Uddhav Thackeray News : ठाकरे गटाचा काॅन्फिडन्स वाढला; उमरग्यात छोट्याऐवजी मोठ्या मैदानात होणार उद्धव यांची सभा

Shivsena News : उमरग्यातील कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला, १६ फेब्रुवारीची रद्द झालेली सभा होणार होती छोट्या मैदानात, आता ७ मार्च रोजी मोठ्या मैदानात होणार सभा
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Dharashiv Political News : गेल्या महिन्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा धाराशिव दौरा मराठा आरक्षण आंदोलन पेटल्यामुळे रद्द करण्यात आला होता. आता 6 आणि 7 मार्च रोजी हा दौरा होत आहे.

उमरगा येथे 7 मार्च रोजी उद्धव ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात सभेसाठी छोट्या मैदानाची निवड करण्यात आली होती. आता 7 मार्चला होणाऱ्या सभेसाठी मोठ्या मैदानाची निवड करण्यात आली आहे.

उमरगा येथील उद्धव ठाकरे यांचे एकेकाळचे बिनीचे सहकारी त्यांना सोडून शिंदे गटात दाखल झाले आहेत. सलग तिसरी टर्म आमदार असलेले ज्ञानराज चौगुले हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात आहेत. दोन वेळा आमदार आणि एक वेळा खासदार म्हणून निवडून आलले प्रा. रवींद्र गायकवाड हेही शिंदे गटात दाखल झाले आहेत.

माजी खासदार प्रा. गायकवाड आणि आमदार चौगुले यांचा तालुक्यात दांडगा जनसंपर्क आहे. ते सोबत नसल्यामुळे सभेला गर्दी होईल की नाही, अशी शंका ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना असावी. त्यामुळे छोटे मैदान निश्चित केले गेले असणार.

मागे उमरगा येथे सुषमा अंधारे यांची सभा झाली होती. त्यावेळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. तो अनुभव लक्षात घेऊन 7 मार्चची सभा मोठ्या मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. (Uddhav Thackeray News in Marathi)

Uddhav Thackeray
Lok Sabha Election 2024 : मोदी करिष्मा दक्षिणेतही चालणार; सर्व्हेमध्ये भाजपला मोठा दिलासा

ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख बाबूराव शहापुरे 'सरकारनामा'शी बोलताना म्हणाले, गेल्या महिन्यात सभेसाठी निवडलेली जागा छोटी होती. उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी मोठे मैदान निवडा, असे त्यावेळी लोकांनी स्वतःहून फोन करून आम्हाला कळवले होते.

गेल्या महिन्यात सभा रद्द झाली. त्यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या शिवाजीराव मोरे क्रीडा संकुलावर आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पुत्राच्या विवाहसोहळ्याची तयारी सुरू होती. त्यामुळे सभेसाठी ते मैदान उपलब्ध होऊ शकले नव्हते.

गेल्या महिन्यातील सभा रद्द झाल्यानंतर लोकांचे पुन्हा फोन सुरू झाले आणि मोठी जागा निवडा, अशी मागणी होऊ लागली. त्यामुळे 7 मार्चच्या सभेसाठी शिवाजीराव मोरे क्रीडा संकुलाची निवड करण्यात आली आहे. सायंकाळी 5 वाजता सभा होणार आहे. आमच्याकडे स्राेत कमी असले तरी उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी लोक स्वतःहून येतील, असा विश्वासही शहापुरे यांनी व्यक्त केला.

पक्षप्रमुख झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा उमरगा येथे हा पहिलाच दौरा आहे. राजकारणात सक्रिय झाल्यानंतर 2004 च्या विधानसभा निवडणुकीआधी ते एकदा उमरगा येथे आले होते. त्यानंतरही एकदा भगव्या सप्ताहानिमित्त उद्धव ठाकरे उमरग्याला आले होते.

1995 मध्ये उमरगा येथे बाळासाहेब ठाकरे यांची एेतिहासिक सभा झाली होती. त्यावेळीही उद्धव ठाकरे उमरगा येथे आले होते. मात्र, तेव्हा ते राजकारणात सक्रिय नव्हते. त्यावेळी ते त्यांचा फोटोग्राफीचा छंद जोपासत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बाळासाहेबांच्या या सभेला प्रचंड गर्दी झाली होती. ती गर्दी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात टिपली होती. उद्धव ठाकरे यांची 7 मार्चची सभा ज्या श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानावर होत आहे, त्याच महाविद्यालयात माजी खासदार गायकवाड हे प्राध्यापक होते आणि आमदार चौगुले हे प्रयोगशाळा सहायक होते.

एकेकाळच्या शिलेदारांचा समाचार घेणार?

माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड (Ravindra Gaikwad) आणि आमदार ज्ञानराज चौगुले हे एकेकाळी उद्धव ठाकरे यांचे बिनीचे शिलेदार होते. मात्र, एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) शिवसेनेतून बाहेर पडले, त्यावेळी आमदार चौगुले यांनीही त्यांच्यासोबत सूरतमार्गे गुवाहाटी गाठली होती.

सगळे स्थिरस्थावर झाल्यानंतर प्रा. गायकवाड यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. आमदार चौगुले हे शिंदे गटात गेले असले तरी त्यांनी कधीही ठाकरे गट किंवा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलेली नाही. प्रा. गायकवाड यांनीही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केलेली नाही.

असे असले तरी या दोघांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे या एकेकाळच्या आपल्या बिनीच्या शिलेदारांचा समाचार घेतात का, याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.

(Edited By : Sachin Waghmare)

R

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray News: धाराशिवच्या बालेकिल्ल्यातून उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com