

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये तणाव वाढला आहे.
आमदार शिवाजी पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप केले असून वाद तीव्र झाला आहे.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मध्यस्थी करत बैठका घेतल्या तरी वाद कायम असल्याचे दिसत आहे.
kolhapur gokul dairy election allegations : गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादीतच आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असून थेट ईडीचा इशारा दिला जात आहे. आता भाजप समर्थक अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोपही केले आहेत.
तर गोकुळचा पैसा भाजपला संपवण्यासाठी वापरला जात असल्याचा आरोप आमदार पाटील यांनी करून राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा संघर्ष आणखी वाढला आहे. दरम्यान आता उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आमदार पाटील यांनी मांडलेल्या आक्रमक भूमिकेमुळे या वादात तेल ओतले गेले आहे. त्यांनी ‘जिल्ह्यातील भाजप संपवायला निघालेले लोक ‘गोकुळ’च्या राजकारणात सोबत नकोच’, अशी भूमिका मांडली आहे. ज्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
गोकुळच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे वातावरण चांगलेच तापले असताना आता आमदार पाटील यांच्या आक्रमक भूमिकेमुळे जिल्ह्याचे रण आणखी तापण्याची शक्यता आहे. गोकुळ दूध संघाच्या कारभारावरून हसन मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप आमदार पाटील यांनी केले. तसेच थेट ईडीला पाचारण करण्याचा इशाराच आमदार पाटील यांनी दिला. या आरोपामुळे कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा संघर्ष वाढला असतानाच आता उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वादावर पडदा पाडण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
पण त्यांच्याकडे आमदार पाटील यांनी, ‘जिल्ह्यातील भाजप संपवायला निघालेले लोक ‘गोकुळ’च्या राजकारणात सोबत नकोत’, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. तर याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ, असे आश्वासन मंत्री पाटील यांनी दिल्याचे समजते.
‘गोकुळ’च्या राजकारणात आमदार पाटील यांनी ‘एंट्री’ केल्यानंतर त्यांनी थेट वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरच दोन दिवसांपूर्वी तोफ डागली. मंत्री मुश्रीफ हे ‘गोकुळ’च्या पैशांतून जिल्ह्यातील भाजप संपवायला निघालेत, असा थेट आरोप त्यांनी केला होता. या आरोपावरून महायुतीतच सर्व काही अलबेल नसल्याचे पुढे आले. या पार्श्वभूमीवर आज मंत्री चंद्रकांत पाटील व आमदार पाटील यांच्यात ताराराणी चौकातील एका हॉटेलमध्ये चर्चा झाली.
या चर्चेत आमदार पाटील यांनी आपली आक्रमक भूमिका मांडल्याचे समजते. ‘गोकुळ’मध्ये महायुतीची सत्ता असेल आणि महायुती म्हणून एकत्रित लढायचे असेल तर जे लोक जिल्ह्यातील भाजप संपवायला निघालेत, त्यांना कोणत्याही परिस्थितीत सोबत घेऊ नये, अशी ठाम भूमिका आमदार पाटील यांनी मंत्री पाटील यांच्यासमोर मांडल्याचे समजते. यावेळी आमदार पाटील यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार पक्षांकडून आजरा, गडहिंग्लजसह चंदगडमध्ये भाजप आणि पर्यायाने महायुतीच्या विरोधात केलेल्या कारवाईचा पाढाच मंत्री पाटील यांच्यासमोर वाचून दाखवला.
आमदार पाटील यांनी अनेक विषयांवर मंत्री पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यातून त्यांनी ‘गोकुळ’च्या राजकारणात कोणत्याही परिस्थितीत भाजप संपवायला निघालेले लोक सोबत नकोत, अशी ठाम भूमिका घेतली. त्यावर प्रत्यक्ष निवडणूक लागल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्याचे आश्वासन मंत्री पाटील यांनी दिले.
मंत्री पाटील-अमल महाडिक यांच्यात चर्चा
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची आमदार अमल महाडिक व ‘गोकुळ’च्या संचालिका शौमिका महाडिक यांनीही भेट घेतली. या भेटीचा तपशील समजला नाही; पण, त्यात ‘गोकुळ’च्या राजकारणात कोण सोबत राहील, कोण विरोधात जाईल, यावर चर्चा झाल्याचे समजते.
महायुतीमध्ये वाद नको
आमदार पाटील यांच्या या भूमिकेला भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांचे समर्थन असल्याचे दिसत आहे. यावरून चंद्रकांतदादा पाटील देखील हतबल झाले झा्लयाचे दिसत आहे. तर याबाबत लवकरच मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करू, पुन्हा बैठक घेऊ असे आश्वासन चंद्रकांतदादांनी दिले आहे. तर यावेळी त्यांनी आमदार पाटील यांच्यासह इतरांना महायुतीमध्ये वाद निर्माण होतील अशी वक्तव्य कोणीही करू नका अशा सक्त सूचना केल्या आहेत.
आज एका हॉटेलमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. या भेटीत आपण ‘गोकुळ’च्या राजकारणात जे लोक जिल्ह्यातील भाजप संपवायला निघालेत त्यांना सोबत न घेण्याची विनंती केली. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले.
-शिवाजीराव पाटील, आमदार (चंदगड)
1. गोकुळ प्रकरणात वाद का निर्माण झाला आहे?
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांमुळे वाद वाढला आहे.
2. शिवाजी पाटील यांनी कोणावर आरोप केले?
त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
3. या वादात कोणते पक्ष आमने-सामने आहेत?
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात संघर्ष आहे.
4. चंद्रकांत पाटील यांनी काय भूमिका घेतली?
त्यांनी दोन्ही बाजूंमध्ये समन्वय साधण्यासाठी बैठका घेतल्या.
5. या वादाचा पुढे काय परिणाम होऊ शकतो?
जिल्ह्यातील राजकारण अधिक तापण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.