Akbaruddin Owaisi : "भारत देश दाढी असणाऱ्यांचाही..."; अकबरुद्दीन ओवेसी नेमकं काय म्हणाले?
Chhatrapati Sambhajinagar News, 06 Nov : राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. प्रत्येक पक्षाकडून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या निवडणुकीत जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न देखील सुरू आहे.
अशातच आता आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे एमआयएम पक्षाचे नेते अकबरुद्दीन ओवेसी (Akbaruddin Owaisi) यांनी भारत देश हा जितका टिळा लावणाऱ्यांचा आहे, तितकाच तो दाढी असणाऱ्याचांही असल्याचं वक्तव्य केलं आहे.
ते छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) एका प्रचार सभेत बोलत होते. शिवाय त्यांनी भाजप, शिवसेना (उद्धव ठाकरे) काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी सत्तेसाठी आपली विचारधारा सोडल्याचंही म्हटलं. ओवेसी म्हणाले, "भाजप आणि शिवसेना हे हिंदुत्ववादी पक्ष आहेत. भाजपची विचारधारेच्या शिवसेनेचे दोन तुकडे झाले.
तर राहुल गांधी आणि प्रियांका गांधींना हिंदुत्त्व शिकवण्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यशस्वी झाले का? अजित पवारांनी आपल्या भ्रष्टाचाराचा अभ्यास मोदी आणि योगी यांना शिकवलं का?" अशा शब्दात त्यांनी युती आगाडीवर टीका केली. मला मुस्लिम असल्याचा गर्व आणि अभिमान आहे. मी हिंदुस्थानी आहे.
मी चिथावणीखोर भाषण करतो, असं म्हटलं जातं. पण आमच्या प्रश्नांची उत्तरे यांच्याकडे नसतात, त्यामुळे माझ्या भाषणांना चिथावणीखोर ठरवलं जातं. योगी म्हणतात 'बटेंगे के तो कटेंगे', बीफ, घरवापसी नावावर तुम्ही जे कापत आहात त्यामुळे देश कमजोर होत नाही का? असा प्रश्न यावेळी उपस्थित केला.
हा देश सर्व धर्मातील लोकांचा आहे. हा देश मोदी आणि योगींचा आहे, तितकाच माझाही आहे. मात्र, भारत सर्वधर्मीयांचा आहे, असे म्हटले की अनेकांना वाईट वाटतं. देशात बेरोजगारी, महागाई,बलात्कार हे प्रश्न आहेत मात्र, या देशाला जातीच्या नावावरून विभागलं जात असल्याचंही ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीला पाठिंबा दिला. फक्त मराठा समाज मागास नाही, तर संपूर्ण मराठवाडा मागास आहे, महाराष्ट्रात सर्वाधिक मागास मराठवाडा आहे, असं ते यावेळी म्हणाले. शिवाय आमचे 10 आमदार निवडून आले तर ना ठाकरे ,ना शिंदे , ना पवार, कुणीच सत्तेवर बसू शकत नाही, असा दावाही त्यांनी या सभेत बोलताना केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.