Pimpri Chinchwad : राज्य सरकारमधील 'अनाजीपंतांच्या' आदेशावरून जालन्यात शांततेने उपोषण करणाऱ्या मराठा तरुण आंदोलकांवर अमानुष लाठीमार झाल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. तर याचवेळी संभाजी ब्रिगेडने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली.
जालन्यातील पोलिसांच्या लाठीचार्जचा तीव्र निषेध करत राज्य सरकारने महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी,अशी मागणी यावेळी केली गेली. अन्यथा राज्य सरकारमधील 'अनाजी पंतांना' आणि गद्दारांना पेटविण्यासाठी शिवसेनेची मशाल सज्ज आहे, असा इशारा ठाकरे गटाचे पिंपरी चिंचवड शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले यांनी दिला.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (ता.अंबड) येथे मराठा आरक्षणा(Maratha Reservation) च्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्यांवर लाठीमाराचे तीव्र पडसाद सध्या राज्यभर उमटत असून त्याविरोधात भाजप, शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस वगळता इतर सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांकडून जोरदार निदर्शने सुरु आहेत. पिंपरी-चिंचवडमध्येही ठाकरे शिवसेना(Shivsena) आणि संभाजी ब्रिगेडने काल ती केली.
त्यांच्या नेतृत्वात पिंपरी चौकात हे निषेध आंदोलन झाले. त्यात माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, शहर संघटिका अनिता तूतारे, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट, माजी शहरप्रमुख योगेश बाबर तसेच युवराज कोकाटे, शैलेश मोरे, रोमी संधू आदी सामील झाले होते.
...त्याची किंमत फडणवीसांना मोजावी लागेल!
जालना लाठीमाराचा निषेध मराठा क्रांती मोर्चासह विविध सामाजिक संघटनांनी एकत्रितपणे कालच पिंपरीतच केला. जालना लाठीमारात सांडलेल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाची किंमत लाठीचार्जचे आदेश देणाऱ्या फडणवीसांना मोगावी लागेल असा इशारा त्यात देण्यात आला. त्यांनी नैतिकतेच्या आधारावर आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांचा देखील समाजाच्या वतीने अतिशय तीव्र शब्दात यावेळी निषेध केला गेला. मराठा समाज हा राज्य सरकारचे मतपेटीतून विसर्जन केल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा देण्यात आला.
(Edited By Deepak Kulkarni)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.