Nanded Political News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी टिकणार नाही हे जवळपास स्पष्ट झाले आहे. वरिष्ठ पातळीवर स्थानिक नेत्यांना अधिकार देण्यात येणार असल्याने मतांचे गणित जुळविण्यासाठी नवे पर्याय आणि समीकरणं पुढे येऊ शकतात. छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक नेत्यांमध्ये प्राथमिक स्तरावर एकत्रित येण्यासंदर्भात बैठक झाली आहे. त्यानंतर आता नांदेडमध्ये 'काँग्रेस का हात' वंचितच्या हातात दिला जाऊ शकतो, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
नांदेडचे खासदार रविंद्र चव्हाण यांनी याबाबत अजून बोलणी सुरू झाली नसली तरी स्थानिक पातळीवर असा सूर निघत असल्याचे मान्य केले. दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडून आघाडीचे संकेत मिळत असल्याने वरिष्ठ स्तरावरील नेते याकडे कसे बघतात? यावर हे नवे समीकरण ठरणार आहे. स्थानिक नेत्यांमध्ये अनौपचारिक चर्चा झाल्याची माहिती आहे. थेट बोलणी झाली नसली तरी प्रस्ताव आल्यास विचार करू, असे काँग्रेस (Congress) आणि वंचित आघाडीकडून सांगितले जात आहे.
महायुतीला रोखण्यासाठी समविचारी पक्षांसोबत युती करण्याचे अधिकार पक्ष नेत्यांनी स्थानिक पातळीवर दिले आहेत. महाविकास आघाडी व महायुतीतील सर्व पक्षांची हीच भूमिका आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अनेक आश्चर्यकारक युती, आघाडी होताना पहायला मिळू शकते. वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aaghadi) सेक्युलर पक्ष आहे असे मत काँगेसचे खासदार रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त करत या नव्या आघाडीची शक्यता वर्तवली आहे. अज्ञाप आमची चर्चा झाली नाही. मात्र वंचितकडून प्रस्ताव आला तर जिल्हाकार्यकारणी विचार करेल, त्यानंतर प्रदेश काँगेसचा सल्ला घेऊन पुढील दिशा ठरवली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
वंचित काँगेससोबत आली तर सेक्युलर मतांची विभागणी टळेल आणि दोन्ही पक्षाला त्याचा फायदा होईल, असा विश्वासही रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे काँगेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी युती बाबत सकारात्मक्ता दाखवली असेल तर आम्ही स्वागत करतो, अशी प्रतिक्रीया वंचितचे राज्य उपाध्यक्ष फारुख अहेमद यांनी दिली आहे. मात्र काँगेस पक्षाने खासदार चव्हाण यांना युती बाबत बोलणी करण्याचे अधिकृत अधिकार दिले आहेत का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
गेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या वेळेस काँगेसने युतीबाबत चर्चा केली, पण ती चर्चा पुर्णत्वास गेली नाही, तसे पुन्हा होऊ नये, याची काळजी घेणे गरजेचे आहे, असा सल्लाही अहेमद यांनी दिला आहे. त्यांना वरिष्ठांनी आदेश दिले असतील तर चर्चेसाठी स्वागत आहे, त्यांच्याकडून प्रस्ताव आला तर वरिष्ठांची मान्यता घेऊन त्यांना प्रतिसाद देऊ, असे ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.