Sambhajinagar water project : अखेर संभाजीनगरमध्ये 'नव्या योजनेतून' पाणी आलं... शिवसेनेला बॅकफुटवर ढकलत भाजपलं घेतलं पहिलं श्रेय

Chhatrapati Sambhajinagar water project News : 2017-18 मध्ये फडणवीस यांनी युती सरकारच्या काळात 1480 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेची घोषणा केली. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत अखेर आठ वर्षांनी साडे सत्तावीसशे कोटींवर पोहोचलेली ही योजना पूर्ण झाली.
sanjay shirsat | sandipan bhumare | atul save
sanjay shirsat | sandipan bhumare | atul savesarkarnama
Published on
Updated on

SambhajiNagar municipal corporation : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळात मंजूर झालेल्या छत्रपती संभाजीनगर शहरासाठीच्या पाणीपुरवठा योजनेचा नारळ अखेर फडणवीस यांच्याच वाढदिवसाचा मुहूर्त साधत वाढवण्यात आला. 2017-18 मध्ये फडणवीस यांनी 1 हजार 480 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेची घोषणा केली होती. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत अखेर 8 वर्षांनी साडे 2 हजार 700 कोटींवर पोहोचलेली ही योजना पूर्ण झाली आहे.

ही योजना मंजूर झाली तेव्हा विद्यमान ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे हे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री होते. आता त्यांच्याच कॅबिनेट मंत्री पदाच्या कार्यकाळात ही योजना पूर्ण होऊन मुबलक पाणी संभाजीनगरवासियांना मिळणार आहे. या योजनेच्या मधल्या टप्प्यात महाविकास आघाडी सरकारमधील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना पक्ष फुटीनंतर मुख्यमंत्री बनलेले एकनाथ शिंदे यांचाही रोल राहिलेला आहे. परंतु राज्यात महाविकास आघाडीच्या काळातच योजनेचे कंत्राट रखडले आणि योजनाही रखडली असा आरोप भाजपकडून केला जातो.

त्याच काळात विरोधी पक्ष नेते असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगर महापालिकेवर भाजपने आक्रोश मोर्चा काढला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही योजनेला गती देण्यासाठी अनेक निर्णय घेतले. मात्र, आज प्रत्यक्षात जेव्हा योजना पूर्ण होऊन शहरात पाणी आले, तेव्हा मात्र भाजपचे मंत्री अतुल सावे, महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, महापालिकेचे आयुक्त यांच्यासह भाजपचे नगरसेवक जल्लोष करण्यात आणि पेढे वाटण्यात आघाडीवर होते. उपमहापौर म्हणून राजेंद्र जंजाळ यांची उपस्थिती सोडली तर शिवसेनेचे खासदार संदिपान भुमरे, पालकमंत्री संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल किंवा शिवसेनेचे इतर नेते, पदाधिकारी यावेळी उपस्थित नव्हते.

sanjay shirsat | sandipan bhumare | atul save
Atul Save CM Fadnavis: ...म्हणून मंत्री अतुल सावेंचं फडणवीसांच्या दरबारात पुन्हा वाढलं वजन; मुख्यमंत्र्यांनी महिनाभरातच दुसर्‍यांदा भरवला पेढा!

राज्यात शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महायुती असली तरी स्थानिक पातळीवर या पक्षाच्या नेत्यांमध्ये मतभेद आहेत. नुकत्याच झालेल्या नगरपालिका, नगरपंचायत, महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत हे दिसून आले आहे. शिवसेनेला बॅकफुटवर लोटण्याची एकही संधी भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने दवडली नाही. महापालिका, जिल्हा परिषदेत युती न करता शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवत भाजपने आपला स्वबळाचा अजेंडा खरा करून दाखवला.

कधीकाळी या जिल्ह्यावर शिवसेनेची मजबूत पकड होती, ती आता राहिलेली नाही. शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदार आणि नेते गेल्या काही वर्षांपासून भाजप मागे फरपटत जात असल्याचे चित्र आहे. भाजपने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवत आपली वाढलेली ताकद वारंवार सिद्ध केली. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतही मोठ्या प्रयत्नानंतर शिवसेनेला पहिली दोन वर्ष अध्यक्ष पद मिळाले आहे.

राज्यातल्या महायुतीमध्ये एकत्र असले तरी शिवसेना आणि भाजप हे दोन पक्ष जिल्ह्यात मात्र वेगवेगळेच असल्याचे कालच्या पाणीपुरवठा योजनेच्या जल्लोषातून पुन्हा एकदा दिसून आले आहे. भाजप कुठल्याही विकास कामाचे श्रेय शिवसेनेला देऊ इच्छित नाही. शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाकडूनही तसा प्रयत्न केला जात नाही. शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वामध्ये असलेली ही उदासीनता पक्षाला भविष्यात अडचणीची ठरू शकते.

sanjay shirsat | sandipan bhumare | atul save
Sunil Tatkare : शिंदेंनी निर्णय घेताच शिवसेना नेत्याचा राष्ट्रवादीला इशारा, 'लोकसभेची तयारी आहे' म्हणत तटकरेंना आव्हान

दुसरीकडे भाजपने अतुल सावे यांना बळ देत जिल्ह्यातील ताकदवान नेता म्हणून पुढे आणले आहे. महापालिका जिल्हा परिषद, जालना छत्रपती संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात यश मिळवून देत सावे यांनी आपले नाणे खणखणीत असल्याचे मुंबईतील वरिष्ठ नेत्यांना सिद्ध करून दाखवले. सध्या जिल्ह्यामध्ये अतुल सावे यांच्याशिवाय भाजपाचे पानही हलत नाही अशी परिस्थिती आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे स्थानिक नेतेही त्यांच्या दबावातच असल्याचे चित्र जिल्हा बँकेच्या निवडणुकीनिमित्ताने पाहायला मिळाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com