Maratha Reservation
Maratha Reservation Sarkarnama

Maratha Reservation : 'धाराशिव'चा दौराच रद्द...! मराठा समाजाच्या 'गावबंदी'चा खासदार, आमदारांनी घेतला भलताच धसका

Dharashiv Political News : मराठा आरक्षण मिळेपर्यंत अनेक गावांत खासदार-आमदारांना प्रवेश न देण्याचा निर्णय मराठा समाजाने घेतला आहे.
Published on

चंद्रसेन देशमुख

Dharashiv News : जालन्यातील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. आरक्षणाबाबत निर्णायक भूमिका घेण्यासाठी मराठा समाजाची १४ ऑक्टोबरला अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेकडे राज्याचे लक्ष लागलेले असताना धाराशिव जिल्ह्यातील गावागावांत लोकप्रतिनिधींना गावबंदी करण्यात येत आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत जिल्ह्यातील अनेक गावांत खासदार-आमदारांना प्रवेश न देण्याचा निर्णय मराठा समाजाने घेतला आहे. त्यामुळे खासदार आणि आमदारांचे जिल्ह्यातील अनेक गावांतले दौरे रद्द झाले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील २० हजार लोकसंख्येच्या भूम तालुक्यातील ईट या गावानेही आजी-माजी आमदार आणि खासदारांना गावात प्रवेशबंदी केली आहे. त्यामुळे पुढच्या काळात लोकप्रतिनिधींची अधिकच कोंडी होणार आहे.

Maratha Reservation
Maratha Reservation News : मराठा आरक्षण समिती आपल्या दारी; न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा मराठवाडा दौरा ठरला

मराठा समाजाला आरक्षणासाठी पुन्हा एकदा व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे. हीच मागणी घेऊन अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील यांनी आमरण उपोषण केले होते. या आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारने आरक्षणासाठी ३० दिवसांचा अवधी मागितला होता.

मराठा समाजाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील(Manoj Jarange Patil) यांनी १० दिवसांचा अधिकचा वेळ देऊन सरकारवर आरक्षणासाठी दबाव वाढवला. जरांगे यांचे उपोषण सोडण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंतरवाली गावात आले होते. मात्र, सरकारकडून आरक्षणासाठी अपेक्षित हालचाली होत नसल्याचे लक्षात येताच जरांगे पाटील यांनी पुढची रणनीती तयार केली आहे.

सरकारला दिलेल्या मुदतीनुसार १४ ऑक्टोबर रोजी ३० दिवस पूर्ण होत आहेत. त्यामुळेच १४ तारखेला अंतरवाली गावात मोठी सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. त्यामुळे या सभेकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या सभेला महाराष्ट्रातून समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, यासाठी ते स्वतः राज्यभर फिरून सभेला येण्याचे आवाहन करत आहेत. त्यांनी ४, ५ आणि ६ तारखेला धाराशिव जिल्ह्यात संवाद यात्रा काढली. (Dharashiv Political News)

कळंब, धाराशिव, तुळजापूर, भूम तालुक्यांत संवाद यात्रा करून समाज बांधवांना आरक्षण कोणत्या पद्धतीने मिळू शकते, याबद्दल जनजागृती केली. तसेच १४ तारखेला अंतरवाली येथे सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले. संवाद यात्रा झाल्यानंतर जिल्ह्यातील अनेक गावांनी लोकप्रतिनिधींना गावबंदी केली आहे. भूम तालुक्यातील ईट गावानेही रविवारी झालेल्या बैठकीत आजी-माजी लोकप्रतिनिधींना गावात प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आरक्षणाच्या या लढ्याची झळ आता सगळ्याच राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींना बसू लागली आहे.

Maratha Reservation
Attack on Heramb Kulkarni : हेरंब कुलकर्णी हल्ला प्रकरण : फडणवीसांकडून दखल अन्...

गावबंदी झालेल्या गावात गेल्यास तणाव निर्माण होऊ शकतो, हे लक्षात घेऊन लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांमधील दौरे रद्द केले आहेत. धाराशिव तालुक्यातील उपळा (मा.) गावात मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू आहे. या गावाला मनोज जरांगे-पाटील यांनी भेट दिली होती.

जरांगे-पाटील उपळ्यामध्ये पहाटे ४ वाजता पोहोचले होते, तरीही महिला-आबालवृद्धांची मोठी उपस्थिती होती. या गावात लोकप्रतिनिधींना बंदी घालण्यात आली आहे. धाराशिव तालुक्यातील मेडसिंगा या गावाने सगळ्यात आधी लोकप्रतिनिधींना तसेच राजकीय पक्षाच्या नेत्यांना गावबंदी केली होती. त्यानंतर वेगवेगळ्या गावांत अशा पद्धतींचे निर्णय घेतले जाऊ लागले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोणत्याही गावात सध्या राजकीय कार्यक्रम बंद आहेत. आता ईटसारख्या गावानेही असाच निर्णय घेतल्यामुळे लोकप्रतिनिधींची अडचण वाढली आहे.(Maratha Reservation)

Maratha Reservation
Bhupesh Baghel Candy Crush : कँडी क्रश माझं फेव्हरेट; गेम खेळण्याच्या दाव्यावर बघेलांचं भाजपला बिनधास्त उत्तर...

आंदोलनाला मिळाला चेहरा, आता निर्णायक लढाई

यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राज्यात मूक मोर्चे आणि त्यानंतर ठोक मोर्चे निघाले होते. मात्र, त्या आंदोलनातून काहीही निष्पन्न झाले नव्हते. आंदोलनाला चेहरा नव्हता. त्यामुळे आंदोलन दिशाहीन झाल्याचे चित्र निर्माण झाले होते.

मात्र, मनोज जरांगे-पाटील यांच्या माध्यमातून सामान्य कुटुंबातील व्यक्ती आंदोलकांचा चेहरा बनला आहे. त्यामुळे समाजाचा विश्वास वाढला असून, जरांगे पाटील यांच्या पाठीशी शक्ती उभी केली जात आहे. प्रत्येकवेळी राजकीय नेत्यांच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या सोयीनुसार मराठा आंदोलन फिरवले जात होते. या वेळी असे काही होणार नाही, असा सध्या तरी समाजाला विश्वास वाटत आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Maratha Reservation
Pimpri Chinchwad Police : पिंपरी-चिंचवडचा पोलिस अधिकारी ५० रुपयांत करोडपती !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com