Shivsena News : विद्यमान पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आपली मुले आणि पत्नीच्या नावे बेकायदेशीररित्या मालमत्ता खरेदी केल्याचे प्रकरण ताजे असतानाच माजी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या काळातील एक प्रकरण समोर आले आहे. राज्याचे अल्पसंख्याक विकास आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना अब्दुल सत्तार यांनी आपला मुलगा समीर सत्तार याच्या नावे 68 हजार चौरस फुटांचा भूखंड खरेदी केला होता. यावरील 2002 मध्ये मंजूर करण्यात आलेल्या विकास आराखड्यात टाकलेले खेळाचे मैदान आणि प्राथमिक शाळेचे आरक्षण हटवण्यात आले आहे.
अब्दुल सत्तार यांनी पालकमंत्री असताना 2024 च्या विकास आराखड्यातून भूखंडावरील आरक्षण उठवण्यासाठी राजकीय दबाव आणल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचे पुत्र संचालक असलेल्या ए.एस. अजंठा कन्स्ट्रक्शनच्या नावे शहरातील शहागंज भागात असलेल्या 20 हजार चौरस फुटाचा भूखंड देखील असेच मैदानाचे आरक्षण उठवून खरेदी करण्यात आल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता बुढीलेन भागात चिमनाराजाची हवेली अशी ओळख असलेला 68 हजार चौरस फुटाचा भूखंड याच ए.एस. अजंठा कन्स्ट्रक्शनच्या नावे असल्याचे समजते.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर विकास आराखड्यातून सत्ताधारी आमदाराचा 'विकास' केला जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. विकास आराखड्याच्या माध्यमातून शहराचा नियोजनबद्ध विकास केला जाईल, असा दावा केला जात असताना दुसरीकडे नागरिकांसाठी आवश्यक असलेली आरक्षणे उठविण्यात आल्याचे वास्तव समोर येत आहे. (Municipal Corporation) तत्कालीन पालकमंत्री तथा सत्ताधारी महायुतीचे आमदार अब्दुल सत्तार यांच्याशी संबंधित भूखंडावरील शाळा व मैदानाचे आरक्षण उठविण्यात आले आहे.
राज्य शासनाने मंजूर केलेला शहराचा विकास आराखडा वादग्रस्त ठरत आहे. आराखड्यातील अनेक चुका समोर येत आहेत. शेकडो आरक्षणे रस्ते कमी करणे, रस्त्यांची रुंदी कमी करणे असे प्रकार नगर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहेत. झोन नंबर दहामधील 2002 च्या मंजूर आराखड्यासह नवीन विकास आराखड्यात टाकण्यात आलेले शेकडो आरक्षणे वगळण्यात आली. त्यात सत्ताधारी आमदारांचा देखील फायदा करून देण्यात आला आहे.
तत्कालीन अल्पसंख्याक मंत्री तथा सिल्लोडचे विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांनी बुढीलेनमधील चिमणा राजाची हवेली अशी ओळख असलेला सुमारे 68 हजार चौरस फूट क्षेत्राचा भूखंड 2 डिसेंबर 2011 मध्ये खरेदी केला. ज्याचा खरेदी क्रमांक 9044 हा असून, सिटीएस नंबर 3194 आहे. त्यानंतर शहर विकास आराखड्याचे काम सुरू असताना नियुक्त अधिकारी श्रीकांत देशमुख यांनी विकास आराखडा तयार करताना या भूखंडावर असलेले प्राथमिक शाळा आणि खेळाच्या मैदानाचे आरक्षण उठविले. या आरक्षणाला वर्ष 2002 च्या विकास आराखड्यात मंजुरी देण्यात आली होती.
चिमना राजा हवेलीच्या जागेवर अनेकांनी अतिक्रमणे केली होती. ही जागा अब्दुल सत्तार यांनी खरेदी केल्यानंतर ही अतिक्रमणे हटविण्यासाठी पोलिस बळाचा वापर करण्यात आला. त्यासोबतच महापालिकेनेदेखील मदत केली. हे अतिक्रमण हटविण्यासाठी आलेला खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येईल, असे त्यावेळी सांगण्यात आले होते. मात्र, महापालिकेचा हा निर्णय म्हणजे 'बोलाचीच कढी बोलाचाच भात' ठरला. आता या भूखंडावरील आरक्षणही वगळण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.