लातूर : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर लातूर जिल्ह्यात भाजप महायुतीने जोरदार कमबॅक केले आहे. जिल्ह्यातील सहा पैकी पाच विधानसभेच्या जागा जिंकत महायुतीने महाविकास आघाडीला 'जोर का झटका' दिला आहे. लातूर ग्रामीणमध्ये भाजपचे रमेशअप्पा कराड हे जायंटकिलर ठरले आहेत. काँग्रेस महाविकास आघाडीच्या धीरज देशमुख यांचा पराभव करत त्यांनी गढीला हादरा दिला. लातूर शहर मतदारसंघात अमित देशमुख यांनी कसाबसा विजय मिळवला.
तिथेही भाजपच्या अर्चना पाटील चाकूरकर यांनी देशमुखांना कडवी झुंज दिली. लोकसभा निवडणुकीत निलंगा मतदारसंघातून काँग्रेसच्या डाॅ. शिवाजी काळगे यांना मताधिक्य मिळाल्यापासून इथे काय होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष होते. पण (Sambhajipatil Nilangekar) संभाजी पाटील निलंगेकर वेळीच सावध झाले आणि त्यांनी संपुर्ण मतदारसंघ पिंजून काढत चौथा विजय मिळवला. लोकसभेला धाराशिव जिल्ह्यात येणाऱ्या औसा विधानसभा मतदारसंघात देवेंद्र फडणवीस यांचे लाडके अभिमन्यू पवार दुसऱ्यांदा विजयी झाले.
याबद्दल फडणवीसांनी त्यांची पाठ थोपटत अभिनंदनही केले. राज्यात 'मी पुन्हा येईन' म्हणणारे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. अशावेळी त्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रीमंडळात आपली वर्णी लागावी यासाठी संभाजी पाटील निलंगेकर, (Abhimanyu Pawar) अभिमन्यू पवार आणि आता रमेश कराड यांनीही प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे. काँग्रेसच्या धीरज देशमुख यांचा पराभव करत कराड यांनी भाजपला मोठे यश लातूर जिल्ह्यात मिळवून दिले आहे. याचे बक्षिस मंत्रीपदाच्या रुपात आपल्याला मिळावे, अशी अपेक्षा ते बाळगून आहेत.
तर 2014 मध्ये राज्यात फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रीमंडळात मंत्री राहिलेल्या संभाजी पाटील निलंगेकर यांना पुन्हा संधी मिळेल, अशी आशा आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर स्थापन झालेल्या महायुती सरकारमध्ये मंत्री पद मिळेल, अशी अपेक्षा निलंगेकर यांना होती. परंतु तीन पक्षांचे सरकार असल्याने मंत्रीमंडळ विस्ताराला असलेल्या मर्यादा पाहता निलंगेकर शेवटपर्यंत वेटिंगवरच राहिले.
निलंगा विधानसभा मतदार संघातून चार वेळा निवडून आल्याने मंत्रीपदासाठी निलंगेकर यांचा पहिला दावा असणार आहे. पण त्यांना औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्याशी स्पर्धा करावी लागू शकते. या दोघांमधील वाद आणि ताणले गेलेले राजकीय संबंध पाहता एकाची निवड करणे जिकरीचे ठरणार आहे. या दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ झाला तर रमेशअप्पा कराडांची लाॅटरी लागू शकते, अशी चर्चा आहे. अर्थात लातूर जिल्ह्याला मंत्रीपद देताना नवे मुख्यमंत्री लोकसभा निवडणुकीत या नेत्यांचे योगदान काय होते? याचे प्रगती पुस्तक निश्चितच तपासतील यात शंका नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.