Chhatrapati Sambhaji Nagar : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे चिरंजीव धर्मराज यांची आज रश्मी मडके यांच्याशी लग्नगाठ बांधली जाणार आहे. दानवे यांच्या घरी अनेक दिवसांपासून लगीनघाई सुरू होती. आज (ता.5) रोजी सायंकाळी छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड बायपास रोडवर सहारा सिटी येथे हा विवाह सोहळा पार पडणार आहे.
वधू-वरास शुभाशीर्वाद देण्यासाठी राज्यभरातून सर्वपक्षीय नेते मंडळी आमदार (MLA), खासदार या विवाह सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे सायंकाळी वधू-वरास शुभाशीर्वाद देण्यासाठी आवर्जून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय दानवेंच्या मुलाच्या लग्नाला वऱ्हाडी म्हणून कोण कोण येणार? याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे.
दरम्यान, मुलाच्या लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात अंबादास दानवे (Ambadas Danve) गाण्याच्या तालावर मनसोक्त नाचताना दिसले. संध्याकाळी होणाऱ्या या विवाह सोहळ्यात येणाऱ्या मान्यवरांचे स्वागत करण्यासाठी अंबादास दानवेही उत्सुक असून निमंत्रण पत्रिका याशिवाय समाज माध्यमातून तसेच व्हाईस रेकॉर्डिंगद्वारे सर्वांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर तसेच शिवसेनेत बंड झाल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांच्यावर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते म्हणून महत्त्वाची जबाबदारी सोपवली. दरम्यानच्या काळात मुंबई आणि नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात दानवे यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. कायदा व सुव्यवस्था शेतकरी, बेरोजगारी, आरोग्य, महिला सुरक्षा अशा सगळ्याच विषयांवर दानवे यांनी आक्रमकपणे सभागृहात विरोधी पक्षनेता म्हणून सरकारला कोंडीत पकडले.
नुकत्याच झालेल्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यापेक्षाही अंबादास दानवे यांची छाप अधिक पडली, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात होती. या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांच्या घरातील लग्नकार्यासाठी राज्यभरातील नेते मंडळी आवर्जून हजेरी लावण्याची शक्यता आहे. या लग्नासाठी कोण कोण नेते येतात? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.
(Edited By - Rajanand More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.