AIMIM News : राज्याचे सामाजिक न्याय तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या भूखंड आणि जमीन खरेदीचे प्रकरण थांबता थांबत नाहीये. एकापाठोपाठ एक शहर व शहरालगतच्या भागात संजय शिरसाट यांनी आपल्या दोन्ही मुले व पत्नीच्या नावाने कोट्यावधी रुपयांची जमीन आणि प्लॉट खरेदी केल्याचा दावा एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. या संदर्भातील काही खरेदी खतही पुरावा म्हणून इम्तियाज यांनी माध्यमांना दिले.
दरम्यान संजय शिरसाट यांच्यावर इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांच्याकडून बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचा निषेध म्हणून जालन्याहून काही शिरसाट समर्थक संभाजीनगरात इम्तियाज यांच्या घरावर शेणफेक करण्यासाठी आले होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्यांच्या बंगल्यासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. तर शेणफेक करण्यासाठी निघालेल्या चार-पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर इम्तियाज जलील यांनी दुपारी पुन्हा पत्रकार परिषद घेत संजय शिरसाट व त्यांच्या कुटुंबियांकडून गायरान जमिनीसह शहरातील मोक्याच्या जागेवर प्लॉट आणि सहाजापूर मध्ये पंधरा ते वीस एकर जमीन खरेदी केल्याचा नवा आरोप केला.
सहाजापूर मध्ये विविध गटात संजय शिरसाट यांनी सिद्धांत शिरसाट, तुषार शिरसाट यांच्या नावे एका गटामध्ये दहा एकर तर दोन गटांमध्ये प्रत्येकी दोन एकर अशी 14 एकर जमीन खरेदी केल्याचा दावा इम्तियाज जलील यांनी केला. विशेष म्हणजे बाजार भावापेक्षा कवडीमोल दरात या जमिनी खरेदी करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. (Sanjay Shirsat) यापैकी गट नंबर आठ मध्ये असलेली दहा एकर जागा ही गायरान असून ती शिरसाट यांनी आपला राजकीय दबाव वापरत दोन्ही मुले सिद्धांत आणि तुषार शिरसाट यांच्या नावे खरेदी केली आहे. या सगळ्या जमीन खरेदीसाठी आठ कोटी रुपये देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय शहरातील जालना रोडवर अदालत रोडच्या समोर 1140.50 स्क्वेअर मीटरचा एक प्लॉट संजय शिरसाट यांनी फक्त सहा कोटी रुपयांत खरेदी केला आहे. जिथे पंधरा ते वीस हजार रुपये स्क्वेअर फिट असा दर आहे ती जागा शिरसाट यांनी केवळ 4800 रुपये स्क्वेअर फिट दराने खरेदी केल्याचा दावा इम्तियाज जलील यांनी केला. ही जागा सिद्धांत, तुषार आणि पत्नी विजया शिरसाट यांच्या नावावर असल्याचे इम्तियाज जलील यांनी सांगीतले. सहाजापूर येथील दहा एकर गायरान जमीन तत्कालीन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मदतीने शिरसाट यांनी खरेदी करण्याचा प्रयत्न केला.
परंतु महसूल मंत्र्यांनी मोघम आदेश दिल्यामुळे त्यावर कारवाई करण्यास संबंधित तहसीलदार आणि अधिकार्यांनी विरोध केला होता. मात्र शिरसाट यांनी राजकीय दबाव आणून थेट तलाठी आणि तहसीलदार बदलले आणि आपल्या मर्जीतल्या लोकांची तिथे वर्णी लावत ही गायरान जमीन वर्ग दोन मधून वर्ग एक मध्ये रूपांतरित करत खरेदी केली. त्यावेळी ज्या जिल्हाधिकाऱ्यांनी ह्या व्यवहाराला मान्यता दिली ते ही या प्रकरणात संजय शिरसाट यांच्या एवढेच दोषी आहेत. तहसीलदार, तलाठी आणि त्यावेळचे जिल्हाधिकारी यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली.
धमक्यांना घाबरणार नाही..
संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत याच्यावर एका महिलेने आरोप केले होते. परंतु ते वैयक्तिक आणि घरगुती प्रकरण असल्यामुळे त्यात आम्ही पडलो नाही. मात्र शेंद्रा एमआयडीसीतील प्लॉट आणि हॉटेल व्हिट्स खरेदी प्रकरणात आम्ही लक्ष घातल्यानंतर मंत्री संजय शिरसाट यांना हॉटेल लिलाव प्रक्रियेतून माघार घ्यावी लागली होती. शेंद्रा एमआयडीसी भूखंड खरेदीची फाईल मुख्य कार्यालयात म्हणजेच मुंबईला पाठवण्यात आली आहे. यामध्ये फेरफार करून आपला बचाव करण्याचा शिरसाट प्रयत्न करत आहेत. परंतु आम्ही ही सगळी कागदपत्रे आधीच मिळवलेली असल्याने शिरसाट यांना यावर उत्तर द्यावे लागेल.
आठ दिवसाचा वेळ त्यांना कशासाठी हवा आहे? हे या भूखंडाची फाईल मुंबईला पाठवण्यात आल्यावर लक्षात येते. व्हिट्स प्रकरणा प्रमाणेच संजय शिरसाट यांनी समोर येऊन शेंद्रा एमआयडीसीतील भूखंड परत करत असल्याचे जाहीर करावे, असे आवाहनही इम्तियाज जलील यांनी केले. माझ्या घरावर शेणफेक करण्यासाठी जालन्याहून लोक आणण्याची गरज काय पडली? तुमच्याकडे शहरात समर्थक नाहीत का? अशा प्रकारांना मी घाबरणार नाही आणि थांबणारही नाही. मला धमक्या देण्याच्या भानगडीत पडू नका, तुम्ही माझी प्रकरण बाहेर काढण्यासाठी जी लोकं कामाला लावली आहेत, त्यांच्या हाती काहीही लागणार नाही.
तुम्हाला काय पाहिजे ते मला मागा मी द्यायला तयार आहे, असे खुले आव्हान इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट यांना दिले. याशिवाय नाशिक जवळील त्रंबकेश्वर येथे संजय शिरसाट यांच्या फाईव्ह स्टार हॉटेलचे काम सुरू असल्याचा दावाही इम्तियाज जलील यांनी केला. लवकरच आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन पाहणी करणार आहोत आणि त्याची कागदपत्रे हाती आल्यानंतर ते ही माध्यमांसमोर आणणार आहोत, असा इशारा इम्तियाज यांनी दिला. दरम्यान मुंबईत संजय शिरसाट यांना इम्तियाज जलील यांनी केलेल्या आरोपाबद्दल जेव्हा माध्यमांनी विचारले, तेव्हा असे दलाल सगळीकडे फिरत असतात. मी त्यावर उत्तर देणार नाही, असे म्हणत भाष्य टाळले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.