Aurangabad Political News : मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे अमृतमहोत्सवी वर्ष सुरू आहे. या निमित्ताने राज्याचे मंत्रीमंडळ शहरात बैठक घेणार आहे. त्यासाठीची तयारी प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. पण नुसत्या बैठका घेऊन मराठवाड्याचा विकास होणार नाही. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पत्र्यांच्या शेडमध्ये भरणाऱ्या साडेतीन हजार शाळांमधील वर्गखोल्यांसाठी पाचशे कोटींचा निधी द्या, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
या संदर्भातील पत्र नुकतेच इम्तियाज (Imtiaz Jaleel) यांनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांना पाठवले आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त सिध्दार्थ उद्यानातील स्मृतीस्तंभाजवळ ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय कार्यक्रम घेतला जातो. (Aimim) याची तयारी म्हणून विविध स्तरावर बैठका सुरु आहेत. परंतु सद्यस्थितीत मराठवाड्याचा सर्वांगिण विकास झालेला आहे का ? सर्वसामान्य जनता आजही मुलभुत सुविधेपासून वंचित आहे, ही वस्तुस्थिती आहे. लोकहिताचे अनेक प्रकल्प व प्रस्ताव प्रलंबितच आहेत.
मंत्रालयातील सर्वच विभागाकडून मराठवाड्यावर सतत अन्याय होत असतो. मग नुसत्या बैठका घेऊन मराठवाड्याचा विकास साधला जाणार आहे का? असा सवालही इम्तियाज यांनी पत्रातून केला आहे. (Aurangabad) मुख्यमंत्र्यांनी यावेळी आश्वासने व भाषण न देता गोरगरीब विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करावा. जिल्ह्यातील ८३२ शाळांतील ३३३५ पत्र्याच्या वर्गखोल्यांचे व मोडकळीस आलेल्या वर्गखोल्यांचे पक्के बांधकामासाठी ५०० कोटीच्या विशेष पॅकेजची घोषणा करावी, अशी मागणीही पत्राद्वारे करण्यात आली आहे.
केवळ घोषणाच नाही तर निधीही तातडीने उपलब्ध करून द्यावा. संविधानाने शिक्षणाचा समान अधिकार सर्वांना दिलेला आहे. शिक्षणापासुन कोणीही वंचित राहु नये याकरिता केंद्र व राज्य शासनाने अनेक योजना राबवते. विविध लेखाशिर्ष अंतर्गत दरवर्षी कोट्यावधीचा निधी शाळांचा दर्जा, पायाभुत सुविधेकरिता खर्च करत असल्याची माहिती प्रत्येक बैठकीत शासनाच्या वतीने देण्यात येते. परंतु वस्तुस्थिती तशी नाही, जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेच्या एकूण ३३३५ वर्गखोल्या आजपण पत्र्याच्या आहेत.
शेकडो वर्गखोल्या मोडकळीस आलेल्या आहेत. त्याच वर्गखोल्यात बसुन गोरगरीब, होतकरु विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही बाब संपुर्ण मराठवाड्यासाठी लाजिरवाणी, अशोभनीय व चिंताजनक आहे. विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या शैक्षणिक, भौतिक व मुलभुत सुविधा मिळाव्यात, शाळांचा दर्जा सुधारावा तसेच पायाभुत सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शाळांचा पाहणी दौरा केला असता त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या अनेक शाळेतील विद्यार्थी हे टिनशेडच्या वर्गखोल्यांमध्ये शिक्षण घेत असल्याचे निदर्शनास आले होते.
तालुकानिहाय पत्र्याच्या वर्गखोल्यांची संख्या संभाजीनगर १३७ शाळेतील ५१२ वर्गखोल्या, कन्नड १३५ शाळेतील ५४९, खुलताबाद ३१ शाळेतील १२०, गंगापूर १२४ शाळेतील ४८४, पैठण १३१ शाळेतील ४८६, फुलंब्री ५९ शाळेतील २४४, वैजापूर १४७ शाळेतील ६४८, सिल्लोड ३८ शाळेतील १८५, तर सोयगाव तालुक्यातील ३० शाळेतील १०७ वर्गखोल्या अशा एकूण ८३२ शाळेतील ३३३५ वर्गखोल्या आहेत.
या आणि इतर मोडकळीस आलेल्या वर्गखोल्यांचे बांधकाम करणे अत्यावश्यक असल्याचे जिल्हा परिषद शिक्षण विभागाने केलेल्या सर्व्हेक्षणाच्या अहवालात नमुद केले आहे. त्यामुळे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात मंत्रीमंडळाची केवळ बैठक घेऊ नका, तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न लक्षात घेऊन निधीही द्या, अशी अपेक्षाही इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली.
Edited By : Jagdish Pansare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.