Solapur, 13 April : माढा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पक्षाला राम राम करत पुन्हा एकदा शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. धैर्यशील मोहिते पाटील हे पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढविण्याचे निश्चित झाले आहे. त्यानिमित्त ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे उद्या सकाळी अकरा वाजता स्नेहभोजनासाठी ‘शिवरत्न’वर येणार आहेत. या डिनर डिप्लोमसीतून माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या रणनीती ठरण्याची शक्यता आहे.
भाजपने उमेदवारीमध्ये डावलल्यानंतर नाराज झालेल्या मोहिते पाटील यांनी माढ्यातून लोकसभा निवडणूक लढविण्याचे रणशिंग फुंकले आहे, त्यासाठी धैर्यशील यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे. आता ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) निवडणूक लढविणार हे फायनल झाले आहे. अकलूजमध्ये उद्या (ता. 14 एप्रिल) ‘शिवरत्न’वर सायंकाळी चारच्या सुमारास धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
तत्पूर्वी सकाळी अकरा वाजता मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर ‘डिनर डिप्लोमसी’ रंगणार आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar), माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासाठी उद्या ‘स्नेह भोजना’चे आयोजन केले आहे. पवार हे काही दिवसांपूर्वी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या तब्यतेची विचारपूस करण्यासाठी अकलूजला गेले होते. मात्र, काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे हे 2009 नंतर निवडणुकीच्या निमित्ताने प्रथमच ‘शिवरत्न’वर जात आहेत.
विजयसिंह मोहिते पाटील हे सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकाच जिल्ह्यातील असण्याची महाराष्ट्राच्या राजकारणातील ती पहिली वेळ होती. विशेष म्हणजे 2009 नंतर सुशीलकुमार शिंदे यांच्या पाठीमागे पराभवाचे ग्रहण लागले आहे, ते या जुळून आलेल्या राजकीय घडामोडीतून सुटण्याची आशा शिंदे समर्थकांना आहे.
अजितदादांच्या नेत्याला निमंत्रण?
दरम्यान, ‘शिवरत्न’वरील डिनर डिप्लोमसीसाठी फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर येणार का, याची उत्सुकता आहे. कारण, काही दिवसांपूर्वी रामराजेंसह मोहिते पाटील यांनी डिनर डिप्लोमसी केली होती. रामराजे यांचा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विरोध आहे, त्यामुळे पवारांसोबतच्या डिनर डिप्लोमसीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजेंना आमंत्रण आहे का, याची उत्सुकता आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.