स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निलंगा तालुका काँग्रेसमध्ये निलंगेकर आणि देशमुख गटांमध्ये वाद वाढला आहे.
या गटबाजीमुळे काँग्रेसची निवडणूक तयारी आणि एकजूट धोक्यात आली आहे.
प्रदेश नेतृत्व या वादावर मध्यस्थी करून तडजोड साधण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती मिळते.
राम काळगे
Latur Political News : लातूर जिल्हा काँग्रेसमध्ये सध्या अंतर्गत गटबाजी जोरात सुरू असली तरी जुन्या जेष्ठ नेत्यांनी कधीकाळी एकीच्या जोरावर पक्ष एकसंध ठेवला होता. माजी मुख्यमंत्री दिवंगत शिवाजीराव पाटील निलंगेकर, विलासराव देशमुख व माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर असे समीकरण गेल्या अनेक वर्षापासून चालत आले आहे. मात्र विधानसभा निवडणुकीपासून निलंगा विधानसभा मतदारसंघात निलंगेकर विरुद्ध देशमुख असे दोन गट निर्माण झाले आहे.
अशोक पाटील निलंगेकर गटाने त्यांना डावलण्यात येत असल्याची कैफियत थेट प्रदेश काँग्रेसकडे मांडली आहे. त्यामुळे तोंडावर असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस मधील देशमुख व निलंगेकर गटाला शांत करून एकत्र काम करायला राज्यातील वरिष्ठ नेते यशस्वी ठरतात का? यावर स्थानिक निवडणुकीतील यश अवलंबून असणार आहे. माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा निलंगा मतदार संघात मोठा दबदबा होता. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे प्राबल्य स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये असायचे.
निलंगा मतदारसंघाला देश व राज्य पातळीवर लौकिक मिळवून देणाऱ्या शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य काँग्रेस पक्षामध्ये घालवले. एकेकाळी लातूर जिल्ह्यात त्यांना विचारल्या शिवाय पक्षात काडीही हालत नव्हती. मात्र आज त्यांच्याच राजकीय वारसांची काँग्रेस पक्षात परवड होताना दिसत आहे. जिल्ह्यात शिवाजीराव पाटील निलंगेकर, शिवराज पाटील चाकूरकर, विलासराव देशमुख यांनी समन्वय ठेवत एकहाती सत्ताकेंद्र ताब्यात ठेवली होती.
कुठलाही राजकीय निर्णय घेताना एकमेकांशी विचार-विनीमय करून तो घेतला जायचा. मात्र सध्या राजकीय परिस्थिती बदलली आहे. निलंगा विधानसभा मतदारसंघातून या निवडणुकीत काँग्रेसने 62 वर्षांपासूनची परंपरा खंडित करत अभय सोळुंके यांना उमेदवारी दिली होती. ही उमेदवारी लातूर शहरचे आमदार अमित देशमुख यांच्यामुळेच देण्यात आली असल्याचे स्पष्ट आहे. निलंगेकर निष्ठावंत यामुळे कमालीचे व्यथित झाले होते. यापूर्वीही अभय सोळंके यांना पाठबळ देण्याचे काम लातूरातून होत असल्यामुळे निष्ठावंत निलंगेकर विरुद्ध देशमुख असा संघर्ष विधानसभा निवडणुकीत निर्माण झाला.
अभय सोळंके यांना पडलेले मताधिक्य पाहता व त्यांचा निसटता पराभव झाल्याने काँग्रेस पक्षश्रेष्ठीने त्यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. ऐन निवडणुकीच्या काळातच निलंगा काँग्रेसमधील दोन गटातील वाद चव्हाट्यावर येत असून खरा निष्ठावंत कोण? या वादात दोन गटात जुंपली आहे. त्यामुळे आता कार्यकर्ते संभ्रमात असून जुन्या व नव्या गटात निर्माण झालेल्या वादात कार्यकर्त्याची गोची होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्षश्रेष्ठी या दोन गटांना एकत्रित करून निवडणूकीला सामोरे जाणार का? असा प्रश्न आहे.
याबाबत पक्षश्रेष्ठी निलंगेकर-देशमुख यांच्या समेट घडवून आणण्यात यशस्वी होतात का? याकडेही सगळ्यांचे लक्ष लागले आहे. निलंगेकर व देशमुख गटाची कैफियत थेट राज्य पातळीवरील काँग्रेस श्रेष्ठींकडे गेल्याने यावर निश्चित तोडगा काढला जाईल, असा विश्वास स्थानिक कार्यकर्त्यांना आहे. ही गटबाजी रोखली नाही, तर मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत बंडखोरी उफाळून आल्याशिवाय राहणार नाही. यापूर्वीच्या जिल्ह्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचे वैचारिक मतभेद असले तरी त्यांनी ते वैयक्तिक पातळीपर्यंत कधी येऊ दिले नाही.
1. लातूर काँग्रेसमध्ये नेमकी गटबाजी कशामुळे झाली?
→ निलंगेकर आणि देशमुख गटांमध्ये स्थानिक निवडणुकीतील तिकीटवाटपावरून मतभेद झाले आहेत.
2. या वादाचा काँग्रेसच्या निवडणुकीवर काय परिणाम होईल?
→ गटबाजी कायम राहिल्यास पक्षाच्या उमेदवारांना मतविभाजनाचा फटका बसू शकतो.
3. प्रदेश काँग्रेस नेतृत्व या प्रकरणात काय करत आहे?
→ प्रदेश नेते दोन्ही गटांमध्ये तोडगा काढण्यासाठी बैठक घेणार आहेत.
4. निलंगेकर आणि देशमुख गटांचे प्रभावक्षेत्र कोणते आहे?
→ निलंगेकर गटाचा प्रभाव निलंगा परिसरात तर देशमुख गटाचा लातूर जिल्ह्यामध्ये आहे.
5. काँग्रेसमध्ये एकजूट होण्याची शक्यता आहे का?
→ सध्या परिस्थिती तणावपूर्ण असली तरी प्रदेश नेतृत्वाच्या हस्तक्षेपानंतर काही प्रमाणात तोडगा निघू शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.