

Jalna News : महापालिका निवडणुकीच्या आधीच भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार कैलास गोरंट्याल हे जालन्यातील विजयाचे खरे शिल्पकार ठरले आहेत. पक्ष प्रवेशाच्यावेळीच शिवसेनेसोबत युती करू नका, भाजपची सत्ता आणि पहिला महापौर खुर्चीवर बसवून दाखवतो, असा शब्द गोरंट्याल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिला होता.
कैलास शेठ यांनी आपला हा शब्द खरा करून दाखवला. महापालिकेत भाजपची बहुमतासह सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही कैलास गोरंट्याल यांना फोन करून त्यांचे अभिनंदन केले. आज भाजपच्या छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय कार्यालयात मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते कैलास गोरंट्याल यांचा सत्कार करण्यात आला.
जालना महापालिकेतील यशानंतर कैलास गोरंट्याल यांचे भाजपमधील वजन वाढल्याचे बोलले जात आहे. 2024 मधील विधानसभा निवडणुकीत पारंपारिक प्रतिस्पर्धी शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांच्याकडून पराभव झाल्यानंतर कैलास गोरंट्याल यांनी काँग्रेस नेतृ्त्वाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. पक्षाने आपल्याला वाऱ्यावर सोडले, नेते प्रचाराला आले नाही, असा त्यांचा आरोप होता.
विधानसभेतील पराभवानंतर गोरंट्याल यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला आणि फडणवीसांनी त्यांच्यावर महापालिकेची जबाबदारी दिली. गोरंट्याल यांनी एकाच दगडात काँग्रेस आणि शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर हे दोन पक्षी गारद केले. शिवसेनेला युतीसाठी शेवटच्या क्षणापर्यंत लटकवत ठेवण्याची गोरंट्याल-दानवे यांची रणनिती यशस्वी ठरली आणि जालन्यात युती तुटली. अर्जुन खोतकर यांचा स्वतंत्र आघाडीचा प्रयोग हाणून पाडण्यासाठीच युतीच्या चर्चेचे गुऱ्हाळ शेवटच्या दिवसापर्यंत सुरू ठेवण्यात आले होते.
जालना जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या वीस-पंचवीस वर्षापासून कैलास-गोरंट्याल विरुद्ध अर्जुन खोतकर यांच्यातील कुरघोडीच्या राजकारणाचा अनुभव येथील जनतेने घेतला आहे. पण विधानसभेला जालनेकरांनी दोघांनाही समान संधी दिली. नगरपालिकेचे रुपांतर महापालिकेत झाल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत कैलास गोरंट्याल यांनी भाजपमध्ये प्रवेश करत खेळ फिरवला. नगरपालिकेत भाजप-शिवसेनाला कधी शिरकाव न करू देणाऱ्या कैलास शेठनी रावसाहेब दानवे यांच्याशी जुळवून घेत अर्जुन खोतकर यांचा काटा काढलाच.
कैलास शेठ म्हणत देवाभाऊंकडून शाबासकी..
महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कैलास गोरंट्याल यांचे कैलास शेठ म्हणत अभिनंदन केले. 'सर तुम्ही टाकलेली जबाबदारी पार पाडली, माझी पत्नी, मुलगा सर्वाधिक मताधिक्याने निवडून आले. सर तुमचा आशीर्वाद घ्यायला येणार' असे म्हणत गोरंट्याल यांनी फडणवीसांचेही आभार मानले.
याच संभाषणात फडणवीस यांनी कैलास भाऊ तुम्ही सांगितले आणि युती तोडली, असा उल्लेखही केला. यातून युतीचे सर्वाधिकार कैलास गोरंट्याल यांनाच देण्यात आले होते, हे ही स्पष्ट झाले. आता महापौर पदावर रावसाहेब दानवे समर्थकांची वर्णी लागणार? की मग तिथेही कैलास शेठ यांचाच शब्द प्रमाण ठरणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.