मराठा आरक्षणासाठी ( Maratha Reservation ) संघर्ष करूनही कुणबी प्रमाणपत्र देण्यास सरकार टाळाटाळ करीत आहे. जातीजातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात येत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत तीन चाकी सरकार पाडले जाईल. त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावातून मराठा समाजाचे दोन उमेदवार लोकसभेच्या मैदानात उभे करण्यात येणार, अशी घोषणा मराठा स्वराज्य संघाचे संस्थापक महादेव साळुंखे यांनी केली.
"मराठा समाज वर्षांनुवर्षे आरक्षणाची लढाई लढत आहे. महाराष्ट्रातील गरीब मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र मिळाले पाहिजेत. परंतु, सरकारकडून कुणबी प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केली जात आहे. आरक्षणाचा मुद्दा पुढे करीत जाती-जातीत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न महायुतीच्या सरकारकडून केला जात आहे. पण, नेते कितीही ओरडले तरी समाज दुभंगणार नाही, याबाबतची दक्षता घेत आहोत. तीन चाकी सरकारकडून मराठ्यांना संपवण्याचे षडयंत्र रचले जात आहे. त्यामुळे आता बहुजनांकडून भाजपला धडा शिकवावा लागेल, अन्यथा बहुजन संपतील," अशी भीती साळुंखेंनी व्यक्त केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"सरकारच्या निषेधार्थ सांगली लोकसभा मतदारसंघासाठी प्रत्येक गावातून दोन उमेदवारी अर्ज भरले जातील. जिल्ह्यात सुमारे 700 गावांचा समावेश असून लोकसभेच्या मैदानात मराठा समाजाच्या तब्बल 1400 उमेदवारांचे अर्ज भरण्यात येणार आहेत. आगामी लोकसभेच्या निवडणुकीत तीन चाकी सरकार पाडण्यात येईल. याबाबत मनोज जरांगे-पाटील जो निर्णय घेतील, तो सांगली जिल्ह्यातही मान्य केला जाईल. मतदान यंत्रामध्ये फेरफार करून भाजपची सत्ता आणली जात आहे. यापुढे निवडणुका होतील की नाही, याबाबत साशंकता आहे. मतदान यंत्र नको, मतपत्रिकेवर मतदान झाले पाहिजे," अशी मागणी साळुंखेंनी केली.
"एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण केले जात आहे. 2016 मध्ये मुंबईतील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आली. त्यासाठी सरकारने दोन हजार कोटी रुपयांची तरतूद केली. या कामासाठी आत्तापर्यंत कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला आहे. मात्र, स्मारकासाठी एक वीटही रचण्यात आली नाही," अशी टीका साळुंखेंनी केली.
"शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात मराठा समाजाला संपवण्याचे षडयंत्र भाजपकडून रचले जात आहे. त्यामुळे जनतेचा सरकारवरील विश्वास उडाला आहे," असा आरोपही साळुंखेंनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.