Parbhani Loksabha News : महाविकास आघाडीने जोर लावला, तरी परभणीत जाधवांना नाराजी भोवणार ?

Shivsena : लोकसभा निवडणुकीत सहानुभूतीच्या लाटेवर आपली नौका पार लावण्याचा जाधव यांचा प्रयत्न असणार आहे.
Mp Sanjay Jadhav-Mla Meghana Bordikar
Mp Sanjay Jadhav-Mla Meghana BordikarSarkarnama

Marathwada Politics : राज्यातील सत्तांतरानंतर महाविकास आघाडीच्या बाजूने जनमताचा कौल असल्याचे चित्र आहे. कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीतील निकालावरून हे स्पष्ट झाले आहे. मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांचा विचार केला, तर बऱ्याच ठिकाणी महाविकास आघाडी भाजप-शिंदे गटाला जोरदार टक्करच नाही, तर मात देवू शकते अशी परिस्थिती आहे. (Parbhani) परभणी लोकसभा मतदारसंघात राज्यातील सत्तांतरानंतर खासदार संजय जाधव, आमदार राहुल पाटील हे पक्षाशी एकनिष्ठ राहून देखील परभणीचा गड राखणे महाविकास आघाडीला जड जाणार असेच दिसते.

Mp Sanjay Jadhav-Mla Meghana Bordikar
Bjp On Name Change News : `छत्रपती संभाजीगर` च्या समर्थनात ठाकरे गटाचा एक अर्ज दाखवा, लाखाचे बक्षिस मिळवा..

संजय जाधव (Sanjay Jadhav) यांना एकनिष्ठ राहिल्याबद्दल सहानुभूती मिळण्याऐवजी त्यांच्याबद्दल मतदारांमध्ये असलेल्या नाराजीचा फटका त्यांना अधिक बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या १८ पैकी १४ खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला. (Shivsena) पण जे चार खासदार ठाकरेंशी एकनिष्ठ राहिले त्यात संजय जाधव यांचा क्रमांक लागतो. पण नुकत्याच झालेल्या शिवगर्जना मोहिमेत हिंगोलीत केलेल्या एका भाषणात त्यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर जाहीर टीका करत आपल्याबद्दल संशयाचे वातावरण निर्माण केले.

एवढेच नाही, तर निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आलेल्या खासदारांच्या शपथपत्रात जाधवांचेच शपथपत्र नसल्याची चर्चा देखील गेल्याकाळात झाली. संशयाचे वातावरण, मतदारसंघात असलेली नाराजी आणि शिंदे गटात प्रवेश केला तरी उमेदवारी मिळण्याची शाश्वती नसल्याने जाधवांची कोंडी झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे ठाकरेंशी एकनिष्ठ राहून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सहानुभूतीच्या लाटेवर आपली नौका पार लावण्याचा जाधव यांचा प्रयत्न असणार आहे.

परभणी लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. अगदी गद्दारीचा इतिहास असला तरी येथील मतदार कायमच ठाकरेंच्या शिवसेनेशी भक्कमपणे उभा राहिलेला आहे. संजय जाधव यांची ही खासदारकीची दुसरी टर्म आहे. ठाकरे गटाकडून तिसऱ्यांदा त्यांनाच उमेदवारी मिळणार हे देखील निश्चित आहे. परंतु गेल्या दोन लोकसभा निवडणुकीतील निकालावर नजर टाकली तर २०१४ मध्ये जाधवांचे मताधिक्य १ लाख २७ हजार इतके होते. तर २०१९ मध्ये ते घटून थेट ४२ हजारांवर आले होते. विशेष म्हणजे या दोन्ही निवडणुकीत शिवसेना-भाजप युती होती. तर जाधवांची थेट लढत अनुक्रमे विजय भांबळे आणि राजेश विटेकर यांच्याशी झाली होती.

एमआयएम-वंचित आघाडीच्या आलमगिर खान यांनी तब्बल दीड लाख मते घेतल्यानंतरही जाधव यांचे मताधिक्य एक लाखाने का घटले? या मागे देखील त्यांच्याबद्दलची नाराजी हेच कारण सांगितले जाते. गेल्यावेळी भाजपने परभणी लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितला होता. मेघना बोर्डीकर-साकोरे यांनी उमेदवारीसाठी पुर्ण ताकद पणाला लावली होती. परंतु युती असल्यामुळे जाधवांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामार्फत केलेली मध्यस्थी आणि वैयक्कित प्रयत्नांमुळे बोर्डीकरांनी तेव्हा माघार घेतली होती.

Mp Sanjay Jadhav-Mla Meghana Bordikar
Sushama Andhare On Shirsat News : आमदार शिरसाट यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार..

२०२४ मध्ये मेघना बोर्डीकर या भाजपकडून प्रबळ दावेदार असणार आहेत. शिंदे-भाजप युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला येणे अपेक्षित आहे. परंतु शिंदे गटाकडे तुल्यबळ उमेदवारच नसल्याने ही जागा भाजपच्या पर्यायाने मेघना बोर्डीकर यांच्यासाठी सोडली जाईल अशी चर्चा आहे. बोर्डीकर विरुद्ध जाधव अशा थेट सामना झाला तर महाविकासआघाडी असली तरी बोर्डीकरांचे पारडे जड ठरण्याची शक्यता आहे. संजय जाधव यांच्या खासदारकीच्या दोन टर्ममध्ये जिल्ह्यात त्यांचे राष्ट्रवादी व काॅग्रेशच्या नेत्यांशी फारसे चांगले संबंध नव्हते.

अगदी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतांना देखील जिल्ह्यातून जाधव आणि आघाडीच्या स्थानिक नेत्यांमधील कुरबुरीच्या गोष्टी वरिष्ठापर्यंत गेल्या होत्या. आता जाधव या नेत्यांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असले तरी लोकसभेला ते त्यांच्या विजयासाठी प्रामाणिक प्रयत्न करतील का? याबद्दल शाशंकता आहे. परभणी शहरात ठाकरे गटाची ताकद मोठी आहे, परंतु ग्रामीण भागातून त्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. परभणी लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर जिंतूर-परतूरमध्ये विद्यमान आमदार भाजपचे आहेत.

Mp Sanjay Jadhav-Mla Meghana Bordikar
NCP vs BJP : भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव करण्यासाठी 'राष्ट्रवादीच' लागते; जयंत पाटलांचा टोला

घनसावंगी राष्ट्रवादी, पाथरी काॅंग्रेस तर परभणी ठाकरे गट आणि गंगाखेडला रासपचा आमदार आहे. मेघना बोर्डीकर, बबनराव लोणीकर, राजेश टोपे, सुरेश वरपूडकर, राहूल पाटील, रत्नाकर गुट्टे या आमदारांच्या भूमिका देखील येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महत्वाच्या ठरणार आहेत. बोर्डीकरांना लोकसभेची उमेदवारी मिळाली तर लोणीकर, गुट्टे यांची मदत त्यांना होणार आहे. २००४ पासून या लोकसभा मतदारसंघावर असलेली ठाकरे गटाची पकड येणाऱ्या निवडणुकीत सुटण्याचीच अधिक शक्यता वर्तवली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com