Loksabha Election 2024 : राज्यातील महायुती सरकारने लोकसभा निवडणुकीसाठी मिशन 45 चे उदिष्ट डोळ्यांसमोर ठेवले आहे, तर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने त्यापुढे एक पाऊल टाकत मिशन 48 हाती घेत राज्यभरात शिवसंवाद मेळावे घेतले, परंतु प्रत्यक्ष जागावाटपाची प्रक्रिया सुरू झाली तेव्हा मात्र शिवसेनेला एकएक मतदारसंघ मिळवण्यासाठी झगडावे लागत आहे.
अगदी विद्यमान 13 खासदारांना पुन्हा उमेदवारी मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यी एकनाथ शिंदेंना दिल्लीच्या वाऱ्या कराव्या लागल्या. अजूनही काही जागांचा तिढा सुटलेला नाही. यापैकीच एक म्हणजे छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा. शिंदे यांनी या जागेवर दावा सांगत कुठल्याही परिस्थितीत संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar )बाबतीत तडजोड न करण्याची भूमिका घेतली आहे. शिवसेनेत उठाव केल्यानंतर शिंदे यांना सर्वाधिक साथ ही संभाजीनगरातून मिळाली होती.
अशावेळी जागा भाजपला सोडली तर चुकीचा संदेश जाईल आणि लोकसभेनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत याचा फटका बसेल, अशी भूमिका जिल्ह्यातील मंत्री, आमदारांनी मांडली. दुसरीकडे भाजपनेही सर्व्हेचे दाखले देत ही जागा आम्हाल लढवू द्या, म्हणून ताणून धरले. यातच शिवसेनेचे संभाजीनगर जिल्ह्यातील सगळे आमदार, मंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी मुंबईत गेले होते. पण यात एक चेहरा मिस होता तो म्हणजे राज्याचे अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचा.
लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली तेव्हापासून अब्दुल सत्तार हे मुख्यमंत्री शिंदे व जिल्ह्यातील इतर शिवसेना नेत्यापासून अंतर राखून आहेत. संभाजीनगर लोकसभेची जागा शिवसेनेलाच मिळावी, यासाठी इच्छुक उमेदवार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे, आमदार तथा प्रवक्ते संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल, प्रा. रमेश बोरणारे, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी नुकतीच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
मात्र, या वेळीही अब्दुल सत्तार सोबत नव्हते. सत्तार यांचे लोकसभा निवडणुकीच्यावेळी असे दूरदूर राहणे सगळ्यांनाच खटकत आहे. संभाजीनगर लोकसभेची जागा शिवसेनेला सुटली आणि पक्षाने दिलेला उमेदवार सत्तारांच्या पसंतीस उतरला नाही, तर ते काय भूमिका घेतील हे वेगळे सांगायला नको. 2019 च्या लोकसभा निवडणुकीचा प्रसंग आठवला तर तेव्हा काँग्रेसमध्ये असलेल्या सत्तार यांनी उमेदवारी जाहीर झालेल्या सुभाष झांबड यांच्याविरोधात बंड पुकारले होते.
काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत त्यांनी झांबड यांना उघडउघड विरोध करून एमआयएमच्या इम्तियाज जलील यांना मदत केली होती. स्वतः सत्तार यांनी याची अनेकदा जाहीर कबुली दिलेली आहे. सध्या राज्य पातळीवर संभाजीनगरच्या जागेवरून शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असताना सत्तार यांनी घेतलेली बघ्याची भूमिका येणाऱ्या संकटाची चाहुल तर नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
(Edited By Roshan More)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.