

Shivsena News : छत्रपती संभाजीनगर शहरात गेल्या काही दिवसांपासून चाकूहल्ला, खून, जीवघेणा हल्ला असे प्रकार वाढले आहेत. सर्वसामान्यांच्या जीवाशी राजरोसपणे खेळ सुरू असल्याने पोलीसा विरोधातला रोष वाढत आहे. वाळूजच्या बजाजनगर भागात एका महिलेने घरात घूसून दुसर्या महिलेचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना ताजी असतानाच काल शिवसेना शिंदे गटाच्या एका पदाधिकार्यासह त्याच्या आईवर पोलीस कर्मचार्यानेच चाकूने हल्ला चढवल्याची गंभीर घटना घडली.
या प्रकारानंतर मोठा जमाव रस्त्यावर उतरल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शुक्रवारी रात्री 11 वाजता गजानन महाराज मंदिर- पुंडलिकनगर रस्त्यावर ही घटना घडली. पुंडलिकनगरमध्ये एकमेकांच्या शेजारी राहणार्या या दोन कुटुंबाच्या तीन मजली इमारती आहेत. घरासमोर वाहन लावण्यावरून त्यांच्यात सतत वाद व्हायचा. काल याच वादातून थेट चाकूने हल्ला चढवून भोसकण्याचा गंभीर प्रकार घडला.
हल्ला करणारा पोलीस कर्मचारी हा शहर पोलीस दलाच्या वाहन विभागात कार्यरत आहे. शिवसेना शिंदे गटाचे उपविभागप्रमुख विकास नरवडे यांचा तो शेजारी आहे. घरासमोर वाहन लावण्यावरून त्यांच्यात वाद झाला होता. यातून शुक्रवारी रात्री साडे दहाच्या सुमारास पुन्हा त्यांच्यात भांडण झाले. दोघे समोरासमोर आले आणि पोलीस कर्मचारी आणि नरवडे यांच्यात शिवीगाळ, धक्काबुक्की अन् नंतर हाणामारी सुरू झाली.
नरवडे यांचे कुटुंबीय भांडण सोडवत असतानाच पोलिसाने धारदार चाकूने नरवडे यांच्या गळ्यावर वार केले. नरवडे रक्तबंबाळ होऊन कोसळले. त्यानंतर त्यांच्या आईवरही त्याने चाकूचे सपासप वार केले. त्यादेखील गंभीर जखमी झाल्या. भर रस्त्यावर हा प्रकार घडल्याने एकच गोंधळ उडाला, लोकांची मोठी गर्दी झाली. या हल्ल्याची माहिती पोलीसांना कळताच ते घटनास्थळी दाखल झाले.
नरवडे यांची प्रकृती चिंताजनक
नरवडे व त्यांच्या आईला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नरवडे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. त्यांच्या गालापासून मानेपर्यंत वार आहेत. हाणामारी सुरू असतानाच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यांच्यासमोरच पोलीस कर्मचाऱ्याने नवरडे यांच्यावर हल्ला केल्याचा दावा रहिवाशांनी केला आहे.
नरवडे यांच्यावर हल्ल्याचे वृत्त कळताच उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत हल्लेखोर पोलीस कर्मचारी पळून गेला होता. पोलिसांनी जंजाळ यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलिसांनीच हल्लेखोराला पळवून लावल्याचा आरोप जमावाने केला.
पोलीसच लोकांवर चाकूहल्ले करत असतील तर सामान्य नागरिकांनी कोणाकडून अपेक्षा करायची? या महिन्यात 30 हून अधिक चाकूहल्ले झाले. हल्ल्यानंतर पोलिसांनी हल्लेखोराला पळून जाण्यास मदत केली असेल तर हे गंभी आहे. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांची भेट घेऊन आरोपीवर कठोर कारवाईची मागणी आपण करणार आहोत, असे जंजाळ यांनी यावेळी सांगीतले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.