अनिल कदम
Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेनेतून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरवात केलेले माजी आमदार सुभाष साबणे सध्या चर्चेत आहेत ते त्यांच्या पक्षांतरामुळे. देगलूर-बिलोली विधासनभेच्या 2021 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवारी मिळणार नाही हे लक्षात येताच साबणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
भाजपनेही ऐनवेळी आलेल्या सुभाष साबणे यांना उमेदवारी देत आम्ही लढलो, असे दाखवण्याचा प्रयत्न केला. रावसाहेब अंतापूरकर यांच्या आकस्मिक निधनामुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीचा लाभ त्यांचे पुत्र जितेश अंतापूरकर यांना तेव्हा झाला.
तत्कालीन काँग्रेस नेते तथा मंत्री अशोक चव्हाण यांनी जितेश अंतापूरकर यांच्या विजयासाठी प्रयत्न केले. साबणे (Subhash Sabne) यांचा भाजप प्रेवशाचा प्रयोग फसला. तीन वर्ष पक्षात फारसे काही करायला मिळाले नाही.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारीची आशा होती, ती अशोक चव्हाण आणि त्यांच्या पाठोपाठ जितेश अंतापूरकर यांच्या भाजप प्रवेशाने मावळली. मग कोंडीत सापडलेल्या सुभाष साबणे यांनी भाजपला राम राम करत, दुसरा निवारा शोधला.
महायुती-महाविकास आघाडीच्या विरोधात तिसरा पर्याय म्हणून उभ्या राहणाऱ्या `परिवर्तन महाशक्ती` चा भाग बनत सुभाष साबणे यांनी विधानसभेची उमेदवारी मिळवली. आता त्यांच्या उमेदवारीचा किती प्रभाव देगलूर-बिलोली मतदारसंघात होतो हे येणार काळच ठरवेल. मात्र साबणे यांनी `परिवर्तन महाशक्ती` कडून मिळवलेली उमेदवारी म्हणजे तडजोड असल्याचे बोलले जाते.
मुखेडच्या शाखाप्रमुखा पासून सुरू झालेला माजी आमदार सुभाष साबणे यांचा राजकीय प्रवास आता सोशल इंजिनिअरिंग करू पाहणाऱ्या `परिवर्तन महाशक्ती` या नुकत्याच स्थापन झालेल्या पक्षात प्रवेश करून स्थिरावला.
आजपर्यंत त्यांनी सहा विधानसभेच्या निवडणुका लढविल्या. त्यातील तीन जिंकल्या तर आता सातव्यांदा ते पुन्हा परिवर्तनाच्या या रॅलीतून विधानसभेवर जाण्याच्या तयारीत आहेत. पाच निवडणुका ते शिवसेनेच्या धनुष्यबाणावर लढले, एक वेळेस हाती भाजपचे `कमळ` घेतले, तर आता थेट `परिवर्तन महाशक्ती` मध्ये.
आत्या त्यांच्या हाती बॅट आली आहे, या बॅटने ते ट्वेंटी-ट्वेंटी चा सामना खेळायला निघाले आहेत. त्यांच्या या नवीन इनिंगला देगलूर मतदार संघातील मतदार कितपत साथ देतील हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
1999 मध्ये पहिल्यांदा मुखेड या राखीव मतदार संघातून विधानसभेला सामोरे गेलेल्या सुभाष साबणे यांचा माजी आमदार अविनाश घाटे यांच्याशी सामना झाला. त्यात 1289 मतांनी साबणे यांना विजय मिळाला.
पुन्हा 2004 मध्ये या दोघातच `काटे की टक्कर` होऊन 5535 मतांनी साबणे विजयी झाले. 2009 मध्ये मुखेड राखीव झाल्याने सुभाष साबणे यांनी नव्यानेच राखीव झालेल्या देगलूर मतदारसंघाकडे आपला मोर्चा वळविला.
देगलूर चे भूमिपुत्र व मुंबईत अभियंता असलेले रावसाहेब अंतापुरकर यांना माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी त्यांना काँग्रेसकडून मैदानात उतरविले. स्थानिक व बाहेरचा असे मुद्दे प्रचारादरम्यान झाल्याने निवडणुकीत स्थानिक या मुद्द्यावर अंतापूरकरांचा विजय झाला. नवख्या अंतापूरकरांकडून साबणे यांना सहा हजार अकरा मताने पराभूत व्हावे लागले.
2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत पुन्हा हेच पारंपारिक विरोधक एकमेका विरोधात उभे होते, मात्र माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे त्यावेळी भाजपात होते. त्यावेळी त्यांनी उभे केलेल्या भाजपालाही लक्ष वेधणारे मतदान झाले, मात्र प्रचारा दरम्यान उमेदवार व खतगावकरात खटके उडाल्याने त्यांनी मतदानाच्या पूर्वसंध्येला धनुष्यबाणाला मतदान करण्याचे "फर्मान" सोडले होते.
यात साबणे यांचा विजय सुकर होत त्यांनी अंतापुरकरांचा 8648 मतांनी पराभव केला. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत पुन्हा पारंपारिक विरोधक आमने-सामने होऊन रावसाहेब अंतापूरकर यांनी साबणे यांचा 2255 मतांनी पराभव करत पराभवाची परतफेड केली.
इनिंग नवी विरोधक जुनेच
सातव्यांदा विधानसभेच्या रणांगणात उतरणारे माजी आमदार सुभाष साबणे यांनी निवडणुकीच्या तोंडावर "परिवर्तन महाशक्ती " आघाडीत प्रवेश केला. त्यांना प्रहार जनशक्ती पक्षाने उमेदवारी ही नुकतीच जाहीर केलेली आहे.
मात्र या निवडणुकीत त्यांचा सामना त्यांचे मुखेडचे एकेकाळचे म्हणजे दोन निवडणुकातील विरोधक माजी आमदार अविनाश घाटे या संभाव्य काँग्रेस उमेदवाराशी होण्याची शक्यता आहे.
देगलूर मतदारसंघातील पोटनिवडणुकीतील विरोधक जितेश अंतापुरकर हे भाजपाकडून रणांगणात उतरण्याची शक्यता आहे. राजकीय प्रवासात दुसऱ्यांदा पक्षांतर करून परिवर्तनाची बॅट घेऊन परंपरागत असलेल्या विरोधकाशी साबने कसा सामना करतात ? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.