Dhananjay Munde Dasara Melava : कुणाला फसवतायं ? मराठा आरक्षणावरून धनंजय मुंडे यांचा मनोज जरांगे पाटलांवर पलटवार!

Dhananjay Munde React On Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीतून मराठा आरक्षणाची मागणी केल्यानंतर बीडसह संपूर्ण राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष भडकला.
Dhananjay Munde React On Manoj Jarange Patil News
Dhananjay Munde React On Manoj Jarange Patil NewsSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. दसरा मेळाव्यात धनंजय मुंडेंनी मनोज जरांगे पाटलांवर थेट हल्ला चढवला.

  2. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर "कोणाला फसवतायं?" असा सवाल करून पलटवार केला.

  3. या टीकेनंतर मराठा समाजात नवे राजकीय समीकरण चर्चेत आले.

Beed Political News : मराठा समाजाला आरक्षण मिळालं आम्हाला आनंद आहे. कारण मराठा आंदोलनाच्या चळवळीत आम्हीही होतो. पण काही लोकांना आरक्षणाच्या आड राहून ओबीसीतून आरक्षण घ्यायचं आहे, असा आरोप करत एमपीएससी परीक्षेतील कट ऑफचा आकडा सांगत आमदार धनंजय मुंडे यांनी पहिल्यांदाच मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षण मागणीवर जाहीरपणे टीका केली.

कुणाला फसवता, काही लोक राजकारण करत आहेत. सरकारने आरक्षणासाठी जे करायचं ते केलं आहे आताही करत आहे. आरक्षण दिलयं, आणखी द्या काही म्हणणं नाही, पण याच्या ताटातून काढून त्या ताटात देऊ नका, अशी स्पष्ट मागणी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी भगवान भक्ती गडावरील दसरा मेळाव्यातून केली. भगवान भक्तीगडावर मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या आजच्या दसरा मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.

मराठा आरक्षण, (Maratha Reservation) मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या, या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांच्यावर झालेले आरोप आणि त्यांना गमवावे लागलेले मंत्रिपद, कृषिमंत्री पदाच्या काळात कीटकनाशक, यंत्रसामुग्री खरेदीमध्ये झालेला घोटाळ्याचा आरोप, कौटुंबिक हिंसाचाराचे न्यायालयात दाखल असलेले प्रकरण आणि या सगळ्या परिस्थितीत धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीवर झालेला परिणाम अशा पार्श्वभूमीवर आजच्या दसरा मेळाव्यात ते कशा पद्धतीने व्यक्त होतात? याची उत्सुकता संपूर्ण राज्याला आणि मुंडे समर्थकांना लागली होती.

Dhananjay Munde React On Manoj Jarange Patil News
Dhananjay Munde : 250 दिवस बहिणीने आधार दिला, तास न् तास माझ्याजवळ बसत... : धनंजय मुंडेंनी सांगितली भावनिक गोष्ट

मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीतून मराठा आरक्षणाची मागणी केल्यानंतर बीडसह संपूर्ण राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष भडकला. बीड जिल्ह्यात याची तीव्रता अधिक जाणवली. मराठा समाजावर ओबीसी बहुल गावांमधून बहिष्कार टाकण्याचे प्रकारही बीडसह परळी तालुक्यात घडले. यावर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी थेट धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या बहीण भावांवर जाहीर टीका,आरोप करत ते जातीयवादाला खतपाणी घालत असल्याचा हल्ला चढवला होता.

Dhananjay Munde React On Manoj Jarange Patil News
Manoj Jarange: रुग्णवाहिकेतून नारायणगडावर पोहचले जरांगे पाटील; सभेपूर्वीच झाले अश्रू अनावर

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची धनंजय मुंडे यांचा राईट हॅन्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाल्मीक कराड याच्या गुंड टोळीकडून अमानुषपणे झालेल्या हत्येनंतर जरांगे पाटील विरुद्ध धनंजय मुंडे असे वातावरण तयार झाले. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभरात न्याय मोर्चे काढले. यातून धनंजय मुंडे हे वाल्मीक कराड आणि त्यांच्या गुंडांना कसे पोसत आहेत,संतोष देशमुख यांच्या खुनापूर्वी आरोपींच्या मंत्र्यांच्या बंगल्यावर कशा बैठका झाल्या? असे अनेक गंभीर आरोप जाहीरपणे केले गेले.

आमच्या ताटातलं दुसऱ्याच्या ताटात का?

धनंजय मुंडे यांना मंत्रीपदावरून काढण्यासाठीही मनोज जरांगे पाटील यांनी मोठा दबाव सरकारवर निर्माण केला होता. या दबावातूनच धनंजय मुंडे यांचे मंत्रीपदही गेले. त्याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवरही झाला. एका मागून एक संकटांची मालिका सुरू असतानाही धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर थेट टीका करणे टाळले होते. मराठा आरक्षण आणि जरांगे पाटील या विषयावर धनंजय मुंडे यांनी आतापर्यंत कुठलीच जाहीर भूमिका घेतली नव्हती. आज भगवान भक्ती गडावरील दसरा मेळाव्यात मात्र धनंजय मुंडे पहिल्यांदाच मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर उघडपणे व्यक्त झाले.

मराठा आरक्षणाला आपला विरोध नसल्याचे स्पष्ट करतानाच ओबीसीतून आरक्षणाची मागणी करणाऱ्यांकडून समाजाची कशी फसवणूक केली जात आहे? हे मात्र धनंजय मुंडे यांनी उदाहरणासह पटवून दिले. एमपीएससी परीक्षेत ओबीसींचा आलेला कट ऑफ 485 होता, तर स्पेशल विकरचा कट ऑफ 450. मला कोणतेच आरक्षण नसेल आणि मी जर विकर सेक्शन मध्ये अर्ज भरला असता तर 450 मार्कात आत गेलो असतो. पण ओबीसीत आल्यावर 480 मार्क घेऊनही नापास आहे.

फरक स्पष्ट आहे तुम्ही कुणाला फसवता आहात? आरक्षणाच्या विषयावरून राजकारण कशासाठी? असा थेट सवाल करत धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांची ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षणाची मागणी कशी चुकीची आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला. आम्ही कुणाला विरोध केला नाही, कुणाच्या आम्ही विरोधातही नाही. आज बीड जिल्ह्यात जातीपातीचे राजकारण सुरू झाले. जिगरी दोस्तांची जातीमुळे दोस्ती तुटली हे वातावरण बदलायचे आहे, असे म्हणत जातीपातीच्या राजकारणाला मनोज जरांगे पाटील हेच कसे जबाबदार आहेत? याकडे मेळाव्याला आलेल्या समर्थक आणि समाजाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे यांनी केला.

तू बचा है तो जला क्या है...

एकूणच दसरा मेळाव्याच्या निमित्ताने केलेल्या भाषणातून धनंजय मुंडे यांनी आपल्या मनात साठवून ठेवलेल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. राजकारणातून आपल्याला संपवू पाहणाऱ्या विरोधकांचा समाचार घेताना धनंजय मुंडे यांनी शेरोशायरी चा आधार घेतला. 'आग तो लगी थी घर मे, दोस्त ने आके पूछा घर मे आग लगी है तो बचा क्या है, मैने दोस्त से कहा मै बचा हू! तो दोस्त ने कहा तू बचा है तो जला क्या है', असे म्हणत पुन्हा एकदा दंड थोपटत विरोधकांना अंगावर घेतले.

'हर मुश्किल को हसते हसते झेलते है हम, अंधियो मे भी चिराग जलाते चलते है', असे म्हणत भविष्यातील आपली राजकीय वाटचाल कशी असेल? हेही सांगण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे यांनी आजच्या भाषणातून केला. आता नारायणगडावर होणाऱ्या मेळाव्यात मनोज जरांगे पाटील धनंजय मुंडे यांच्या टीकेला आणि आरोपांना कसे उत्तर देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

FAQs

Q1. दसरा मेळाव्यात धनंजय मुंडेंनी कोणावर टीका केली?
धनंजय मुंडेंनी मनोज जरांगे पाटलांवर टीका केली.

Q2. ही टीका कोणत्या मुद्द्यावरून झाली?
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून.

Q3. मुंडेंनी जरांगे पाटलांना काय सवाल केला?
"कोणाला फसवतायं?" असा थेट सवाल केला.

Q4. या वादामुळे कोणत्या समाजात चर्चा रंगली?
मराठा समाजात या वक्तव्यामुळे चर्चा रंगली.

Q5. दसरा मेळाव्यात हा प्रसंग कधी घडला?
दसरा मेळाव्यात 2025 मध्ये हा प्रसंग घडला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com