Aurangabad Political News : छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून संभाव्य उमेदवाराकंडून एकमेकांना आव्हान-प्रतिआव्हान देणे सुरू झाली आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी तीन दिवसांपूर्वी आपण संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. त्यानंतर शिंदे गटाकडून प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी त्यांना जास्त घाई करू नका, असा सबुरीचा सल्लाही दिला.
आता ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार म्हणून ज्या चंद्रकांत खैरे यांच्याकडे पाहिले जाते, त्यांनी देखील कराड यांना लोकसभा निवडणूक लढवून दाखवाच, तुम्हाला शिवसेनेची ताकद दाखवू, अशा शब्दात आव्हान दिले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला लोकसभेची उमेदवारी दिली, तर बाळासाहेब, उद्धवसाहेबांची काय ताकद आहे, हे दाखवून देवू असा इशारा दिला आहे.
संभाजीनगरातील शिवसेना भवनात नुकतीच खैरे यांच्या हस्ते सत्यनारायणाची पूजा घालण्यात आली. त्यानंतर माध्यमांशी बोलतांना त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. खैरे म्हणाले, संभाजीनगर हा बाळासाहेब ठाकरे, उद्धवसाहेब आणि शिवसेनेचा गड आहे. तो आम्ही पुन्हा काबीज केल्याशिवाय राहणार नाही. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सामान्य लोकांमध्ये प्रचंड सहानुभूती आहे. ही लाट तुम्हाला येणाऱ्या निवडणुकांमधून दिसेलच. त्यामुळे कराडांनी जरी लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी आधी शिंदे गट- दादा गट की भाजप ? हे त्यांना ठरवू द्या. भुमरे इच्छूक आहेत, हरकत नाही, त्यांना मीच मोठे केले, असेही खैरे म्हणाले.
Edited By : Jagdish Pansare