
Beed NCP Politics : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बीडमधील निर्धार नवपर्वाचा हा मेळावा नुकताच पार पडला. या मेळाव्यावर आमदार धनंजय मुंडे यांची छाप दिसली. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या या संपूर्ण दौऱ्यात मुंडे यांचा वावर, मेळाव्यातील आत्मविश्वासाने भरलेले भाषण, शेरोशायरीतून विरोधकांना दिलेला इशारा याची सध्या जिल्ह्यात आणि मराठवाड्यात चर्चा होत आहे. या निमित्ताने धनंजय मुंडे दोनशे दिवसांनी भरभरून बोलले आणि आपण पुन्हा अॅक्टीव्ह झाल्याचे त्यांनी दाखवून दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी (NCP) आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दृष्टीने हे जमेची बाजू असली तरी आता जिल्ह्याचा संपूर्ण कारभार किंवा पक्षाची धुरा धनंजय मुंडे यांच्या खांद्यावर सोपवावी, अशी परिस्थिती राहिलेली नाही. शिवाय सरंपच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणात वाल्मीक कराड या मुख्या आरोपीशी धनंजय मुंडे यांचे असलेले संबंध पाहता ते पक्षाला परवडणारेही नाही. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी या सगळ्या गोष्टींचा विचार करता जिल्ह्याच्या संघटनात्मक रचनेत आपल्या विश्वासाची माणसं दिली आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदावर झालेली नियुक्ती ही पुर्णपणे अजित पवार यांच्याच आदेशाने झालेली आहे. तर जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा निर्णय हा देखील धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या सांगण्यावरून नाही, तर माजी आमदार अमरसिंह पंडीत यांच्या सांगण्यावरून झाल्याची चर्चा आहे. माजी मंत्री आणि परळीचे आमदार म्हणून स्थानिक पातळीवरच्या नियुक्त्या आणि निर्णयाचे अधिकार धनंजय मुंडे यांचे अबाधित राहतील. परंतु जिल्हा पातळीवर संघटनात्मक रचनेत मुंडे यांना फार हस्तक्षेप आता करता येणार नाही, अशी व्यवस्था निर्माण झाली आहे.
पक्षाचे मोठे नुकसान..
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर बीडमध्ये कोणत्याच नेत्याला संपूर्ण जिल्ह्याचा कारभार किंवा निर्णय घेण्याचे अधिकार कधी दिले गेले नाहीत. अगदी शरद पवारांकडे पक्षाचे नेतृ्त्व होते तेव्हाची जी रचना होती, ती अजूनही तशीच आहे. राष्ट्रवादीत फूट पडली असली तरी कार्यपद्धतीत फारसा बदल झालेला नाही. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील राजकारण पुर्णपणे बदलले आहे. धनंजय मुंडे यांचे या प्रकरणात नाव आणि त्यावरून त्यांना द्यावा लागलेला राजीनामा यामुळे जिल्ह्यात पक्षाचे मोठे नुकसान झाले.
ही भरपाई करण्याची जबाबदारी आता अजित पवार यांनीच स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. जिल्ह्याचे पालकत्व घेतल्यापासून अजित पवार यांनी आपली बारामती स्टाईल इथे राबवायला सुरवात केली आहे. बीडला मिळालेले सेंटर फाॅर इन्व्हेंन्शन सेंटर, विमानतळाला मंजुरी अशा निर्णयातून अजित पवार यांनी बीडकरांना एक विश्वास देण्याचा प्रयत्न केला आहे. धनंजय मुंडे यांचे नाव वाल्मीक कराड हत्या प्रकरणात घेतले गेल्याने पक्षाची डागाळलेली प्रतिमा स्वच्छ करण्याचा प्रयत्न अजित पवारांनी या काही निर्णयातून केला आहे.
धनंजय मुंडेही महत्वाचे..
बीड जिल्ह्यातील जातीय समिकरणांचा विचार केला तर धनंजय मुंडे यांना पूर्णपणे दूर करणेही पक्षाला शक्य नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकावयचा असेल तर मुंडे हवेतच हे पक्ष नेतृत्वाला माहित आहे. पंरतु पूर्वीसारखा फ्री हॅन्ड न देता त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचे काम निश्चितच सुरू आहे. धनंजय मुंडे यांना जिल्ह्यात यापुर्वी पक्षांतर्गत आणि बाहेरचे अशा दोन्ही राजकीय विरोधकांना तोंड द्यावे लागायचे. परंतु महायुती झाल्यानंतर बहिण पंकजा मुंडे सोबत आल्याने त्यांचा एक विरोधक कमी झाला आहे. माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांचा धनंजय मुंडे यांना असलेला विरोध आजही कायम आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील तटकरे यांनी धनंजय मुंडे यांचे पक्षातील स्थान काल आज आणि उद्याही अबाधित राहील, असे सांगितल्याने मुंडे यांचे वर्चस्व वाढले, असे म्हणणे तेवढे संयुक्तिक ठरणार नाही. एखाद्या जिल्ह्यात आल्यानंतर त्याच भागातील लोकप्रतिनिधी किंवा माजी मंत्र्याबद्दल पक्षाचा प्रमुख नेता चुकीचे बोलेल अशी अपेक्षाच मुळात चुकीची आहे. त्यामुळे तटकरे यांनी धनंजय मुंडे यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला व्यवस्थित टोलवले. योग्यवेळी धनंजय मुंडे यांच्याबद्दल निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले. त्यामुळे आता ही योग्यवेळ नक्की कधी येणार? हा खरा प्रश्न आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.