Jalna News : आमचं सगळं व्यवस्थित चालू असताना वरून कोणाचा तरी फोन आला आणि पोलिसांचा दृष्टीकोन बदलला. त्यांनी लाठीहल्ला सुरू केला. कोणाचा फोन आला, हे आंदोलकांनाही माहिती नव्हतं. पण बाहेर लोक राज्याच्या गृहमंत्र्यांसंबंधी घोषणा देत होते, असे सांगून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जालन्यातील लाठीहल्ल्या प्रकरणी अप्रत्यक्ष गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला. (Did the police have Fadnavis' phone? Pawar says 'I am not an astrologer')
दरम्यान, देवेंद्र फडणवीसांचा फोन होता का, या प्रश्नावर मात्र पवारांनी ‘मी काय ज्योतिषी नाही. माझ्याकडे बाकीची माहिती नाही,’ असे सांगून थेट नाव घेणे टाळले.
मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यात उपोषण करणाऱ्या मराठा आंदोलकांवर शुक्रवारी (ता. १ सप्टेंबर) पोलिसांनी लाठीहल्ला केला. त्यात अनेक मराठा बांधव जखमी झाले आहेत. त्यांची आणि उपोषणकर्त्यांची शरद पवार यांनी आज (ता. २ सप्टेंबर) भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.
शरद पवार म्हणाले की, सगळं व्यवस्थित चालू असताना कुठूनतरी, मुंबईवरून की आणखी कुठूनतरी सूचना आल्या आणि पोलिसांचा दृष्टीकोन बदलला. त्यांनी बळाचा वापर करून सरळ सरळ लाठीहल्ला केला. पोलिसांचा लाठीहल्ला पाहून गावातील लोकही जमायला लागले. संख्याबळाचा विचार करून की काय पोलिसांनी हवेत गोळीबार केला. त्यातील छोटे छर्रे या माध्यमातून गोळीबारही केला. निष्पाप नागरिकांना सरकारने कशा प्रकारे वागणूक दिली, हे प्रत्यक्ष अनुभवले.
या लाठीहल्ल्याची प्रतिक्रिया कुठे उमटली तर पोलिस दलाच्या बळाचा वापर करण्याचा निर्णय ज्यांनी घेतला, त्यांची ती जबाबदारी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात मार्ग काढण्यासाठी पुढाकार घ्यावा. मो मार्ग संसदेच्या माध्यमातून काढता येतो. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून संसदेत ५० टक्के आरक्षणाची अट शिथिल करण्याची मागणी करणार आहोत, असेही पवारांनी नमूद केले.
ते म्हणाले की, लाठीचार्जचा आदेश कोणी दिला, याबाबतची अधिकृत माहिती माझ्याकडे नाही. पण, जखमींना आणि आंदोलकांना भेटल्यावर त्यांनी सांगितले की, आमचं सगळं व्यवस्थित चालू होतं. पण वरून फोन आला आणि पोलिसांचा दृष्टीकोन बदलला. कोणाचा फोन आला, हे आंदोलकांनाही माहिती नव्हतं. पण, बाहेर लोक राज्याच्या गृहमंत्र्यांच्या संबंधी घोषणा देत होते. पण, त्यासंबंधीची अधिकृत माहिती माझ्याकडे नाही.
फोन नेमका कोणाचा होता, तर आजच्या सरकारमध्ये अधिक शक्तीशाली कोण आहे. त्यांचे पद काहीही असलं तर त्यांना शक्तीशाली मानावं लागेल. देवेंद्र फडणवीसांचा फोन होता का, यावर पवारांनी मी काय ज्योतिषी नाही. माझ्याकडे बाकीची माहिती नाही, असे सांगून नाव घेण्यास नकार दिला. मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट समंजसपणाचं आहे. पण, सरकारमध्ये दुसरा दृष्टीकोन कोण घेऊ शकतो, हे शोधावं लागेल, असेही सूचक विधान पवारांनी केले.
इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेकडे सर्व भारताचे लक्ष लागले होते. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भक्कम पर्याय देण्याचा प्रयत्न या आघाडीच्या माध्यमातून होत आहे. अशा वेळी लक्ष दुसऱ्या बाजूला हटविण्यासाठी असा प्रकार केला की काय, अशी शंका काही लोकांच्या मनात आहे, असेही पवारांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.