NCP Politics : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गेल्या महिन्यात नांदडेमध्ये आभार यात्रेच्या निमित्ताने दौरा झाला. या दौऱ्यात ते अशोक चव्हाण यांचे महुणे माजी मंत्री भास्कर पाटील खतगांवकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन चर्चा करणार होते. मात्र त्यावेळी ही भेट होऊ शकली नाही. शिंदेंसोबतची भेट टळली असली तरी खतगावकरांची भेट अजित पवारांनी त्यांच्या घरी जाऊन घेत मास्टर स्ट्रोक लगावला.
अजित पवार हे काल नांदेड (Nanded) दौऱ्यावर होते. काँग्रेसचे माजी आमदार मोहन हंबर्डे यांनी त्यांच्या उपस्थितीत काल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यापासून जिल्ह्यात शिवसेना, भाजप, काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीत इनकमिंग वाढले आहे. आता अशोक चव्हाण यांचे मेहुणे माजी मंत्री भास्कर पाटील खतगावकर यांना राष्ट्रवादीत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या पार्श्वभूमीवर नांदेड दौरा आटोपून मुंबईला परतण्याआधी रात्री दहा वाजता अजित पवार यांच्या वाहनांचा ताफा अचानक भास्कर पाटील खतगावकर यांच्या राजेंद्रनगर मधील बंगल्याकडे वळला. यावेळी खतगावकर-पवार (Ajit Pawar) यांच्यात दहा मिनिटे बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्यासोबत भाजपात गेलेले भास्कर पाटील खतगावर विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत होते.
स्नुषा मीनल खतगावकर यांना त्यांनी नायगावबाजारमधून काँग्रेसची उमेदवारीही मिळवून दिली. पण सूनेला आमदार करण्याचे खतगावकरांचे स्वप्न भंगले. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा जिल्ह्यात सूपडासाफ झाल्यानंतर खतगावकर नव्या पक्षाच्या शोधात होते. एकनाथ शिंदे यांच्या नांदेड दौऱ्यावेळी ते शिवसेनेत प्रवेश करणार अशा चर्चा होत्या. एवढेच नाही तर एकनाथ शिंदे भास्कर पाटील खतगावकर यांच्या घरी चहापानाला जाणार असल्याचे बोलले जात होते.
मात्र एकनाथ शिंदे यांच्या नांदेड दौऱ्यात असे काहीच घडले नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र नांदेड दौऱ्यात ही संधी हेरली. भास्कर पाटील खतगावकर आणि अजित पवार यांच्यात गुप्त चर्चा झाल्याची माहिती आहे. कदाचित येत्या काही दिवसात खतगावकर हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात, असेही बोलले जात आहे. मेहुणे भास्कर पाटील खतगावकर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्यापेक्षा राष्ट्रवादीत जाणे अशोक चव्हाण यांच्यासाठीही सोयीचे ठरू शकते, अशीही चर्चा आहे.
भास्करराव पाटील खतगावकर हे तीन वेळा खासदार आणि तीन वेळा आमदार होते. काँग्रेस, भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. 2014 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला होता, नंतर पुन्हा ते काँग्रेसमध्ये आले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजप प्रवेश केल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ खतगावकर यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात घरवापसी केली होती. विधानसभा निवडणुकी दरम्यान खतगावकर यांनी पुन्हा पक्ष बदलला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.