Beed News: "जनहितासाठी आपण सातत्याने प्रयत्न करतो. रक्ताची नाती जोडली आणि तोडली जातात. पण विकासाचे नाते अतूट असते", अशी सल माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी पुन्हा बोलून दाखवली आहे. बीड तालुका सहकारी दुध संघाच्या सौर उर्जा प्रकल्पाच्या उद॒घाटनावेळी ते बोलत होते.
नुकतेच पुतण्याने त्यांची साथ सोडून राष्ट्रवादीशी घरोबा केला. त्यानंतर जयदत्त क्षीरसागर यांच्या अधिपत्याखालील गजानन सहकारी सुतगिरणीच्या सभेत त्यांनी नात्याबद्दल आपली सल बोलून दाखवली होती. आता पुन्हा एकदा बीड तालुका सहकारी दुध संघाच्या सौर उर्जा प्रकल्प उद॒घाटनाच्या कार्यक्रमात क्षीरसागरांनी 'नात्या'चा मुद्दा आपल्या भाषणात आणला. तसेच आपण मंत्रालयात टेबल टू टेबल फिरून निधी आणतो. मात्र, नारळ फोडण्याची हौस अनेकांना असते, असा टोलाही क्षीरसागरांनी यावेळी बोलताना लगावला.
नारळ कुणीही फोडू द्या, पण निधी आपण आणलेला आहे, हे लक्षात ठेवा, असेही क्षीरसागर म्हणाले. सध्या अनेक ठिकाणी टोल भरावा लागतो, ही टोलधाड जनतेच्या हिताची आहे का, असा सवाल करत चाळीस वर्षाच्या राजकारणात आपण एक रुपया कुणाचा न घेता सेवाभाव वृत्तीने काम केले, जनताच माझी माय बाप आहे, सध्या कोण कुणाला भेटतं आणि सकाळी काय होत सांगता येत नाही. पण माझी माणसे अशा परिस्थितीतही टिकून आहेत, याचा मला सार्थ अभिमान आहे, असेही ते म्हणाले.
सर्वांनी ताकतीने उभे राहून प्रत्येक संस्थेवर पुन्हा आपल्याला विजय मिळवायचा आहे. विश्वासाचा धागा टिकून ठेवायचा आहे. त्यासाठी आपण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकतीने लढवणार आहोत. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांनी आता खचून न जाता नव्या उमेदीने कामाला सुरुवात करा, असे आवाहन जयदत्त क्षीरसागर यांनी कार्यकर्त्यांना केले.
दरम्यान, आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका स्वबळावर लढण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला. या निमित्ताने त्यांनी रोहित क्षीरसागर या आपल्या पुत्राला सक्रीय केले. रोहित क्षीरसागरही मतदारसंघातील प्रत्येकाच्या सुख-दु:खात सहभागी असेल असे सांगितले.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.