Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा भागात रामनवमीच्या आदल्या दिवशी दोन गटांत बाचाबाची झाली. त्याचं रुपांतर तुफान राड्यात झालं. यानंतर वाद विकोपाला गेला आणि हाणामारी, दगडफेकीसह पोलिसांच्या आणि खासगी मिळून अशा एकूण 13 गाड्या जाळण्यात आल्या आहेत. यामुळे शहरात तणावाचं वातावरण होतं.
परंतू, एकीकडे पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असतानाच विरोधकांकडून सत्ताधारी भाजप व शिवसेनेवर जोरदार टीका केली जात आहे. यावरुनच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांनी खडेबोल सुनावलं आहे.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी छत्रपती संभाजीनगरमधील हिंसाचारावर भाष्य केलं आहे. फडणवीस म्हणाले, संभाजीनगरमधील घटना ही दुर्दैवी आहे. त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आहे. मात्र, काही लोकांचा प्रयत्न आहे की, भडकवणारे स्टेटमेंट देऊन परिस्थिती चिघळली पाहिजे. अशा नेत्यांनी कसे वागले पाहिजे हे समजून घेण्याची गरज आहे. चुकीचे स्टेटमेंट देऊ नये. सर्वांनी शांतता पाळावी. याला राजकीय रंग देण्याचा कुणी प्रयत्न करत असेल तर त्यापेक्षा दुर्दैवी काहीच नाही असे फडणवीस म्हणाले.
आता संभाजीनगरमध्ये शांतता आहे. ही शांतता अशीच राहिली पाहिजे. पोलिसांकडून हिंसाचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. पण काही नेते जाणीवपूर्वक राजकीय स्टेटमेंट देऊन परिस्थिती चिघळली पाहिजे म्हणून स्टेटमेंट देत आहेत. ते त्यांनी देऊ नये असे फडणवीस म्हणाले.
ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंचा गंभीर आरोप...
छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा परिसरात काल रात्री झालेला राडा कुणी घडवला, हे शोधून काढायला हवं. शहरातल्या लोकांच्या मनात विष पेरण्यासाठी भाजप आणि एमआयएम जबाबदार आहे. शहरात त्यांना दंगल पाहिजे, मतांसाठी हे राजकारण सुरु आहे. या घटनेमागे एमआयएम आणि भाजप आहे. त्यांना शहरात दंगल पाहिजे. त्यांचा जनाधार कमी होतोय. म्हणून मुस्लिम समाजाला उचकवणं, सुजाण जनता निमूटपणे बघतेय असा आरोप दानवेंनी केला आहे.
मास्टरमाईंड देवेंद्र फडणवीसच...
माजी खासदार व ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील हिंसाचारावर फडणवीसांवर लक्ष्य केलं आहे. खैरे म्हणाले, महाराष्ट्रात अराजकता निर्माण करून, अशांतता करण्याचं काम मिंधे सरकार करत आहे. २ एप्रिलला महाविकास आघाडीचा मेळावा आहे. त्यात विघ्न आणण्याचा मिंधे सरकारचा प्रयत्न आहे. एमआयएम ही भाजपाची बी टीम आहे, असं सर्व लोक म्हणत आहेत.
महापालिका, विधानसभा, लोकसभा, जिल्हापरिषद निवडणुकांसाठी हे सर्व सुरू आहे. याचा मास्टमारईंड देवेंद्र फडणवीस आहेत. तर, भागवत कराड आणि जलील हे मित्र आहेत. त्यांचं हे प्लॅनिंग सुरू आहे असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.