
Chhatrapati Sambhajinagar : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने संघटनात्मक बांधणी नव्याने केली आहे. काही जिल्ह्यांमध्ये भाकरी फिरवल्याचे चित्र असले तरी छत्रपती संभाजीनगर आणि शेजारच्या जालन्यामध्ये जुन्याच चेहर्यांना पसंती देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या वीस-पंचवीस वर्षात काँग्रेसला लोकसभा, विधानसभा निवडणुकीत प्रतिनिधित्व मिळालेले नाही. तर जालन्यामध्ये माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी नुकताच पक्षाला रामराम ठोकला आहे.
या पार्श्वभूमीवर काल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) हे जालना जिल्हा दौऱ्यावर होते. काँग्रेसचे माजी मंत्री सुरेश वरपूडकर, माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या भाजपा प्रवेशावरून सपकाळ यांनी संताप व्यक्त केला होता. भाजपाला लाज वाटली पाहिजे, आमचे लोक भय आणि लालसे पोटी तिकडे जात आहेत. काँग्रेस पक्ष हा नेत्यांचा नाही तर कार्यकर्त्यांचा आहे. आम्ही नव्या दमाचे नेतृत्व देऊ असे जाहीर केले होते. त्यानंतर आज काँग्रेस पक्षाने प्रदेश कमिटीसह जिल्हा स्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. खासदार कल्याण काळे यांच्याकडून जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे.
जालन्याचे खासदार कल्याण काळे यांची या नियुक्त्यांवर छाप असली तरी यामध्ये नव्या दमाचे फारसे कोणी दिसत नाहीत. जुन्याच चेहर्यांना पुढे करत काँग्रेस (Congress) आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मैदानात उतरली आहे. लोकसभा निवडणुकीत जालना, लातूर या दोन मतदारसंघात काँग्रेस पक्षाला यश मिळाले होते. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत मात्र लातूरमध्ये शहरची जागा वगळता जालन्यात पक्षाला पराभव स्वीकारावा लागला होता.
किरण डोणगांवकर जिल्हाध्यक्ष
जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष असलेल्या किरण पाटील डोणगांवकर यांच्यावर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षाने जबाबदारी सोपवली आहे. माजी मंत्री अशोक पाटील डोणगांवकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात पक्षात किरण पाटील डोणगांवकर यांना जिल्हास्तरावर काम करण्याची संधी वरिष्ठांनी दिली आहे. याचा किती फायदा जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसला होतो हे लवकरच स्पष्ट होईल.
माजी मंत्री अनिल पटेल, माजी आमदार एम.एम.शेख यांना प्रदेश स्तरावर उपाध्यक्ष पदी नियुक्ती देण्यात आली आहे. अनिल पटेल हे पक्षात सक्रीय होते, परंतु एम.एम. शेख हे प्रकृतीच्या कारणामुळे पक्षाच्या कार्यक्रमात आणि कामात गेल्या कित्येक वर्षात सहभागी झालेले नाहीत. कल्याण दळे, राजेंद्र राख यांनाही प्रदेश स्तरावर कामाची संधी पक्षाने दिली आहे. फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेले विलास औताडे यांच्यावर सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
विधान परिषदेचे आमदार राजेश राठोड, कमाल फारुकी, जितेंद्र देहाडे आणि छत्रपती संभाजीनगरमधून पुर्वमधून विधानसभा लढवलेले लहुजी शेवाळे, प्रा. मोहनराव देशमुख हे सरचिटणीस म्हणून जिल्ह्यात काम पाहणार आहेत. रविंद्र काळे, डाॅ. जफर खान, अॅड. सय्यद अक्रम, सरताज पठाण, अशोक डोळस यांची सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या संपूर्ण यादीवर नजर टाकली तर कुठेही नव्या चेहऱ्यांना संधी मिळालेली नाही हे स्पष्ट होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.