
उमेश वाघमारे
BJP Politics : काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा भाजपा प्रवेश निश्चित झाला आहे. या माध्यमातून जालन्याच्या पहिल्याच महापालिका निवडणुकीत भाजपाचा महापौर बसवण्याचा स्थानिक नेत्यांचा प्रयत्न आहे. शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या आग्रहानंतर नगर परिषदेचे रुपांतर महापालिकेत झाले. आता त्याच महापालिकेत खोतकरांना रोखण्याची रणनीती रावसाहेब दानवे- कैलास गोरंट्याल यांनी आखल्याची चर्चा सुरू झाली आहे.
भाजपामध्ये प्रवेश करताना आपण कोणत्याही अटी-शर्थी टाकलेल्या नाहीत, परंतु नेत्यांनी मला विचारले तर महापालिकेत पक्षाने स्वबळावर लढावे, असे मी त्यांना सांगणार असल्याचे कैलास गोरंट्याल (Kailas Gorantyal) यांनी काल म्हटले होते. यावरून भाजपाचे इरादे स्पष्ट झाले आहेत. कैलास गोरंट्याल यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यानंतर महापालिका निवडणुकीच्या जागा वाटपात महायुतीतच खटके उडणार आहे. यातून भाजपा स्वबळाचा नारा देऊन खोतकर आणि शिवसेनेला रोखण्याचा प्रयत्न करणार, एवढे मात्र निश्चित.
जालना महापालिकेला होऊन ऑगस्ट महिन्यात 2 वर्ष पूर्ण होतील. त्यात नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजू शकते. परंतु, पहिल्य मनपा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होईल असे चित्र आतापर्यंत होते. (Jalna) मात्र काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या भाजपा प्रवेशाच्या निर्णयाने निवडणुकीचे गणित बदलणार आहे. कैलास गोरंट्याल आणि शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर हे पक्के राजकीय विरोधक आहे. त्यामुळे गोरंट्याल भाजपमध्ये गेल्यानंतर जागा वाटपावरून महायुतीमध्ये मोठा तेढ निर्माण होऊ शकतो.
जिल्ह्यात महायुतीचे पारडे जड आहे, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पाटी कोरी राहिली. कैलास गोरंट्याल यांचा त्यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांच्याकडून पराभव झाला. या पराभवाला काँग्रेसचे स्थानिक नेते, पदाधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप गोरंट्याल यांनी केला आहे. पक्षाने आपल्याला वाऱ्यावर सोडल्याचे सांगत त्यांनी आक्रमक भूमिका घेत थेट काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला. भाजपमध्ये प्रवेश करण्याआधीच दानवे-गोरंट्याल यांनी महापालिकेसाठीची रणनीती आखली आहे. त्यामुळे महापौरपदासह जागा वाटपात ओढाताण होणार एवढे मात्र निश्चित.
कैलास गोरंट्याल भाजपमध्ये आले तर त्यांच्यासोबत येणाऱ्या पदाधिकाऱ्यांना देखील जागा सोडाव्या लागणार आहेत. त्यात मागील दहा वर्षांपासून गोरंट्याल यांच्या ताब्यात महापालिका आहे. अशात गोरंट्याल महापौरपदासाठी कायम आग्रही राहतील. रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वात काम करण्याची तयारी गोरंट्याल यांनी दाखवली तर कदाचित ही संधी त्यांना दिली जाऊ शकते. भाजपमधील निष्ठावंतही महापौरपदाची खुर्चीकडे डोळे लावून बसले आहेत. तर महायुतीचा घटक पक्ष असलेले शिवसेनेचे नेते आमदार अर्जुन खोतकर यांनी शिवसेनेचा महापौरपदाच्या उमेदावारीचा दावेदारही घोषित केला असून शिवसेना निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. त्यामुळे गोरंट्याल यांचा भाजप प्रवेश झाला तर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होण्याएवजी ती महायुतीमध्ये होण्याची अधिक शक्यता आहे.
नगर परिषदेवर होती काँग्रेसची सत्ता
जालना नगर परिषदेवर भाजपचा नगराध्यक्ष आतापर्यंत झालेला नाही. दहा वर्ष शिवसेनेचा तर दहा वर्ष काँग्रेसचा नगराध्यक्ष या ठिकाणी होता. या सत्तेच्या वाट्यात राष्ट्रवादीसह भाजपचा देखील सहभाग होता. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता असताना राजेश राऊत उपनराध्यक्ष होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठ देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ते उपनगराध्यक्ष पदावर कायम राहिले. त्यामुळे वीस वर्ष तत्कालीन नगरपालिकेत सर्व राजकीय पक्षांना सत्ता मिळाली. मात्र, मागील वीस वर्षांमध्ये भाजपचा नगराध्यक्ष झाला नाही. त्यामुळे भाजपकडून यंदा होणाऱ्या निवडणुकीत महापौरपदासाठी ताकद लावली जाणार आहे.
आता भाजपमध्ये कैलास गोरंट्याल यांना प्रवेश दिल्यानंतर त्यांच्या सोबत आलेल्या एखाद्या पदाधिकाऱ्याला ही संधी मिळते? की भाजपमधील निष्ठावंताला पहिला महापौर होण्याचा मान मिळतो याकडे सगळ्याचे लक्ष असणार आहे. कैलास गोरंट्याल, अर्जुन खोतकर एकमेकांचे पक्के विरोधक आहेत. त्यामुळे गोरंट्याल यांचा भाजप प्रवेश झाल्यानंतर महायुतीमधील घटक पक्ष म्हणून खोतकर, गोरंट्याल एकत्र येतील असे वाटत नाही. त्यामुळे कैलास गोरंट्याल यांच्या प्रवेशानंतर मनपा निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये भाजप, शिवसेनेकडून स्वतंत्र चूल मांडली जाऊ शकते. त्यामुळे मनपा निवडणुकीतील महायुतीचे गणित बदलू शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.