छत्रपती संभाजीनगर महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली असून, एमआयएमचे काही प्रभावी वार्ड तुटले आहेत.
शिवसेना (महाविकास आघाडी) गोटात नाराजी निर्माण झाली आहे, तर महायुतीने तटस्थ भूमिका घेतली आहे.
या रचनेनंतर संभाजीनगरमधील आगामी महापालिका निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Chhatrapati Sambhajinagar : सत्ताधारी महायुतीच्या बड्या माजी नगरसेवकांची सोय, एमआयएमच्या अनेक जुन्या वार्डांमध्ये तोडफोड झाल्याने अंतिम प्रभाग रचनेनंतर 'कही खुशी कही गम'चे वातावर राजकीय पक्षांमध्ये आहे. साडेपाचशेहून अधिक आक्षेप आल्यानंतर अंतिम प्रभाग रचनेकडे सगळ्याच राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या प्रभाग रचनेवर टीका केली आहे, तर महायुतीतील शिवसेना- भाजपा मनासारखे झाल्याने शांत आहे. आता वार्डातील आरक्षणाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शासनाने अंतिम केलेली प्रभागरचना प्रसिद्ध झाली. त्यात महायुतीच्या माजी नगरसेवकांना अनुकूल किंवा त्यांच्या सोयीची प्रभागरचना झाल्याची चर्चा रंगत आहे. दुसरीकडे आरक्षण सोडतीकडे लक्ष लागले आहे. मात्र, अंतिम केलेल्या प्रभाग रचनेवरून आतापासूनच राजकारण सुरू झाले. सत्ताधारी युतीच्या माजी नगरसेवकांच्या फायद्याची ही प्रभाग रचना असल्याचा आरोप केला जात आहे. त्याच बरोबर एमआयएमच्या (Aimim) अनेक वॉर्डांना सुरुंग लागला असून, दुसरीकडे शिवसेना यूबीटीच्या काही नगरसेवकांसाठीही काही प्रमाणात पोषक वातावरण आहे.
लोकसंख्येत झाला बदल
प्रारूप प्रभाग रचना जाहीर केल्यानंतर, दाखल आक्षेपांवर सुनावणी घेऊन बदल करण्यात आले. प्रभागाची व्याप्ती वाढल्याने प्रभागाच्या एकूण लोकसंख्येत, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येतही वाढ आणि घट झाल्याचे दिसून येत आहे. महापालिकेने (Municipal Corporation) तयार केलेला प्रभाग रचनेचा आराखडा शासनास सादर केला होता. निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर नागरिकांसाठी 23 ऑगस्टला प्रसिद्ध केला होता. त्यावर नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागविल्या होत्या.
4 सप्टेंबरपर्यंत त्यावर हरकती दाखल करण्याची मुदत होती. यावेळेत 552 आक्षेप आले होते. यावर सुनावणी घेऊन महापालिका आयुक्तांनी सर्व झोन अधिकारी, नगररचना विभागाचे अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त करून पडताळणी केली. नंतर सुनावणी अहवाल शासनाला दिला होता. शासन स्तरावर बैठक झाल्यावर 3 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाने अंतिम प्रभाग रचना आराखड्यास मान्यता दिली.
आराखड्यातील बदल माहीतच नाही
हरकती आणि सूचना दाखल केल्यानंतर, तसेच समितीसमोर ते मांडल्यानंतर अंतिम प्रभाग रचनेच्या आराखड्यात काय बदल झाले, याबद्दल आक्षेप दाखल करणाऱ्यांमध्ये उत्सुकता होती. मात्र, केलेल्या बदलांची स्वतंत्र माहिती आयोगाने उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे प्रारूप आणि अंतिम प्रभाग रचना आराखड्याचा अभ्यास करून बदलांचा शोध घेण्याचे काम अनेकजण करत होते. प्रभागाची व्याप्ती बदलण्यात आल्याने प्रभागाच्या लोकसंख्येवरही परिणाम झाल्याचे दिसून आले.
काही प्रभागांची व्याप्ती वाढली
प्रभाग क्रमांक 2 मध्ये भारत मातानगर एन-12, छत्रपतीनगर एन-12, सारा वैभव, महमुदपुरा, फरहतनगर, एन-13 भागाचा समावेश केला. प्रभाग क्र.3 मध्ये गणेश कॉलनी भाग, एन-12 चाऊस कॉलनी, हिमायत बाग, प्रभाग क्र. 8 मध्ये मारुतीनगर, भवानीनगर, नारेगाव भाग, प्रभाग क्र. 9 मध्ये चिकलठाणा भाग, सावित्रीनगर, पटेलनगर, वसंतनगर अंशत:, मिसारवाडी भाग, प्रभाग क्र. 10 मध्ये सावरकरनगर, अष्टविनायकनगर, मायवर्ल्ड आदी भागांचा समावेश केला आहे.
1. संभाजीनगर महापालिकेची अंतिम प्रभाग रचना कधी जाहीर झाली?
राज्य सरकारने ही रचना 5 आॅक्टोबर 2025 रोजी अधिकृतरित्या प्रसिद्ध केली आहे.
2. कोणत्या पक्षाला सर्वाधिक नुकसान झाले आहे?
एमआयएमचे काही मजबूत वार्ड तुटल्याने त्यांना सर्वाधिक नुकसान झाले असल्याचे मानले जात आहे.
3. शिवसेनेची भूमिका काय आहे?
शिवसेना (महाविकास आघाडी) या रचनेबाबत नाराज असून, त्यांनी सरकारवर अन्यायाचा आरोप केला आहे.
4. महायुतीने काय प्रतिक्रिया दिली आहे?
महायुतीने या विषयावर तटस्थ भूमिका घेतली असून, अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
5. या रचनेचा निवडणुकीवर काय परिणाम होईल?
या नव्या प्रभाग रचनेमुळे स्थानिक राजकीय समीकरणे बदलतील आणि निवडणुकीतील पक्षांचे गणित नव्याने मांडले जाईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.