

Latur Farmer News: लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांना मदत म्हणून सरकारने उपलब्ध करून दिलेला बैल हा आजारी असल्याने सरकारवर विविध स्तरातून टीकेची झोड उठली. या घटनेची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ''काशिनाथ गायकवाड यांना बाजारात नेऊन त्यांना आवडेल तो बैल घेऊन द्या', अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांना शुक्रवारी (ता. १२) दिल्या. त्यामुळे गायकवाड यांना लवकरच नवा बैल उपलब्ध होणार आहे.
शेतकरी काशिनाथ गायकवाड यांचा एक बैल वीज कोसळून मृत्युमुखी पडला. त्यानंतर एका बैलाच्या जागी पत्नी हौसाबाई यांना औताला जुंपून गायकवाड हे शेतीची मशागत करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ही घटना पाहून राज्यभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. या घटनेची सरकारने दखल घेत पशुसंवर्धन विभागामार्फत १० जून रोजी तातडीने मदत म्हणून त्या शेतकऱ्याला एक बैल उपलब्ध करून देण्यात आला. मात्र, मदतीसाठी दिलेला हा बैल शेतातील मशागतीदरम्यान खाली बसला. तो आजारी असल्याचेही निष्पन्न झाले. या घटनेचाही व्हीडिओ आता तितकाच व्हायरला झाला आहे.
शेतकऱ्याला मदत मिळण्याऐवजी शेतकऱ्याला बैलाच्या उपचाराचा खर्च करावा लागत आहे. प्रशासनाने मदतीच्या नावाखाली आजारी बैल शेतकऱ्याला सोपवून फसवणूक केल्याची टीका सरकारवर आणि प्रशासनावर झाली. दरम्यान, मुंबई येथे मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद शुक्रवारी (ता. १२) आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत लातूरच्या शेतकऱ्याला दिलेला बैल आजारी निघाला. त्यामुळे शेतकऱ्याची फसवणूक झाली, अशी चर्चा सुरू आहे, असा प्रश्न मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारण्यात आला. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, चार दिवसांपूर्वी लातूरमधून अतिशय मन हेलावून टाकणारी बातमी आपल्या वाचायला मिळाली. लातूर जिल्ह्यातील एक भूमिहिन शेतकरी इतरांच्या शेतात जाऊन मशागत करतात. बटईने शेती करतात. त्यांचा बैल दगावल्याने एका बैलाच्या जागी पत्नीला औताला जुंपून ते मशागत करत होते. हे आपल्याला पहायला मिळाले. म्हणून मृत बैलाची नुकसान भरपाई देण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने दिली.
शिवाय, मदतीसाठी एक बैलही दिला. पण, दिलेला बैल योग्य नसल्याचे दिसून आले. त्यामुळे आता "संबंधीत शेतकऱ्याला घेऊन बाजारात जा, आणि त्यांना आवडेल तो बैल घेऊन द्या," अशा सुचना मी जिल्हाधिकाऱ्यांना आज दिल्या आहेत, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी "बैल मेल्यामुळे पत्नीला नांगराला जुंपण्याची वेळ आली. हा व्हिडिओ व्हायरल झाला. मग सरकार जागं झालं. मदतीसाठी एक बैल देण्यात आला. कॅमेरे आले, फोटो काढले गेले. जाहिराती करत सरकारच्या संवेदनशीलतेचा गाजावाजा सुरू झाला. पण एका दिवसातच तो बैल निकृष्ट निघाला आणि शेतातच कोसळला! ही मदत होती की बळीराजाच्या दुःखाची थट्टा?" असा सवाल केला.
तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी "लातूर जिल्ह्यात एक शेतकरी दांपत्य स्वतः नांगर ओढतानाची बाब पुढे आली. खरंतर शेतकऱ्यांवर अशी वेळ येते याची सरकारला शरम वाटायला हवी, पण सरकारने या शेतकरी दांपत्याला एक बैल दिला. हा बैल दिल्यानंतर छान फोटोसेशन केले. सरकार शेतकऱ्याप्रती किती संवेदनशील आहे, याचे क्रेडिट घेतले गेले. पण हा बैल आजारी निघाला. आता त्या बैलाच्या उपचारांचा खर्च करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. शेतकऱ्यांबाबत असलेली सरकारची अनास्था पुन्हा एकदा दिसून आली," अशा शब्दात संताप व्यक्त केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.