- महेश माळवे
Shirdi Loksabha : गेली 33 वर्षे राजकारणात असलेल्या खासदार सदाशिव लोखंडे यांनी तीनवेळा आमदारकीची हॅटट्रिक केली. तसेच खासदार डॉ. सुजय विखे यांनी त्यांची हमी घेतल्याने ते आता खासदारकीमध्ये देखील हॅटट्रिक करतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांचा अभीष्टचिंतन सोहळा, तसेच मुख्यमंत्री वयोश्री व नारीशक्ती योजनांचे आज लोकार्पण झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे होते. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, माजी आमदार चंद्रशेखर कदम, बाळासाहेब मुरकुटे, आमदार डॉ. किरण लहामटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, महंत रामगिरी महाराज, महंत अरूणनाथगिरी महाराज, संपर्क प्रमुख बाजीराव दराडे, जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते, विजय वहाडणे, सिद्धार्थ मुरकुटे, प्रकाश चित्ते, डॉ. चेतन लोखंडे उपस्थित होते.
खासदार शिंदे म्हणाले, "17 दिवसांत शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार होण्याचे भाग्य लोखंडे यांना लाभले. असे भाग्य खूप कमी लोकांच्या नशिबी येते. राजकारणातील मेहनत, कष्ट सर्वांना करावे लागतात. पण ग्रह, ताऱ्यांचीही त्याला साथ असावी लागते. त्यांच्या आमदारकीपासून त्यांचे ग्रह, तारे त्यांच्याबरोबर आहेत, असे गौरव उद्गार काढत माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी भविष्यकाराबाबत छेडलेल्या विषयाला हात घालत आमच्याकडेही खूप भविष्यकार आहेत.
तसेच त्यांच्याकडे पोपटही आहेत. ते रोज सरकारबाबत भविष्यवाणी करतात. पण त्यांचे भविष्य काही खरे होत नाही, अशी टीका त्यांनी कोणाचे नाव न घेता केली". गेल्या पन्नास वर्षांपासून रखडलेल्या निळवंडेचा प्रश्न खासदार लोखंडे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे व सर्वांच्या सहकार्याने निकाली निघाला. यामुळे लाखो लोकांना फायदा झाला. लोकांना पिण्याचे तसेच शेतीचे पाणी मिळाले. सर्वांबरोबर जुळून घेतले तर त्याला विरोधक राहत नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दुसऱ्यांवर टीका करण्यापेक्षा स्वतः आपले काम करत राहिल्याचा फायदा लोखंडे यांना झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मार्गदर्शनाखाली या मतदार संघात 300 ते 400 कोटी रुपयांचा निधी मिळाला. आधीची पाच वर्षे व आताची दीड वर्षे, तर मध्यंतरीच्या अडीच वर्षाचा कार्यकाळाचा विचार केला असता खूप फरक दिसून येईल. जेव्हापासून हे सरकार सत्तेत आले तेव्हापासून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचा सातत्याने प्रयत्न केला.
सर्वांना निधी देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी केला. तळागाळातील व्यक्तींपर्यंत विविध योजना राबविल्यामुळे लोकांचा या सरकारवर विश्वास वाढत आहे, असे सांगताना काही लोकांचे मानसिक संतुलन बिघडले आहेत. डॉ.सुजय विखे न्यूरो सर्जन असले तरी कोणताही डॉक्टर त्यांच्यावर उपचार करू शकत नाही, अशी टीकाही खासदार शिंदे यांनी यावेळी केली.
महसूल मंत्री विखे म्हणाले, "आज मुख्यमंत्री वयोश्री योजना व नारीशक्ती योजनांचा शुभारंभ या दिवशी झाला हे स्वागतार्ह आहे. खासदार लोखंडे यांनी समर्पित भावनेने काम केले. त्यांना हशु अडवाणी यांचा परिसस्पर्श झाला, तर दिवंगत महाजन व मुंडे यांचा सहवास लाभला. सातत्याने काम करणं हा त्यांचा स्वभाव आहे. कामाची धडपड आणि आवड असेल तर जनसामान्य जनता ही राजकीय नेतृत्व घडवू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे खासदार लोखंडे आहेत.
येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आपण मिशन ४५ ला सुरुवात केली आहे. त्यामुळे आपल्याला राज्यातून ४५ खासदार दिल्लीत पाठवायचे आहेत. त्यात आपले हे खासदारही असतील. राज्य सरकार राज्यातील साडेबारा कोटी जनतेला मोफत आरोग्य सेवा पुरवण्यात निर्णय घेतला, तसेच आज सहकारी दूध संस्थेच्या पाठोपाठ खासगी दूध संस्थांनाही पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला गेला आहे".
आजच्या दिवशी लोखंडे यांना असा सल्ला द्यायचा आहे की, तुम्ही फार घाई करत जाऊ नका. घाई करून नको त्या लोकांचे ऐकता आणि त्यामुळे मतमतांतरे वाढत जातात. तेव्हा यात सुधारणा करा. अलीकडच्या काळात त्यांच्यात बरीचशी सुधारणा झाली आहे, त्यामुळे निश्चितच त्यांचा भविष्यकाळ उज्वल आहे, असे मंत्री विखे म्हणाले.
सत्काराला उत्तर देताना खासदार लोखंडे म्हणाले, "मतदार संघातील शेतकर्यांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी आपण नेहमी प्रयत्नशील राहिलो. निळवंडेचे पाणी आणले. तसेच आता घाटमाथ्यावरील पाणी गोदावरी खोर्यात वळवून येथील शेतकर्यांना सुखी करण्याचे आपले स्वप्न आहे. विखे कुटुंबाचे माझ्यावर नेहमीच प्रेम राहिलेले आहे".
विखे परिवाराचा शब्द...
खासदार लोखंडे यांचा कोणालाच त्रास नसतो. शेजारचे आमदाराला नाही आणि खासदारालाही नाही. त्यामुळेच खासदार लोखंडे यांची खासदारकीची हॅटट्रिक करायची जबाबदारी विखे - पाटील परिवाराची आहे. हा शब्द मी त्यांना देतो. राजकारणात अनेकांना यश मिळतं. कारण त्यांचा कोणालाच त्रास नसतो. मात्र, जिल्ह्यात सगळ्यात जास्त त्रास आम्ही दिलाय त्यामुळेच आम्हाला पन्नास वर्षात फार संघर्ष करावा लागला, अशी कबुलीही खासदार विखे यांनी दिली.
तो भविष्याकार शोधावा लागेल...
खासदार लोखंडे हे वाटतात पण साधेभोळे नाहीत. तीनवेळा आमदार म्हणून निवडून येणे सोपे नाही. मुंबईत राहायचे आणि कर्जतमधून निवडून यायचे हे फक्त त्यांनाच जमले. लोखंडे यांचे निवडून येण्याचे गमक काय हे मी त्यांना विचारले तेव्हा त्यांनी मला आपल्या यशाची गमक सांगितले की, फारसं जनतेत राहायचं नाही. त्यामुळे नाराजी वाढत नाही.
आम्ही त्यांच्यासारखं करायला गेलो. परंतु, आम्हाला ती शक्य झाले नाही, त्यांचा भविष्यकार कोण हे पाहावे लागेल. तो भविष्यकार शोधला तर मला पुन्हा आमदार होता येईल असे दिसते. त्यांना पुन्हा एकदा खासदारकीची संधी मिळावी अशी सदिच्छा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी दिली.
(Edited by Amol Sutar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.