Dharashiv Lok Sabha Election 2024 : महायुतीमध्ये नाराजीचा दुसरा अंक; माजी खासदार बंडखोरीच्या तयारीत; उद्या भरणार अर्ज

Political News: महायुतीमध्ये जागा कोणाच्या वाट्याला येणार यावरून भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यामध्ये रस्सीखेच सुरू होती. महायुतीत अनेक खल झाल्यावर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडे आली.
Ravindra Gaikwad, Omraje Nimbalkar, Archana Patil
Ravindra Gaikwad, Omraje Nimbalkar, Archana Patil Sarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : धाराशिव लोकसभा मतदारसंघातील निवडणूक जाहीर झाल्यापासून विविध कारणांनी चर्चेत आहे. सुरुवातीच्या काळात महायुतीमध्ये जागा कोणाच्या वाट्याला येणार यावरून भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यामध्ये रस्सीखेच सुरू होती. महायुतीत अनेक खल झाल्यावर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडे आली.

उमेदवारांच्या अनेक नावांमधून अखेर भाजप आमदार राणाजगजितसिंह यांच्या पत्नी अर्चना पाटील (Archana Patil) यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (Ncp) प्रवेश केल्यानंतर त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे तेथे ओम राजेनिंबाळकर (Om Rajenimbalkar) विरुद्ध अर्चना पाटील अशी चुरशीची लढत होत आहे. पण आता याचवेळी धाराशिवमधील या लढतीत ट्विस्ट आला असून, शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार रवींद्र गायकवाड (Ravindra gaikwad) यांनी बंड करीत गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला असल्याने येत्या काळात महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. (Dharashiv Lok Sabha Election 2024)

Ravindra Gaikwad, Omraje Nimbalkar, Archana Patil
Rohit Pawar Vs Ajit Pawar : अजितदादा सत्तेपासून दूर राहूच शकत नाहीत ; रोहित पवारांची टीका

शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी दोन दिवसांपूर्वीच चार उमेदवारी अर्ज खरेदी केल्यानंतर ते बंडाच्या तयारीत असल्याची चर्चा होती. त्यानंतर रवींद्र गायकवाड गुरुवारी सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यानंतर ते मुंबईला रवाना होणार असल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीसाठी चार उमेदवारी अर्ज खरेदी केले असून, ते अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरणार असल्याची चर्चा जोरात आहे.

महायुतीमध्ये धाराशिवची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली असल्याने शिंदे गटाचे माजी खासदार रवींद्र गायकवाड काहीसे नाराज होते. त्यामुळे उमेदवारी अर्ज घेतल्यानंतर ते बंड करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. रवींद्र गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी मागितली होती. मात्र, ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली. त्यानंतर भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर अर्चना पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

दोन दिवसांपूर्वी उमरगा येथे महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचार सभेला रवींद्र गायकवाड यांनी हजेरी लावली होती. शिंदे गटाकडून पालकमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनीसुद्धा उमेदवारीची मागणी केली होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून त्यांनी शक्तिप्रदर्शन केले होते. त्यानंतर अद्याप त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, माजी खासदार गायकवाड यांनी अर्ज घेतल्याने चर्चा जोरात सुरू आहे. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत डॉ. पद्मसिंह पाटील व रवींद्र गायकवाड अशी लढत झाली होती. या लढतीत डॉ. पाटील यांना चार लाख 8 हजार 840 मते पडली तर रवींद्र गायकवाड यांना 4 लाख 2 हजार19 मते मिळाली होती. पद्मसिंह पाटील यांनी सहा हजार 787 मतांनी विजय मिळवला होता.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत या पराभवाचा वचपा काढत रवींद्र गायकवाड यांनी डॉ. पद्मसिंह पाटील यांचा पराभव केला होता. या वेळी डॉ. पद्मसिंह पाटील यांना तीन लाख 73 हजार 374 तर रवींद्र गायकवाड यांना सहा लाख 7 हजार 699 मते पडली होती. रवींद्र गायकवाड दोन लाख 34 हजार 325 मतांनी मोदी लाटेत विजयी झाले होते.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन मंत्री तानाजी सावंत यांनी पुढाकार घेतल्याने रवींद्र गायकवाड यांना विद्यमान खासदार असतानाही त्यांचे तिकीट कापून ओम राजेनिंबाळकर यांना उमेदवारी मिळाली होती. त्यानंतर त्या निवडणुकीत ओमराजे विजयी झाले होते. त्यावेळीही रवींद्र गायकवाड यांनी बंड पुकारले होते. मात्र, आता त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले असून, १८ एप्रिलला सकाळी ते उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते उमेदवारी अर्ज दाखल करणार की त्यापूर्वीच महायुतीच्या नेत्याकडून त्यांची समजूत काढली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

R

Ravindra Gaikwad, Omraje Nimbalkar, Archana Patil
Dharashiv Loksabha Big Update : ...तर ओमराजे अन् अर्चना पाटलांचे उमेदवारी अर्ज बाद होणार!

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com