
Dharashiv News : मराठवाड्यातील पूरग्रस्तांना करण्यात येणाऱ्या मदतीवरून राजकारण चांगलेच तापले आहे. ऐन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाकडून करण्यात येणाऱ्या मदतीच्या किटवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे फोटो छापल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. काही ठिकाणी तर नागरिकांनी मदतीचे टेम्पोही अडवले आहेत. त्यामुळे केल्या जात असलेल्या मदतीवरून राजकारण केले जात असल्याचा आरोप होत असतानाच आता त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्यावर केले जात असलेले आरोप फेटाळत सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून मदत करण्याचे आवाहन केले.
धाराशिवमध्ये देण्यात येणाऱ्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक (Pratap Saranik) यांच्या फोटोवरुन संताप व्यक्त होत आहे. काही पूरग्रस्तांनी यावर नाराजी व्यक्त केली. त्यावरून विरोधकांनीही महायुती सरकारवर टीका केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या मदतीवरून चांगलेच वातावरण तापले आहे.
मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र सरकार गेल्या काही दिवसापासून प्रयत्नशील आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूरग्रस्त परंडा तालुक्याला भेट दिली. त्यांनी 98 हजार हेक्टरपेक्षा जास्त शेतीचे नुकसान झाल्याचे सांगितले. केंद्र सरकार आणि NDRF देखील मदत कार्यात सहभागी झाले असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
त्यासोबतच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी तात्काळ मदत पुरवण्याचे आश्वासन दिले आहे. ज्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. पुढील पंचनामेनंतर अधिक मदत दिली जाईल. मात्र, मदत वितरण करताना राजकारण करण्याचे आरोपही त्यांच्यावर झाले आहेत. शिंदे यांनी असे आरोप फेटाळले आणि सर्वांना राजकारण बाजूला ठेवून मदत करण्याचे आवाहन केले.
या नुकसानीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शिंदे यांनी 10,000 किट्सची मदत घोषित केली आहेत. प्रत्येक किटमध्ये तांदूळ, साखर, तेल, दाळ, कपडे आणि इतर आवश्यक वस्तू आहेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने ही किट्स पूरग्रस्त लोकांपर्यंत पोहोचवली जात आहेत. शिंदे यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणीही केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.