

Chhatrapati Sambhajinagar News: काँग्रेस नेते राहुल गांधी यांची वाढती लोकप्रियता, लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर करण्याच्या विरोधकांच्या निर्णयात त्यांनी बजावलेली महत्त्वाची भूमिका सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या संघटनात्मक बांधणीसाठीच्या 'घटन सृजन अभियान'ची जोरदार चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर काँग्रेस शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची संख्या वाढली आहे.
काँग्रेस पक्षाने पाठवलेल्या निरीक्षकांनी शहरातील पदाधिकारी, काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधत शहराध्यक्ष पदासाठी सक्षम चेहरा देणार असल्याचे म्हटले आहे. राज्यासह मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काँग्रेस पक्षाकडून नव्याने संघटनात्मक बांधणी, शहर-जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर ही मराठवाड्याची राजधानी असलेले शहर आहे. या शहर आणि जिल्ह्यावर काँग्रेस पक्षाचे अनेक वर्ष वर्चस्व होते.
सध्या काँग्रेसची पाटी छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्ह्यात कोरी असली तरी या पक्षाला मिळणारा प्रतिसाद उत्साह वाढवणार आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सुरू केलेल्या मोहिमेला संभाजीनगरमध्ये चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
शहरातील संघटन मजबूत करण्यासाठी शहराध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे. या पदासाठी तब्बल 35 इच्छुकांनी दावा केला आहे. विविध समाजघटकांचा समतोल राखत सोशल इंजिनिअरिंगवर पक्षाकडून भर दिला जात आहे.
शहर आणि जिल्ह्यात एमआयएम पक्षाला मिळणारा वाढता पाठिंबा पाहता काँग्रेस पक्ष शहराध्यक्ष पदासाठी मुस्लिम चेहरा देणार, अशी देखील चर्चा आहे. इच्छुकांच्या मुलाखती व राजकीय ताकदीची चाचपणी सुरू असून दिल्लीतील निरीक्षक विवेक बन्सल यांनी शहरात मुक्काम करून पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांची मते जाणून घेतली आहेत. नुक्त्याच झालेल्या महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसला जेमतेम यश मिळाले आहे.
गेल्या पंधरा वर्षात जिल्ह्यात काँग्रेसचा एकही खासदार, आमदार निवडून आलेला नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही काँग्रेसचा आकडा घसरलेला आहे. अशाही परिस्थितीत काँग्रेस पक्षासोबत काम करणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. देशपातळीवर राहुल गांधी, प्रियांका गांधी यांचे नेतृत्व आणि महाराष्ट्रात हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी घेतलेली कडक भूमिका याचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.