Parbhani News : परभणी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या राजेश विटेकर यांना उमेदवारी देण्यात आली नव्हती. महायुतीमध्ये रासपचे महादेव जानकर निवडणूक रिंगणात उतरल्याने विटेकरांना संधी मिळाली नव्हती. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजेश विटेकर यांना विधानपरिषदेवर घेण्याचा शब्द दिला होता. त्यानंतर विटेकर यांची विधानपरिषदेवर वर्णी लागली. त्यानंतर आमदार बाबाजानी दुर्राणी नाराज झाले होते.
दुर्राणी यांना अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून विधानपरिषदेवर तिसऱ्यांदा संधी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, राजेश विटेकर यांना संधी देण्यात आल्याने ते नाराज होते. त्यामुळेच आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एक धक्का बसण्याची शक्यता आहे. (Babajani duraani news)
गुरुवारी रात्री शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jaynat Patil) यांनी परभणी दौऱ्यात दुर्राणी यांची पाथरी येथील घरी जाऊन भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये बंद दाराआड झालेल्या चर्चेने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आमदार बाबाजानी दुर्राणीं यांनी बरेच दिवस त्यांची भूमिका जाहीर केली नव्हती. कुठल्या गटात जाणार यावरून अनिश्चित भूमिका घेतली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी अजित पवार गटासोबत निधी मिळवण्यासाठी जवळीकता साधली होती. त्यामुळे त्यांना तिसऱ्यांदा विधानपरिषदेवर संधी मिळाली नसल्याची चर्चा आहे.
त्यातच महायुतीऐवजी महाविकास आघाडीसोबत जावे, यासाठी त्यांच्या जवळच्या मंडळीचा दबाव आहे. त्यामुळेच येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात घरवापसी करू शकतात, अशी जोरदार चर्चा रंगली आहे. त्यातच जयंत पाटील यांच्यासोबत झालेल्या चर्चेत त्यांनी पाथरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा दर्शवली आहे. त्यामुळे पाथरीतून त्यांना उमेदवारी दिल्यास ते शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
बाबाजानी दुर्राणी आणि आमचे जुने संबंध आहेत. त्यांनी आम्हाला जेवणाचे निमंत्रण दिलं होतं. तिथे आमचे राष्ट्रवादीचे असंख्य जुने कार्यकर्ते भेटले. त्यांच्याशी हितगूज केली. आम्ही उद्या पक्षाची बैठक बोलवणार आहोत. त्यात काय परिस्थिती आहे ते पाहू, मी अजून काहीच अभ्यास केलेला नाही, असे जयंत पाटील यांनी या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.