

Chhatrapati Sambhajinagar News : शिवसेना-भाजप पाठोपाठ एमआयएम पक्षातही मोठ्या प्रमाणात नाराजीनाट्य समोर आले आहे. MIM चे नासेर सिद्दीकी व इतर कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलील यांच्यावर पक्ष विकायला काढल्याचा आरोप केला आहे. 15-15 लाखांत तिकीटं विकण्यात आली असून प्रामाणिक कार्यकर्त्यांना इम्तियाज गद्दार ठरवत असल्याचा संताप व्यक्त करत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलील यांचे फोटो पायदळी तुडवले. आम्ही ओवोसी यांच्यासोबत आहोत, पण इम्तियाज जलील यांच्यासोबत नाही. त्यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढणाऱ्या एमआयएम पक्षाने सर्वात आधी उमेदवारी यादी जाहीर करत आघाडी घेतली होती. आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी आपल्या सर्व 26 उमेदवारांची यादी आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केली होती. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने अनेक इच्छुक आशेवर बसले होते. परंतु आपल्याला उमेदवारी मिळणार नाही हे स्पष्ट झाल्यावर एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलील यांना शिव्यांची लाखोली वाहत रस्त्यावर उतरत संताप व्यक्त केला.
मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढलेले नासेर सिद्दीकी यांचा यात पुढाकार होता. इम्तियाज जलील यांनी पक्ष विकायला काढला आहे. पाच ते पंधरा लाख रुपये घेऊन तिकीटं विकण्यात आली आहेत. पक्षात वर्षानुवर्ष काम करणाऱ्या निष्ठावंतांना इम्तियाज जलील गद्दार ठरवत आहे. आम्ही सर्व कार्यकर्ते असदुद्दीन ओवेसी यांच्यासोबत आहोत, पण इम्तियाज जलील याच्यासोबत नाही. त्यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा देतानाच आक्रमक झालेल्या काही कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयावर धडकणार असल्याचे सांगितले.
एका संतप्त कार्यकर्त्याने तर विनोद पाटील आणि सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या सांगण्यावरून एमआयएम पक्षाची तिकीटी वाटली गेल्याचा गंभीर आरोप केला. दरम्यान, इम्तियाज जलील यांनी कालच आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून व्हिडिओ जारी करत उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले होते. इच्छुकांची संख्या अधिक आणि उमेदवारी देण्याच्या मर्यादा पाहता अनेकजण नाराज होतील, मला शिव्या देतील, पण सगळ्यांना न्याय देणे शक्य नाही. तुमच्या सगळ्यांमुळेच पक्ष मोठा झाला आहे.
आता संधी मिळाली नाही, अशांनी पक्षाचे काम प्रामाणिकपणे करत राहावं. पक्षाचे तुमच्यावर बारीक लक्ष असते. योग्यवेळी तुम्हाला नक्कीच संधी दिली जाईल. कोणीही गडबड, गोंधळ किंवा पक्षाला अडचण होईल, असे कृत्य करू नये, असे आवाहन इम्तियाज जलील यांच्याकडून करण्यात आले होते. मात्र आज नाराज कार्यकर्त्यांच्या संतापाचा भडका उडालाच.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.