

आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती समाजाविरुद्ध केलेल्या वक्तव्यामुळे छत्रपती संभाजीनगरातील ख्रिस्ती कृती समितीने तक्रार दाखल केली.
पोलिसांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यानंतर समिती अध्यक्ष विजय (गुड्डु) निकाळजे यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.
न्यायालयाने सविस्तर म्हणणे ऐकून पडळकरांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आदेश दिले असून त्यामुळे राजकीय खळबळ उडाली आहे.
Chhatrapati Sambhajinagar News : सांगली शहरातील यशवंत नगर येथील ऋतुजा राजगे या सात महिन्यांच्या गर्भवतीने आत्महत्या केली होती. ज्याचे राज्यभर पडसाद उमटले होते. तर ऋतुजाने केलेली आत्महत्या ही धर्मांतरासाठी सासरच्या लोकांनी केलेल्या दबाव आणि छळातून केली. यामुळे अशा धर्मांतरासाठी येणाऱ्या पादरी लोकांना ठोकण्यासाठी बक्षीस ठेवले पाहिजेत. पहिल्या पादरीला ठोकेल त्याला पाच लाखांचे बक्षीस दुसऱ्याला मारेल त्याला चार लाखांचे अन् तिसऱ्याला मारेल त्याला तीन लाखांचे. जो कोणी पादरीचा सैराट करेल त्याला अकरा लाखांचे बक्षीस ठेवले पाहिजे असे वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. तसेच राज्यभर दौरे करत ख्रिस्ती समाजाविरोधात जोरदार टीका केली होती. ज्यानंतर त्यांच्याविरोधात ख्रिश्चन बांधव रस्त्यावर उतरले होते. पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात होती. पण गुन्हा दाखल झाला नव्हता. यामुळेच ख्रिस्ती समाजाने न्यायालयात धाव घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या मागणीनंतर न्यायालयाने देखील आदेश दिल्याने आता खळबळ उडाली आहे.
गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद राज्य उमटले होते. जालन्यासह राज्याच्या विविध भागात सकल ख्रिश्चन समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चे काढण्यात आले होते. तसेच पडळकर यांची आमदारकी रद्द करून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची मागणी देखील करण्यात आली होती. तर पडळकर यांच्यावर कारवाई होणार नाही तोपर्यंत विभागीय स्तरावर आणि दिल्लीपर्यंत मोर्चे काढून असा इशारा ख्रिश्चन समाजाने दिला होता. मात्र यानंतरही कोणतीच कारवाई झालेली नसल्याने अखेर ख्रिश्चन समाजाने न्यायालयात धाव घेतली आहे.
ख्रिस्ती समाजाविरुद्ध गरळ ओकून दोन समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य पडळकर करत असतात. यामुळे याच्याविरोधात गुन्हा दाखल व्हावा यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील ख्रिस्ती कृती समितीचे अध्यक्ष विजय (गुड्डु) निकाळजे यांनी छावणी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल होती. मात्र त्यावर पोलीसांनी कोणतीच दखल घेतलेली नाही. यामुळे अखेर निकाळजे यांनी न्यायालयात धाव घेतली. आज या बाबत न्यायालयात सुनावणी झाली असून न्यायालयाने तक्रारदाराचे म्हणणे सविस्तर ऐकूण घेत निरीक्षण नोंदवले. तसेच पडळकर यांना न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून लेखी म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर आता राज्यभर खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी मिळालेली माहिती अशी की, पडळकर यांनी सांगली येथील रामनगर चौकात ख्रिस्ती समाजाविरुद्ध विखारी टीका केली होती. त्यांनी, ख्रिस्ती समाजाच्या धर्मगुरू यांना जीवे मारण्याची धमकी देताना 'ख्रिस्ती धर्मगुरूंचा सैराट करा', अशा शब्दांचा आव्हान केले होते. तसेच तसे करणाऱ्याला बक्षीसही दिले जाईल असेही त्यांनी म्हटले होते. याविरोधातच निकाळजे यांनी छावणी पोलीस ठाण्यात पडळकर यांच्याविरोधात लेखी तक्रार दि. 9 जुलै 2025 रोजी दिली होती.
ही तक्रार देवूनही छावणी पोलीसांनी फौजदारी तक्रार नोंदवून घेतली नाही. त्यामुळे या प्रकरणाची याचिका (फौजदारी अर्ज) न्यायालयात त्यांनी दाखल केली. यावेळी न्यायालयाने, तक्रारदाराने दाखल केलेल्या अर्जावरून आता दिलेल्या पुरावे आधारे प्रथम दर्शनी आमदार गोपीचंद पडळकर यांचे वक्तव्य दोन समाजात तेढ निर्माण करणारे असल्याचे जाणवते.त्यामुळे त्यांनी न्यायालयाच्या समक्ष हजर राहून आपले लेखी म्हणणे मांडावे असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
काय म्हणाले होते पडळकर?
सांगलीमधील ऋतुजा नावाच्या महिलेला धर्मांतर करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात आला. ती सात महिन्यांची गरोदर असताना तिच्या पोटात बाळ असतानाही ख्रिश्चन पादरी, नवरा व सासू-सासर्यांनी तिच्यावर दबाव टाकला. ती हिंदू रितीरिवाज पाळत असल्याने ही सैतानी असल्याचे टोमने मारले गेले. तसेच ती गर्भवती असताना तिच्यावर गर्भसंस्कार हिंदू पद्धतीने नाही तर ख्रिश्चन पद्धतीने करण्यासाठी सासरच्यांनी दबाव टाकला. यातूनच तिने आत्महत्या केल्याचा दावा आमदार पडळकर यांनी केला होता.
तसेच त्यांनी ख्रिश्चन पादरीने अशा पद्धतीने जबरदस्ती करणे योग्य आहे का? त्याच्या गुन्हा नाही दाखल करायचा का? तुम्ही गावोगावी जाता, फसवता, अमिष दाखवता. तुम्ही लोकांचा धर्मांतरण करता, जे योग्य नाही. ऋतुजा या महिलेचा तुम्ही अशा पद्धतीने खून केला आहे. त्यावर आम्ही भूमिका घ्यायची नाही का? असा सवाल पडळकरांनी उपस्थित केला होता. तसेच जर अशा पद्धतीने धर्मांतर करण्यासाठी कोणी गावात आला तर त्याला योग्य प्रकारे उत्तर द्या, ही आमची आज उद्या आणि कायम हीच भूमिका असेल असेही पडळकर म्हणाले होते. यावरूनच राज्यभर वाद उफाळला होता.
1. गोपीचंद पडळकरांविरुद्ध तक्रार का दाखल करण्यात आली?
त्यांनी ख्रिस्ती समाजाविरुद्ध द्वेष निर्माण करणारे वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
2. तक्रार कुठे दाखल करण्यात आली होती?
छत्रपती संभाजीनगर येथील छावणी पोलीस स्टेशन येथे ही तक्रार दाखल करण्यात आली होती.
3. तक्रारीवर पोलिसांनी काय कारवाई केली?
पोलिसांनी कोणतीही दखल घेतली नसल्यामुळे समितीने न्यायालयात धाव घेतली.
4. न्यायालयाने काय आदेश दिले आहेत?
न्यायालयाने पडळकरांना प्रत्यक्ष उपस्थित राहून लेखी म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
5. या प्रकरणामुळे काय परिणाम दिसून येत आहेत?
या प्रकरणामुळे राजकीय आणि सामाजिक पातळीवर मोठी खळबळ उडाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.