Chhatrapati Sambhaji Nagar : राज्याचे अल्पसंख्यांक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. एक जानेवारीपासून आठवडाभर चालणाऱ्या या महोत्सवात कव्वाली, मुशायरा, लावणी, गौतमी पाटीलचे नृत्य, इंदुरीकर महाराजांचे कीर्तन अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सत्तार (Abdul Sattar) यांनी विविध सामाजिक उपक्रम ही या निमित्ताने घेतले. परंतु, बुधवारी सत्तार यांच्या उपस्थितीत झालेल्या गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्या नृत्याच्या कार्यक्रमात प्रचंड गोंधळ उडाला. गौतमी पाटील आणि तिचा समूह स्टेजवर आल्यापासून उपस्थित गर्दींमधील तरुणांनी धुडगूस घालण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम सत्तार यांचे चिरंजीव उपनगराध्यक्ष समीर (Sameer Sattar) यांनी गर्दीला आवरण्यासाठी स्टेजवरून वारंवार आवाहन केले. हात जोडून विनंती केली मात्र ही गर्दी आटोक्यात येत नव्हती.
तरुण मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला आल्यामुळे ते गौतमी पाटीलचे नृत्य जवळून पाहण्यासाठी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडून पुढे येण्याचा प्रयत्न करत होते. विनवण्या करूनही तरुण ऐकत नसल्यामुळे अखेर समीर सत्तार यांनी पोलिसांना या गर्दीला तुम्ही तुमच्या पद्धतीने सांभाळून घ्या, असे फर्मान सोडले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्यानंतर हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना मग पोलिसांच्या लाठ्यांचा प्रसाद खावा लागला. परंतु गर्दी जास्त आणि पोलीस बंदोबस्त कमी अशी परिस्थिती असल्यामुळे कार्यक्रमात वारंवार गोंधळ होत होता. गौतमी पाटील तिचे नृत्य सुरू असताना व्यासपीठावर अब्दुल सत्तार यांचे आगमन झाले तेव्हा उपस्थित गर्दीने जोरदार घोषणाबाजी करत त्यांचे स्वागत केले.
मग अब्दुल सत्तार यांनीही संस्कृती, महाराष्ट्राची शान याची आठवण करून देत तरुणांना गोंधळ न घालण्याचे आवाहन केले. जर कुणी गैरप्रकार केला तर इथे सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत ते पाहून तुमच्यावर पोलीस योग्य ती ॲक्शन घेतील असा, दमही सत्तार यांनी भरला. त्यानंतर पुन्हा गौतमी पाटील हिचा कार्यक्रम सुरू झाला आणि रेटारेटी, पुढे येण्याचा प्रयत्न याने गोंधळ उडाला.
त्यानंतर मात्र पोलीस गर्दीत घुसून गोंधळ घालणाऱ्या तरुणांना काठ्यांनी जोडपून काढत होते. कसाबसा हा कार्यक्रम रात्री साडेदहा वाजता संपला. त्यानंतर गर्दी पांगत असताना संतापलेल्या सत्तार यांनी पुन्हा एकदा सगळ्यांना दम भरत शांततेत जा, नाहीतर पोलीस तुम्हाला सरळ करतील,अशा भाषेत धमकावले. तसेच त्यांनी अत्यंत शिवराळ भाषेत बोलताना पोलिसांना तरणांना मारण्याचे आदेश दिल्याचा व्हिडिओही आता सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
एकंदरीत अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जमलेल्या तरुणांना रिटर्न गिफ्ट म्हणून पोलिसांच्या लाठ्यांचा प्रसाद खावा लागला. त्यामुळे आता उर्वरित कार्यक्रमांचे काय होणार, असा सवाल ही उपस्थित केला जात आहे.
(Edited By - Rajanand More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.