यांवर आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षात जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. (Dharashiv Constituency) दोन दिवसांपूर्वीच महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिंदे गटाने बैठक घेत गेल्यावेळेस लढलेल्या २२ जागा लढण्याचा निर्धार केला असतानाच आता आणखी एका जागेवरून भाजप व शिंदे गटात वाद रंगण्याची शक्यता आहे. ती जागा मराठवाड्यातील धाराशिवची आहे.
त्यातच भाजपचे आमदार अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar) यांच्या वक्तव्याने वादाची पहिली ठिणगी पडली आहे. धाराशिव लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची (BJP)भाजपने तयारी केली आहे. या जागेवर भाजपने दावा केला असल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केल्याने महायुतीत पहिली ठिणगी पडली आहे. शिंदे गटाच्या वाट्याला येणाऱ्या जागांवर भाजपने तयारी सुरू केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
धाराशिव लोकसभेची जागा शिवसेनेची (Shivsena) असून या ठिकाणी ठाकरे गटाचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे खासदार आहेत. सध्या ते ठाकरे गटात आहेत. भाजपने राज्यातील ४८ लोकसभा व २८८ विधानसभा मतदारसंघांची संपूर्ण तयारी पूर्ण केली असून, वाटाघाटीत आता कोणती जागा कोणाच्या वाट्याला येणार हे ठरणार आहे. त्याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मात्र, या जागेवर भाजपने संपूर्ण तयारी केली असल्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. त्यासोबतच ही जागा गेल्यावेळेस शिवसेनेने धनुष्यबाण चिन्हावर लढली व जिंकली आहे. त्यामुळे आता महायुतीमध्ये काय निर्णय होणार याची माहिती नाही, पण आम्ही संपूर्ण तयारी केली असल्याचे सांगत आमदार अभिमन्यू पवार यांनी रान पेटवले आहे.
याबाबत शिंदे गटांकडून अद्याप कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, येत्या काळात आता महायुतीच्या घटक पक्षात अनेक जागेवरून वाद रंगणार याची ही झलक असल्याचे दिसते. आगामी काळात शिंदे गट यावरून काय हालचाली करणार याकडे लक्ष लागले आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघाचा विचार करता औसा, तुळजापूरमध्ये भाजपचे तर बार्शीमध्ये भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार आहेत.
तर दुसरीकडे भूम, परंडा व उमरगा मतदारसंघात शिंदे गटाचे आमदार आहेत. धाराशिव मतदारसंघात ठाकरे गटाचे आमदार आहेत. पक्षीय बलाबल पाहता भाजप वरचढ ठरत असला तरी १९९६ पासून या ठिकाणी शिवसेनेचे प्राबल्य आहे. १९९८ मध्ये काँग्रेसचे अरविंद कांबळे, २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. पद्मसिंह पाटील यांचा अपवाद वगळता, शिवसेनेचे शिवाजी कांबळे, कल्पना नरहिरे, रवींद्र गायकवाड व ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे खासदार राहिले आहेत.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.