नीलकंठ कांबळे
Dharashiv News : राजकारणात कधी काय घडेल अन् कोण कुठल्या पक्षात जाईल याचा नेम नाही. सध्या राज्याच्या राजकारणात असाच प्रकार पाहावयास मिळत आहे. एकीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशात ‘मोहब्बत’चे दुकान उघडून काँग्रेसला मजबूत करण्याचा प्रयत्न करत असताना, मात्र अनेक ज्येष्ठ नेत्यांसह पहिल्या व मधल्या फळीचे कार्यकर्ते काँग्रेस पक्ष सोडून सोयीच्या पक्षात प्रवेश करीत आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) बुधवारी उस्मानाबाद दौऱ्यावर होते. या वेळी त्यांच्या उपस्थित ढोकी येथे शिवसेनेच मेळावा पार पडला. या प्रसंगी काँग्रेसचे लोहारा येथील विद्यमान तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांनी आपल्या समर्थकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेनेमध्ये प्रवेश केला. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश करून काँग्रेस पक्षाला मोठा धक्का दिला आहे.
गेल्या दीड-दोन वर्षांत लोहारा तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षाला सोडून अन्य पक्षांशी घरोबा केलेला आहे. आता काँग्रेस पक्षाचे विद्यमान तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांनी अचानकपणे शिवसेनेत प्रवेश करून काँग्रेस पक्षाला धक्का दिला आहे. माजी राज्यमंत्री तथा काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांचे लोहारा तालुक्यावर एक हाती वर्चस्व आहे. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन गेली अनेक वर्षांपासून अमोल पाटील तालुकाध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बसवराज पाटील (Baswraj Patil) भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा समाज माध्यमांवर रंगल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत, अशा स्थितीत तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश करून काँग्रेस कार्यकर्त्यांना बुचकळ्यात टाकले आहे.
(Edited By- Sachin Waghmare)