
Baramati City : बारामती... या नावाची चर्चा केवळ राज्यच नव्हे तर देशपातळीवर होते. विकासाचे मॉडेल म्हणून वारंवार विविध मान्यवरांनी बारामतीचा गौरव केलेला आहे. सर्वांगसुंदर शहर म्हणून बारामतीची ख्याती आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून गेल्या 35 वर्षांत बारामतीचा सर्वांगीण विकास झाला. निवडणुकीमध्ये अजित पवार लाखांच्या मताधिक्याने का निवडून येतात, कोणत्याही लाटा आल्या गेल्या तरी बारामतीकर अजित पवार यांच्यावरच का विश्वास दाखवतो, सर्वांगीण विकास म्हणजे काय असतो हे पाहायचे असेल तर राज्यातील प्रत्येकाने वेळ मिळेल तेव्हा आवर्जून बारामती बघायला यायला हवे.
सातत्याने जी बारामती चर्चेत असते, ती नेमकी आहे तरी कशी, काय आहे या बारामतीत जेथे देशाच्या पंतप्रधानांपासून ते आमदारांपर्यंत सगळ्यांनाच यावेसे वाटते, राजकीय पंढरी म्हणून नावलौकिक प्राप्त ही बारामती नक्की पाहायला हवीच अशी आहे. सर्वांगसुंदर शहर, हरित व स्मार्ट शहर म्हणून बारामती आज राज्यात अग्रेसर आहे. सामाजिक सुरक्षितता, सोयीसुविधा, संतुलित पर्यावरण, हरित व स्वच्छ सुंदर टुमदार शहर पाहायचे असेल तर आवर्जून एकदा तरी बारामती बघायला यायला हवे. बारामती पाहिल्यानंतर कायमचेच इथे स्थायिक होण्याचा तुम्ही नक्की विचार कराल, यात शंका नाही.
राज्यातील इतर शहरांप्रमाणेच बारामतीतील पोलिस कार्यालय जुन्याच इमारतीतून कामकाज करत होते. अजित पवार यांनी पुढाकार घेत सुरवातीला बारामती तालुका व त्या नंतर बारामती शहर पोलिस ठाण्यासाठी सुसज्ज इमारतींची उभारणी केली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक कार्यालय,वाहतूक पोलिसांचे कार्यालय या इमारती ख-या अर्थाने कार्पोरेट स्टाईलच्या बनविण्यात आल्या आहेत. परदेशाप्रमाणे बारामतीत पोलिसांना कामासाठी वातावरण तयार करुन देण्यासाठी अजित पवार यांनी पुढाकार घेतला आहे. कामाच्या ठिकाणचे वातावरण चांगले असेल तर कार्यक्षमता वाढते या नियमानुसार बारामतीत जवळपास सर्वच शासकीय कार्यालय ही एखादया खाजगी कंपनीच्या कार्यालयांप्रमाणे करण्यात आली आहेत.
शहरातील प्रशासकीय भवनाच्या उभारणीनंतर तर बारामतीकरांची खूप मोठी सोय झाली. जवळपास 34 विविध विभागांची कार्यालय एकाच इमारतीत तयार झाल्यामुळे वेळ, श्रम व पैसा या तिन्हींची बचत झाली. सुंदर लँडस्केपिंग, झाडे, प्रशस्त पार्किंग,हवा खेळती राहील व सूर्यप्रकाश छान येईल अशी इमारतीची रचना झाल्यामुळे ही इमारत देखील परिपूर्ण ठरली. एकाच ठिकाणी विविध शासकीय कार्यालयांना आणण्याचा अजित पवारांचा निर्णय योग्य ठरला. लोकांना ते सोयीस्कर झाले आहे.
बारामतीतील तीन हत्ती चौकामध्ये उभारलेले क्लॉक टॉवर लंडनच्या धर्तीवर आहे. अतिशय सुंदर रचना असून रात्रीच्या वेळेस दिव्यांच्या उजेडामुळे हा टॉवर उजळून निघतो. या नजिक नागरिकांना विसावा घेण्यासाठी आणि जॉगिंगसाठी केलेला ट्रॅक पाहण्यासारखा. बारामतीत याल तेव्हा आवर्जून या बाबी पाहायला हव्यात. नटराज नाट्य कला मंडळाची देखणी वास्तू व नजिक असलेले क्लॉक टॉवर या मुळे बारामतीच्या वैभवात भर पडली आहे. आता त्या नजिकच बारामतीतील सर्वात उंच राष्ट्रध्वज उभारला जात आहे.
राज्याच्या कानाकोप-यातून तुम्ही जेव्हा बारामतीला याल, तेव्हा तीन हत्ती चौक ते पेन्सिल चौकापर्यंतचा भिगवण रस्ता आवर्जून बघा. या रस्त्याच्या दुतर्फा अजित पवार यांनी पुढाकार घेत जे सुशोभिकरण केलेले आहे, ते परदेशाच्या धर्तीवर आहे. तुम्ही पहाटे किंवा संध्याकाळी जेव्हा या रस्त्यावरुन जाल, तेव्हा असंख्य बारामतीकर या रस्त्याच्या बाजूने केलेल्या पदपथावरुन जॉगिंग रनिंग करताना दिसतील. या ठिकाणी बसण्यासाठी जी सुंदर व्यवस्था केली आहे, तेथे बसून चार क्षण निवांतपणे बसलेले लोक दिसतील. बाजूला जी खेळणी आहेत, त्यावर लहान थोर खेळण्यांचा आनंद घेताना तर बाजूला असलेल्या ओपन जिमवर काही जण व्यायाम करताना दिसतील.
बारामती नगरपरिषदेला वैभवशाली परंपरा आहे. स्वातंत्र्यापूर्वी सन 1865 मध्ये स्थापना झालेल्या नगरपरिषदेने 160 वर्षांच्या इतिहासात अनेक स्थित्यंतरे पाहिली आहेत. अनेक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार असलेली बारामती नगरपरिषद अजित पवार यांच्या पुढाकारातून प्रशस्त व अत्याधुनिक वास्तूमध्ये कामकाज करत आहे. मिटींग हॉल,उत्तम इंटेरिअर, प्रशस्त व पुरेशी जागा, चांगले पार्किंग या सुविधांमुळे बारामती नगरपरिषदेच्या इमारतीत आल्यानंतर नागरिकांनाही वेगळे समाधान मिळते.
बारामती तालुक्यातील ब-हाणपूर येथे उभारलेले पोलिस उपमुख्यालय पाहिल्यावर आपण परदेशात असल्याचाच भास होतो, इतक्या सुंदर इमारती येथे साकारण्यात आल्या आहेत. राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वांगसुंदर असे उपमुख्यालय बारामती भेटीदरम्यान आवर्जून पाहण्यासाठी जायला हवे असेच आहे. अजित पवार यांची दृष्टी व त्यांचे व्हिजन यातून सहजतेने समजते.
राज्यातील सर्वात भव्य व सुंदर विमानतळाच्या धर्तीवरील बसस्थानक बारामतीत अजित पवार यांच्या पुढाकारातून अवघ्या दोन वर्षात साकारले आहे. प्रशस्त इमारत, उत्तम व्यापारी संकुल, बसेस उभारण्यासाठीची जागा, प्रवाशांसह कर्मचारी अधिकारी यांच्यासाठी अत्यंत प्रशस्त,अत्याधुनिक इमारत उभारण्यात आली आहे.
पेशव्यांचे सावकार असलेल्या श्रीमंत बाबूजी नाईक यांचा वाडा हे बारामतीचे वैभव आहे. इतिहासाच्या खुणा सांगणारी व त्या काळातील थोर व्यक्तींच्या जीवनप्रवासाची साक्षीदार असलेली ही वास्तू आता अत्यंत सुंदर व देखणी झाली आहे. या वाडयातील पोलिस ठाण्यासह सर्वच शासकीय कार्यालय वाडयाबाहेर काढून अजित पवार यांनी या वास्तूचे जतन करण्याचा निर्णय घेतला. बारामतीचा इतिहास या वाडयातून बाहेरगावाहून येणा-यांसमोर दृकश्राव्य पध्दतीने सांगितला जाणार आहे. अँम्फी थिएटरच्या माध्यमातून कार्यक्रमांचे सादरीकरण होईल. तटबंदीवरुन चालत पूर्ण किल्ला फिरता येणार आहे. क-हा नदीचे विहंगम दृश्य या तटबंदीवर उभे राहून अनुभवता येईल. अजित पवार यांच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी हा एक आहे.
बारामतीशहरानजीक कण्हेरी येथील वनविभागाच्या क्षेत्रामध्ये बारामतीकरांना निसर्गवाचन करता येईल, पक्षी झाडे व या परिसरातील प्राणी पाहता यावेत,या उद्देशाने कण्हेरी वनउद्यानाची निर्मिती अजित पवार यांनी केली आहे. पर्यटन व जोडीला निसर्गाच्या सान्निध्यात काही काळ व्यतित करता येईल. शहराच्या जवळ पण तरीही निसर्गाच्या सान्निध्यातील ही जागा प्रत्येकाला आवडेल अशीच आहे. नैसर्गिक पाण्याचे तळे व विकसीत केल्या काही गोष्टी आवर्जून पाहण्यासारख्या आहेत.
सुंदर रंगसंगती, आकर्षक इमारतीचे डिझाईन, प्रकाश येण्यासाठी केलेली डोमची रचना, हवा खेळती राहील व दिव्यांचा वापर किमान व्हावा याची घेतलेली काळजी, व्यवस्थित पार्किंगची सुविधा, कार्पोरेट स्तराचे फर्निचर, उत्तम मिटींग हॉल,प्रत्येक कर्मचारी व अधिकारी यांची बैठक व्यवस्था या सर्वच बाबी पाहण्यासारख्या आहेत. राज्यात पंचायत समितीची अशी इमारत क्वचितच इतर ठिकाणी असू शकेल.
राज्यातील सुसज्ज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैदयकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय ही इमारत राज्यातील प्रत्येकाने एकदा येऊन पाहायलाच हवी. शासकीय रुग्णालय इतके सुसज्ज, देखणे, नीटनेटके,स्वच्छ असू शकते याचा विश्वास बसणार नाही. अकरा ऑपरेशन थिएटर, सिटी स्कॅन,एमआरआयची सुविधा, शवविच्छेदन, अतिदक्षता विभाग,तातडीच्या उपचारांची सुविधा अशा आरोग्यविषयक सर्वच बाबी शासकीय दरामध्ये रुग्णांना उपलब्ध होण्यासाठी अजित पवार यांनी या प्रकल्प बारामतीत साकारला आहे. सिंगापूरच्या धर्तीवर बारामतीच्या या शासकीय रुग्णालयाची इमारत साकारली आहे. बारामतीत कधी याल तर ही इमारत आवर्जून बघायला जायला हवेच. शासकीय रुग्णालय असावे तर बारामतीसारखे असेच प्रत्येक बाहेरगावचा माणूस बोलून दाखवतो.
इंग्रजांनी दुष्काळाच्या काळात हाताला काम मिळावे या उद्देशाने नीरा डावा कालव्याची निर्मिती केली. हा कालवा बारामती तालुक्यातील असंख्य शेतक-यांसाठी वरदान आहे. बारामती शहरातून वाहणा-या नीरा डावा कालव्याची अवस्था दयनीय होती. अजित पवार यांनी या कालव्याचे लायनिंग करत दोन्ही बाजूला अत्यंत सुंदर सुशोभिकरण करत त्याचा कायापालट करुन टाकला. परदेशातील कालव्यांच्या बाजूने जसे वातावरण असते तसेच बारामतीत तुम्ही तीन हत्ती चौक, परकाळे बंगला पूल किंवा देवीच्या देवळानजिकच्या पूलावर गेल्यावर जाणवेल. बारामतीत याल तेव्हा तीन हत्ती चौकातील वॉल क्लॉक टॉवरपासून चालत देवीच्या मंदीरापर्यंत कालव्याच्या कडेने नक्की जा.
लोकांना उच्च दर्जाचे राहणीमान मिळावे, घरातून बाहेर पडल्यानंतरही त्यांना चार क्षण विरंगुळा मिळावा, आप्तस्वकीयांसह मित्रमंडळीसोंबत निवांतपणे बसून सुख दुःखाच्या चार गोष्टी करता याव्यात, हितगुज करता यावे, या उद्देशाने भिगवण रस्ता, साठवण तलावाच्या बाजूला,गरुडबाग, नीरा डावा कालव्याच्या दोन्हीबाजूला, देवीच्या देवळानजिक अशा अनेक ठिकाणी जाणीवपूर्वक अशा जागा विकसीत करण्यात आल्या आहेत. बारामतीकर त्याचा आनंद घेतात.
बारामती शहर पोलिस ठाण्याच्या बाजूला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र व त्याच्यासोबतच अत्याधुनिक व सुसज्ज ग्रंथालयाची उभारणी अजित पवार यांच्या पुढाकारातून झाली आहे. एकीकडे वाचन संस्कृती लोप पावत चालली असताना या चळवळीला चालना देण्याच्या उद्देशाने पवार यांनी राज्यातील सर्वांगसुंदर ग्रंथालय बारामतीत उभारलेले आहे. ज्यांना वाचनाची आवड आहे, त्यांच्यासाठी हे ग्रंथालय ही पर्वणी ठरणार आहे. ही इमारत आवर्जून पाहण्याजोगी आहे. पारंपरिक व अत्याधुनिक वाचन प्रणाली असा दोन्हीचा संगम या ठिकाणी करण्याचा प्रयत्न होणार आहे.
एखादा प्रकल्प हातात घेतल्यापासून ते त्याची प्रत्यक्ष उभारणी किती जलदगतीने व सुंदर रितीने होते,याचे बारामतीत उभारण्यात आलेले आयुर्वेदिक महाविद्यालय हे उदाहरण आहे. जागा निश्चितीपासून ते आता थेट या इमारतीत कामकाज सुरु होण्यापर्यंतचा प्रवास अतिशय अल्प कालावधीचा आहे, पण पुण्याहून बारामतीत प्रवेश करताना बारामतीच्या प्रवेशद्वारानजिकच या भव्य इमारती आपले लक्ष वेधून घेतात. विद्यार्थ्यांना उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर दिल्यानंतर त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर त्याचा अनुकूल परिणाम होतो ही बाब विचारात घेत त्यांना जागतिक दर्जाचे इन्फ्रास्ट्रक्चर अजित पवार यांनी उपलब्ध करुन दिलेले आहे.
संत तुकाराम महाराज पालखी मार्ग, जेजुरी ते बारामती हायब्रीड अँन्युटी प्रकल्प, बारामती भिगवण व बारामती फलटण रस्ताचे सिमेंट कॉंक्रीटीकरण, बारामती नीरा रस्त्याचे विस्तारीकरण, बारामती ते उंडवडीपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण, नव्याने विकसीत केला जात असलेल्या आयुर्वेदीक महाविद्यालय ते बारामती एमआयडीसी पर्यंतचा रस्ता, नवीन रिंग रोड या सारख्या रस्त्यांच्या निर्मितीमुळे बारामतीचा विकास अधिक वेगाने होण्यास मदत होत आहे. रस्ता तयार करण्याबाबत अजित पवार कायमच आग्रही असतात. विकासासाठी रस्त्यांचे जाळे मजबूत असायला हवे, यावर त्यांचा विश्वास आहे. बारामतीसाठी तुम्ही कोणत्याही भागातून आल्यास रस्त्यांचा दर्जा तुम्हाला बरच काही सांगून जातो. राजकीय इच्छाशक्ती असेल तर काय परिवर्तन होऊ शकते हे बघायला बारामतीत यायला हवे.
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले बारामती फलटण रेल्वेमार्गाच्या भूसंपादनाचे महत्वाचे काम अजित पवार यांनी मार्गी लावले. डॉ. राजेश देशमुख पुण्याचे जिल्हाधिकारी असताना त्यांनी हे काम पूर्णत्वास नेले. त्यांच्या प्रयत्नांमुळे भूसंपादनाचे सगळ्यात अवघड काम मार्गी लागले. आज या रेल्वेमार्गाचे प्रत्यक्षात काम सुरु झाले आहे. येत्या दोन वर्षात हे काम पूर्णत्वास जाईल आणि बारामती फलटण लोणंद मिरजमार्गे दक्षिण भारतात जाता येईल. रेल्वेच्या नकाशावर बारामती महत्वाचे रेल्वेस्थानक म्हणून उदयास येईल.
इतर बाबींप्रमाणेच बारामती कृत्रीम बुध्दीमत्तेच्या क्षेत्रात देशाच्या नकाशावर येणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार व सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून विविध पिकांबाबतचे एआय तंत्रज्ञान शेतक-यांच्या शिवारापर्यंत पोहोचविण्याची चळवळ उभारली आहे. याला अजित पवार यांनी शासनस्तरावर मदतीचा हात पुढे केला असून यंदाच्या अर्थसंकल्पात पाचशे कोटींची तरतूद या साठी करण्यात आली आहे. हे तंत्रज्ञान पाहण्यासाठी आवर्जून बारामतीला यायला हवे. कमी खर्चात अधिक उत्पन्न व उत्पादन देणारी उसशेती बारामतीत पाहायला मिळेल.
शहरातून वाहणाऱ्या कऱ्हा नदीचे सुशोभीकरण ही अशक्यप्राय वाटणारी बाब होती. अजित पवार यांनी मनावर घेतले आणि कामाला सुरवात झाली. बघता बघता या नदीचा परिसर बदलून गेला. क-हा नदीच्या पात्रात जॉगिंग व चांगली झाडे येतील असे कोणालाही वाटले नव्हते, आज या क-हा नदी पात्राच्या सुशोभिकरणाचे काम प्रगतीपथावर असून अनेक ठिकाणची परिस्थिती बदलली असून हा परिसर हळुहळू रमणीय होऊ लागला आहे. नदीपात्रात सोडले जाणारे सांडपाणी रोखण्यासाठी उपाययोजना केल्या असून त्यालाही यश येत आहे. राज्यातील अनेक शहरात जेथे नदीपात्र आहे, तेथे नदीपात्रामध्ये काय परिवर्तन होऊ शकते हे बारामतीत येऊन पाहण्यासारखे आहे. हे काम सध्या प्रगतीपथावर आहे.
शहर स्वच्छ, सुंदर व हरित असावे असा आग्रह लोकप्रतिनिधीने धरला आणि त्यासाठी इच्छाशक्ती दाखवित काम सुरु केले तर शहराचे रुप कसे आमूलाग्र बदलू शकते हे बारामतीने दाखवून दिले आहे. अजित पवार यांनी विविध स्तरावर शहर विकासासाठी अनेक योजना आखल्या आणि त्या पूर्णत्वास नेल्या. पर्यावरणाचा समतोल कायम राहावा या साठी त्यांनी वृक्षारोपणावर मोठा भर दिला. बारामतीत आला तर तुम्हाला झाडांची संख्या व हिरवागार परिसर जाणवेल. प्रत्येक भागात विकसीत केलेली छोटी उद्याने त्या भागातील नागरिकांसाठी महत्वाची ठरतात. नागरिकांना नजरेसमोर ठेवून शहर अधिक चांगले व्हावे या साठी त्यांचा सातत्याने प्रयत्न सुरु असून राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत बारामती नक्कीच उजवे शहर आहे यात शंका नाही.
गेल्या काही वर्षात बारामतीला मिळणा-या शिक्षणाच्या विविध सुविधांमुळे बारामतीची ओळख एज्युकेशन हब म्हणून होऊ लागली आहे. कृषीप्रधान संस्कृती असलेल्या या परिसरामध्ये इतर शिक्षणासोबतच पशुवैदयकीय महाविद्यालयाची गरज होती. अनेक वर्षांपासून त्याची मागणी होती. ही बाब विचारात घेत अजित पवार यांनी बारामतीत हे महाविद्यालय सुरु करण्यासाठी पाठपुरावा करुन राज्य शासनाकडून त्याची मंजूरी घेत बारामतीत हे विद्यालय सुरु करण्याची प्रक्रीया सुरु केली. एकदा मंजूरी मिळाल्यानंतर ठराविक कालावधीत इमारतींसह सर्व मुलभूत सुविधा उभारण्याची जबाबदारी अजितदादांची असते, ती त्यांनी उचलली असून येत्या काही वर्षात याही सुसज्ज इमारती माळेगाव व क-हावागजनजिक दिसून येतील.
सीएसआरच्या माध्यमातून बारामतीतील प्रशासकीय भवनशेजारील नऊ एकर जागेवर भव्य व सुंदर सेंट्रल पार्क अजित पवार साकारत आहेत. या ठिकाणी एक वॉच टॉवर उभारला जाणार असून त्या वरुन विहंगम दृश्य पाहता येईल. या परिसरातील नागरिकांना चार क्षण विरंगुळा मिळावा या उद्देशाने हे पार्क परदेशाच्या धर्तीवर साकारले जात आहे. याचे काम प्रगतीपथावर असून लवकरच हे कामही पूर्ण होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.