Jalna Congress News : भाजपाने काँग्रेसमुक्त भारतचा नारा दिला होता, पण ज्या संख्येने इतर पक्षातील नेते अन् पदाधिकारी त्यांच्याकडे जात आहेत, ते पाहता भाजपाच आता काँग्रेसयुक्त झाला आहे. भय, लालसेपोटी काँग्रेसमधील नेते आणि पदाधिकारी भाजपात प्रवेश करत आहेत. तर काही जणांना ईडीची भिती दाखवली जात आहे. वरपूडकर, गोरंट्याल यांना पक्षाने पद, निवडणुकीची तिकीटं दिली, तरी ते पक्ष सोडून गेले. पण नेते गेले म्हणून पक्ष संपत नसतो, काँग्रेस हा नेत्यांचा नाही, तर कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आम्ही नव्या दमाचे नेतृत्व उभे करू, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला.
जालना शहरात काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी माध्यमांशी संवाद साधला. वरपूडकर, गोरंट्याल यांच्या भाजपातील प्रवेशामुळे ते संतापले होते. या संतापाच्या भरातच त्यांनी भाजपाला लाज वाटली पाहिजे, असे म्हणत राग व्यक्त केला. ज्यांना पक्षातून जायचेच होते, त्यांनी आता कितीही आरोप केले तरी त्याला अर्थ उरत नाही. त्यांनी आता जिथे जाल तिथे सुखी राहा, असा टोलाही सपकाळ यांनी वरपूडकर, गोरंट्याल यांना लगावला.
गेल्या अनेक दिवसांपासून माजी आमदार गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगत होत्या. मात्र त्यांनी मंगळवारी ( ता. 29) प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जालना दौऱ्यावर असताना काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. गेली 30 ते 35 वर्षापासून काँग्रेसचा (Congress) एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून प्रामाणिक काम केले. परंतु वैयक्तिक अडचणीमुळे आता पक्षाचे काम करू शकणार नाही. त्यामुळे राजीनामा देत असल्याचे त्यांनी नमूद केले. परंतु आपल्याकडे अद्याप गोरंट्याल यांचा राजीनामा आला नसल्याचे सपकाळ यांनी सांगितले.
मी म्हणणारा माणूस पक्ष सोडून जातो, तेव्हा तो एकटाच जातो त्याच्यासोबत कार्यकर्ता जात नाही. म्हणजेच काँग्रेस हा नेत्यांचा नाही तर कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. ज्यांनी पक्षात राहून तिकिटे घेतली, मोठी पदे भोगली ते आज काँग्रेस सोडताना आरोप करत आहेत. हा पक्षाने केलेल्या उपकाराचा आणि दिलेल्या संधीचा अपमान आहे. माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची खासदार काळे यांनी भेट घेऊन समजूत काढली, पण त्यांना पक्ष सोडायचाच होता, असेही सपकाळ म्हणाले.
मोदींचा करिष्मा संपला
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका करताना हा पक्ष आता पोकळ झाला असून नरेंद्र मोदींचा करिष्मा संपला असल्याचे सपकाळ म्हणाले. राज्यामध्ये दुसऱ्या पक्षातील नेत्यांना ब्लॅकमेल करून पक्षात घ्यावे लागत आहे. इतर पक्षाचे नेते घेताना भाजपला लाज वाटली पाहिजे, पण त्यांनी लाज गुंडाळून ठेवली आहे. काँग्रेसमुक्त भारताची घोषणा करणारा भाजपा पक्ष आता काँग्रेसयुक्त झाला आहे. राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने कर्जमाफीची घोषणा प्रत्यक्ष अंमलात आणावी. मात्र या सरकारने विधीमंडळाला बॉक्सिंग क्लब करून ठेवले आहे, अशी टीकाही सपकाळ यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.