

Shivsena UBT Political News : 'डिलिमिटेशन' विधेयकाला इंडिया आघाडी आणि राज्यातील महाविकास आघाडीचा तीव्र विरोध असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने वेगळी भूमिका घेतली आहे. या विधेयकाला सशर्त पाठिंबा देण्याची भूमिका या पक्षाने घेतल्याने आघाडीतील मित्रपक्षांना धक्का बसला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. तर पक्षाचे दुसरे नेते चंद्रकांत खैरे यांनीही शरद पवार यांच्यासोबत जाऊन आमचे नुकसान झाल्याचे सांगत त्यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
केंद्रातील मोदी सरकारने डिलिमिटेशन विधेयक मंजुरीसाठी विशेष अधिवेशन बोलावले आहे. विधेयक मंजूर करण्यासाठी आवश्यक खासदारांचा पाठिंबा मिळवण्याच्या दृष्टीने दिल्लीत मोठ्या घडामोडी घडत आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या विधेयकाला सशर्त पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याने इंडिया आघाडी आणि राज्यातील महाविकास आघाडीला राजकीय झटका बसल्याची चर्चा आहे. याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत.
शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी यावर भाष्य करताना शरद पवार यांनी आम्हाला धोका दिला, अशा शब्दांत संताप व्यक्त केला. आम्ही इतकी वर्षे शरद पवार यांच्या पाठीमागे जात राहिलो. त्यावेळी अनेक कार्यकर्ते म्हणत होते की, एक दिवस शरद पवार साहेब तुम्हाला धोका देतील.
आज ते खरे होताना दिसत आहे. शरद पवार यांच्यासोबत जाऊन आमचा काय फायदा झाला? उलट शिवसेनेचे नुकसानच झाले. डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याची शरद पवार यांची भूमिका आम्हाला अजिबात पटलेली नाही, असेही खैरे म्हणाले.
डिलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयक मंजूर करून घेण्यासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने पुन्हा एकदा हालचाली वेगवान केल्या आहेत. विशेष म्हणजे, यावेळी लोकसभेतील खासदारांची संख्या 50 टक्क्यांनी वाढवणे आणि महिला आरक्षणाची अंमलबजावणी 2029 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी करणे, असा सरकारचा प्रस्ताव असल्याचे सांगितले जात आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP-SP) पक्षाची भूमिका डिलिमिटेशन विधेयकाला सशर्त पाठिंबा देण्याची आहे. मात्र, पक्षाने संसदेतील अंतिम निर्णय विधेयकाचा मसुदा तपासल्यानंतर घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.