Chhatrapati Sambhajinagar News : महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर होऊन प्रचाराला लागला, वंचित, एमआयएमचे उमेदवारही घोषित झाले. परंतु महाराष्ट्रात मिशन 45 चे टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या महायुतीला मात्र अद्याप संभाजीनगर लोकसभेचा उमेदवार ठरवता आलेला नाही. तीन वर्षांपासून आमची तयारी सुरू आहे, संभाजीनगरची जागा भाजपच जिंकू शकतो, असा दावा करत आज अचानक इच्छुक उमेदवार तथा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, शहर-जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर आज तातडीने नागपूरची वारी करून आले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी या तिघांना नागपुरात बोलावून घेतले होते. या बैठकीत संभाजीनगरची जागा भाजप ताकदीने लढवून जिंकू शकतो, यावर सगळ्यांचे एकमत झाले. स्वतः फडणवीसांनीही याला दुजोरा दिला, मात्र ही जागा शिंदे सेनेला सुटणार हेही या वेळी स्पष्ट झाले. महायुती असल्यामुळे जो उमेदवार असेल त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना देत फडणवीसांनी कराड, सावे, बोराळकर यांना माघारी धाडले.त्यामुळे या तिघांची नागपूर वारी व्यर्थ ठरली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
संभाजीनगर लोकसभेच्या जागेवरून शिवसेना (ShivSena) शिंदे गट आणि भाजपमध्ये चर्चा, बैठकांचे सत्र सुरू असले तरी ठोस निर्णय होऊ शकलेला नाही. दोन्ही बाजूंनी दावे-प्रतिदावे गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे. शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट महायुतीचा उमदेवार जाहीर होण्याचे दररोज नवे मुहूर्त सांगत आहेत. तर दुसरीकडे भाजपच्या स्थानिक नेते मंडळीकडून सर्व्हेचा दाखला देत ही जागा आम्हीच जिंकू शकतो, यावर ठाम आहेत.
संभाजीगनरची जागा शिंदे सेनाला देण्याचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे भाजपच्या इच्छुक आणि जिल्ह्यातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. अशावेळी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये (BJP) मोठा उद्रेक होऊ शकतो. भाजपला जागा सुटली नाही तर पदाधिकारी, कार्यकर्ते मनापासून काम करणार नाही, याचा फटका महायुतीला पर्यायाने भाजपला बसू शकतो. सध्या राज्यातील आणि दिल्लीत वरिष्ठ नेत्यांना कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात किमान 35 जागा निवडून आणायच्या आहेत.
जागा सुटली नाही म्हणून निर्माण झालेल्या नाराजीचा फटका बसू शकतो, याची चाहुल फडणवीसांना लागली असावी. विशेषतः संभाजीनगरमध्ये शिवसेना शिंदे गटाला जागा सुटल्यानंतर याची शक्यता अधिक आहे. त्यामुळेच भाजपच्या स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना समज देण्याच्या उद्देशाने फडणवीसांनी आज तातडीने भागवत कराड, अतुल सावे, शिरीष बोराळकर यांना नागपुरात बोलावून घेतल्याचे बोलले जाते.
आज सकाळी हे तिघे समृद्धी महामार्गाने नागपुरात (Nagpur) दाखल झाले. तिथे फडणवीसांच्या निवासस्थानी या तीनही नेत्यांची अर्धा तास चर्चा झाली. या वेळी जागा भाजप जिंकू शकतो हे खरे असले तरी महायुती ज्याला उमेदवारी देईल, त्याला निवडून आणा, अशा सूचना देत फडणवीसांनी या तिघांना माघारी पाठवल्याची खात्रीलायक माहिती आहे.
(Edited By : Chaitanya Machale)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.